३३५ जणांनी वापरलेल्या ऍपने ५ लाख भारतीयांचा फेसबुक डाटा कसा चोरला त्याची ही गोष्ट

२१ मार्च, २०१८. भारताचे तत्कालीन कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी एक अत्यंत खळबळजनक गोष्ट जाहीरपणे सांगितली. ते म्हणाले, आम्हाला गरज वाटली तर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना भारतात चौकशीसाठी बोलू शकतो.

फेसबूकचे मालक असलेले झुकरबर्ग यांना चौकशीसाठी बोलावण्याच्या या विधानाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली.

याच्या आधी एकदा सर्वोच्च न्यायालयाने सॅमसंगचे अध्यक्ष ली कुन-ही यांना देखील समन्स पाठवला होता. २०१४ मध्ये त्यांच्यावर एक फसवणुकीचा आरोप होता.

तर सरकारने झुकरबर्ग यांच्यावर आरोप केला होता तो केंब्रिज ॲनालिटिका. ज्याच्या माध्यतातून ५.६२ हजार भारतीयांचा डाटा चोरी झाला असण्याची शक्यता होती.

केंब्रिज ॲनालिटिका हे एक असं वादळ होतं ज्यामुळे फेसबुक सारख्या सर्वात मोठ्या कंपनीला शरमेने मान खाली घालावी लागली होती. एका दिवसातच करोडोंचं नुकसान झालं होतं. असं सांगितलं जातं की त्यांचा वर्षभराच प्रॉफिट बुडालं होतं.

हे सगळं एवढ्यावरच थांबलं नव्हतं, तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशिया यांच्या संबंधावर देखील बोट ठेवलं होतं. त्यामुळेच जगभरातून ‘डिलिट फेसबुक’ हे अभियान देखील सुरू झालं होतं.

भारतात देखील काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष एकमेकांवर केंब्रिज ॲनालिटिकाची सेवा घेण्यावरून आरोप लावत होते.

हे केंब्रिज ॲनालिटिका नेमकं काय आहे ते आधी समजून घेऊ.

तर ही एक फर्म आहे. म्हणजे कंपनी. त्यांचं काम आहे पॉलिटिकल कन्सल्टींग म्हणजेच राजकीय पक्षांना, नेत्यांना राजकीय सल्ले देणे. तुम्ही याआधी प्रशांत किशोर यांचं नाव ऐकले असेलच. तेच ज्यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी पडद्यामागची भूमिका बजावली होती.

तर या प्रशांत किशोर यांचे जे काम आहे, अगदी तसंच काहीस केंब्रिज ॲनालिटिका यांचं देखील काम आहे.

यांनी २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी काम केलं होतं. म्हणजे त्यांचा सोशल मीडिया डिजिटल कॅम्पेनिंग वगैरे यासाठी.

आता दंगा कोणत्या गोष्टीवर झाला?

आता तुम्ही म्हणालं राजकीय सल्ले देणे काही चूक आहे का? तर नाही सल्ला देणं, मदत करणं, यात चूक काहीच नाही. पण अमेरिकेतल्या ट्रम्प कॅम्पेनिंगसाठी जो डेटा वापरण्यात आला होता तो सगळा फेसबुक वरून उचलला होता. फेसबुकच्या वापरकर्त्यांना यातील कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे फेसबुक वापरकर्त्यांच्या नजरेत हा एक डेटा चोरीचा प्रकार होता.

असा आला डाटा चोरीचा सगळा प्रकार समोर

केंब्रिज ॲनालिटिकाचा हा सगळा प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा ब्रिटनचं एक न्यूज चॅनेल ‘4 न्यूज’ ने केंब्रिज ॲनालिटिकाचे हेड अलेक्झांडर निक्स यांच्यावर स्टिंग ऑपरेशन केलं. आणि ते प्रसिद्ध देखील केलं.

याच्यात अलेक्झांडर विरोधी पक्षाच्या नेत्यांना आपण ‘महिलांच्या’ माध्यमातून अडकवू शकतो, त्यांचे नको त्या स्थितीमधील फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा मध्ये कॅप्चर करू शकतो. असं म्हणताना आढळून आले. त्यातच त्यांनी आपल्या कंपनीने ट्रम्प यांच्या कॅम्पेनमध्ये कोणता रोल प्ले केला आहे हे देखील सांगितलं.

हे सगळं समोर आल्यानंतर २० मार्च रोजी त्यांना तात्काळ सस्पेंड केलं गेलं आणि तेव्हापासूनच केंब्रिज ॲनालिटिका वर सतत वेगवेगळे खुलासे येत आहेत.

त्याच दरम्यान केंब्रिज ॲनालिटिकाचा एक कर्मचारी ख्रिस्तोफर बिली ने प्रेस कॉन्फरन्स घेऊन अगदी सविस्तर उलगडून सांगितलं की केंब्रिज ॲनालिटिकाने फेसबुककडून डाटा कसा एकत्र केला. आणि आणि त्याचा टार्गेटेड ॲड कॅम्पेन चालवण्यासाठी कसा वापर केला. त्याने विसलब्लॉअर होत कंपनीची जाहीररीत्या अक्षरशः वाट लावली.

