आणि बोंबल्या गणपतीचा मोदी गणपती झाला!

गेल्या दोन-तीन दिवसात पुण्यात फिरला असाल, तर तुम्हाला एकाच गोष्टीची चर्चा सुरू असताना दिसणार, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा. लय चर्चा असलेल्या पुणे मेट्रोचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. आता मोदी पुण्यात येणार म्हणल्यावर कुठं कुठं जाणार अशी चर्चा आमच्या कट्ट्यावर सुरू होती. एक भिडू म्हणला, ‘तुम्ही माहिती लय फास्ट शोधता, मला एक सांग ते नारायण पेठेतला मोदी गणपती आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे का? ते पुण्यात आल्यावर या गणपतीला जातात काय?’ आम्ही म्हणलं शोधून सांगतो.

तर पेशव्यांची राजधानी पुणे म्हणजे भारताच ऑक्सफर्ड. पण इथं जेवढी इंजिनियरिंग कॉलेजेस आहेत, जेवढे स्पर्धा परीक्षाचे क्लासेस आहेत त्या सगळ्यापेक्षा जास्त इथ देवळ हायत. हां पास नापासचं टेन्शन असणाऱ्या आमच्या सारख्या पोरांना देऊळ हाताशी असलेलं बर असतंय. पण याचा अर्थ असं नाही की ही देवळं परीक्षा देणाऱ्यांसाठी बनली. पेशव्यांच्या काळापासून पुण्यात देवळं आहेत. 

सदाशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ, गंज पेठ असे पुण्यात एकूण सतरा पेठा आहेत. १८१० साली केलेल्या नोंदीनुसार या सगळ्या पेठांमध्ये एकूण चारशेच्या वर मंदिरं होती. यात गेल्या दोनशे वर्षात वाढच झाली. आताचा आकडा नक्की माहित नाही. पण पेशव्यांच्या काळातल्या देवळांचा थाटच निराळा होता हे खरं!!

या पुण्याच्या देवांची नावंही एकदम पुणेरी वळणाप्रमाणे तिरकस आहेत. पासोड्या मारुती, सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर, उपाशी विठोबा ,डुल्या मारुती, दाढीवाला दत्त, जिलब्या मारुती, पानमोड्या म्हसोबा अशी बरीच देवस्थानं आहेत. पण पेशव्यांच्या पुण्याचं आराध्य दैवत आहे गणपती. हा गणपतीचीही नावं बरीच आगळीवेगळी आहेत, दगडूशेठ हलवाई गणपती तर सगळ्यांना माहित असतो पण कसबा गणपती, गुंडाचा गणपती, गुपचूप गणपती, चिमण्या गणपती, हत्ती गणपती, मद्रासी गणपती असे हजार प्रकारचे गणपती पुण्यात आहेत.

पण आमच्या भिडूनं सांगितलं, त्यामुळं आज आपण चर्चा करणार आहे मोदी गणपती बद्दल.

तुम्हाला वाटलं असल, भिडू मनाच्या गप्पा हाणतोय. पण नाय, भिडू खरं बोलतोय चाणक्य शप्पथ. पुण्यात नारायण पेठेत जावा. तिथ पत्ता विचारत बसू नका कोण पण सांगणार नाही. सरळ गुगल मॅपमध्ये टाका आणि खालच्या अंगानं वरच्या अंगानं जाऊन डायरेक्ट मोदी गणपतीच्या दर्शनाचा लाभ होईल.

तर आधीच सांगतो, आज पुण्यात आणि २०१४ पासून संसदेत आले असले, तरी त्याच्या आधीच म्हणजे दोनशे वर्षांपासून मोदी गणपती पुण्यात आहे.

गोष्ट आहे अठराव्या शतकातली.

पुण्यात तेव्हा दुसऱ्या बाजीरावांचा कारभार सुरु होता. इंग्रजांनी मराठी सत्तेच्या भोवती विळखा घट्ट करायचं काम सुरु केलं होतं. त्यांचा एक रीजेन्ट तेव्हा पेशव्यांच्या सदरेवर असायचा. एकूण कामकाज कसं चालतं यावर त्याचं बारीक लक्ष असायचं. खरं तर तिथं आलेल्या बेरकी इंग्रज अधिकाऱ्यांनी मराठी शिकून घेतलेली असायची. पण तरीही रोजच्या कामात मदतीला एखादा दुभाषी कम एजंट हवा असायचा. असाच एक एजंट होता त्याच नाव खुश्रू सेठ मोदी.

हा खुश्रू मोदी म्हणजे मुळचा गुजरातचा पारसी. पण महाखटपट्या माणूस. पेशव्यांच्या दरबारात राहून इंग्रज आणि बाजीराव या दोघांनाही खुश ठेवायची कला त्याला चांगलीच अवगत झाली होती. यामुळं दोन्ही कडची मलई खाऊन शेठजीनं चांगलीच माया गोळा केली होती. पेशव्यांनीही त्याला काही गावं इनाम दिली होती.

या खुश्रू सेठ मोदीनं नारायणपेठेत भला मोठा वाडा आणि सुंदर बाग उभारली . जिला लोक मोदी बाग म्हणून ओळखायचे. माउंट स्टुअर्ट एलफिस्टन पुण्यात येईपर्यंत या खुश्रू मोदीनं पुणे शहरात बराच धुमाकूळ घातला. पुढं कुठल्या तरी पुणेकरानं त्याच्यावर विषप्रयोग करून मारलं. कोणी म्हणतो त्यानं आत्महत्या केली. असो. 

याच काळात कोकणातल्या शिरगाव रत्नागिरी जिल्ह्यातून एक भट आडनाव असलेलं गरीब ब्राम्हण कुटुंब कामाच्या शोधात पुण्याला आलं होतं. पेशवाईमध्ये आपल्याला नक्की आश्रय मिळेल याची त्यांना खात्री होती. याच भट घराण्यातल्या एका व्यक्तीला मोदी बागेजवळ एक स्वयंभू गणपतीची मूर्ती सापडली. भटांची सिद्धीविनायकावर खूप श्रद्धा होती. त्यांनी एक छोटं देऊळ बांधून त्याची पूजा-अर्चा सुरु केली.

पुढं कालांतरानं भट घराण्याच्या सावकरीच्या व्यवसायाला उर्जितावस्था आली तसा त्यांनी आपल्या मंदिराचाही जीर्णोद्धार केला. हे साल होतं १८६८. तेव्हा या सुंदर मंदिराला लाकडी सभामंडप बांधला गेला. इथल्या गर्भगृहावरचा कळस, देवळातली गोळवणकर पेंटरनी चितारलेली अप्रतिम चित्रं, श्रींची मूर्ती एकदा जाऊन बघण्यासारखीच आहे.

बरं या गणपतीचं नाव मोदी गणपती कसं पडलं?

या मोदीबागेच्या भागात बरेच मच्छीमार लोक मासे विकायला बसत. ही मंडळी कोकणातून आली असल्यामुळं भटांच्या गणपतीची भक्त होती. या मासेबाजाराचा कलकलाट म्हणा, किंवा बोंबील विकायला येणाऱ्या भक्तांचा गणपती म्हणा या गणपतीचं नाव बोंबल्या गणपती पडलं. आजही पेठेत राहणारे जख्ख आजोबा या गणपतीला बोंबल्या गणपती म्हणूनच ओळखतात.

पुढं कालांतरानं हा मच्छी बाजार बंद झाला. देवाला असली विचित्र नावं ठेवणारी पिढीही कमी झाली पण मोदी बाग अजूनही तशीच होती. याच बागेमुळं भटांच्या बोंबल्या गणपतीचं नामकरण मोदी गणपती असं झालं.

आता नियोजित दौऱ्यानुसार मोदी तर काय दर्शनाला जाणार नाहीत आणि हा बाप्पा त्यांचं कुलदैवतही नाही, त्यांना जमत नसलं आणि तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही मात्र जाऊन या… पत्ता तर आम्ही सांगितलाय आणि पेठेतले आजोबाही सांगायला नाही म्हणत नसतात, पण त्यांना मात्र तुमच्या रिस्कवर विचारा…

संदर्भ- ग्रँटडफ. व्हॉ. ३; पेशवाईची अखेर; पेशव्यांची बखर; भा. इ. मं. अहवाल १८३८; दुसरे बाजीराव यांची रोजनिशी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.