असा झाला होता फेसबुक मधून डाटा लिक

तर जेव्हा आपण फेसबुकवर साइन-इन करतो तेव्हा आपली सगळी माहिती आपण फेसबुकला देतो. यानंतर आपण तिथं जे काय करू ते सगळ्याची नोंद ठेवली जाते, यामाध्यमातून आपल्याला काय आवडते, काय आवडत नाही, काय खातो, काय पितो, कुठे जातो या आधारावर फेसबुक किंवा इतर दुसऱ्या कंपन्या आपल्या वर्तनाचा अंदाज लावतात.

यात मग अगदी बुटाच्या ब्रँडपासून ते आपल्या राजकीय आवडी पर्यंत सगळ्याचा समावेश असतो.

या सोबतच,

हल्ली तुम्ही राजकारणात जाल तर कोणत्या खात्याचे मंत्री व्हाल?, तुम्ही कोणत्या अभिनेत्या/अभिनेत्रीसारखे दिसता?, तुमचे सर्वात चांगले १० मित्र कोणते?, तुम्ही आतापर्यंत किती मुलींचं हृदय तोडलं आहे? असे प्रश्न विचारणाऱ्या ॲप्सनी फेसबुकवर धुमाकूळ घातला आहे.

हे आणि अशाच प्रकारच्या ॲपवर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जाता तेव्हा ते तुम्हाला तुमची माहिती वापरण्याची परवानगी मागते. आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी एवढे उतावीळ झालेलो असतो की, आपण आपली महत्त्वाची माहिती त्यांना वापरण्याची त्याक्षणी परवानगी देवून टाकतो.

कोट्यवधी लोकांची माहिती हे ॲप्स असेच गोळा करतात आणि एखाद्या एजन्सीला लाखो-करोडो रुपयांमध्ये विकतात.

कोगन – फेसबुक आणि केंब्रिज ॲनालिटिका यांच्यामधली संबंध

केंब्रिज यूनिवर्सिटी (केंब्रिज ॲनालिटिकाशी संबंध नाही) मधून पास आऊट झालेला एक रिसर्च स्कॉलर एलेक्सान्दर (मालदिवन नाव) कोगन ने फेसबुकवर ॲप बनवलं ”This Is Your Digital Life” असं त्याचं नाव होतं.

यामधून पर्सनालिटी सर्वे करायचा होता. लोकांकडून त्यांची खाजगी माहिती गोळा करायची होती. पण या ॲपने फक्त त्याच लोकांची माहिती गोळा केली नाही तर यांच्या माध्यमातून त्यांच्या मित्रांचा पण डाटा गोळा केला. ज्यामुळे एलेक्सान्दर जवळ एक मोठी डेटा बँक तयार झाली आणि हीच डेटा बँक त्यांनी केंब्रिज ॲनालिटिकाला विकली.

आणि हाच डाटा केंब्रिज ॲनालिटिकाने अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प कॅम्पेनिंगला फायदा पोचवण्यासाठी वापरला.

केंब्रिज ॲनालिटिकाने देखील हे मान्य केलं आपल्याला कोगनने डाटा दिला होता.

तर दुसरीकडे फेसबुक म्हणतं आहे की, कोगन आणि केंब्रिज ॲनालिटिका यांच्या दरम्यान जो करार झाला त्याची आपल्याला माहिती नव्हती. पण फेसबुकने हे मान्य केले आहे की ज्या पद्धतीने डाटाचा वापर झाला तो फेसबुक युजर्सच्या अधिकारांचं उल्लंघन होतं.

तर कोगन म्हणत आहे आहे की जे काही झालं हे सगळं कायदेशीर पद्धतीने झालं

या सगळ्यात भारताचं नाव कुठे आलं?

ट्रम्प सरकारची कथित मदत करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या फर्मचा संबंध भारताशी तेव्हा आला जेव्हा चीफ एक्झिक्यूटिव्ह अलेक्झांडर निक्स आणि मॅनेजिंग डायरेक्टर (पॉलिटिकल) मार्क टर्बुनल यांनी ‘4 न्यूज’ वाल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आपण भारतात देखील एक्टिव्ह असल्याचं सांगितलं.

याच खळबळजनक गौप्यस्फोटानंतर लोकांनी केंब्रिज ॲनालिटिकाची वेबसाईट बघायला सुरुवात केली. यात त्यांचे दोन भाग होते. कमर्शियल आणि पॉलिटिकल. पॉलिटिकलच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला एक केस स्टडीची लिंक येत होती. इथे आशिया आणि नंतर इंडिया असा ऑप्शन निवडल्यानंतर एक केस स्टडी समोर येते.

त्यानुसार,

२०१० मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये या कंपनीची मदत घेण्यात आली होती. कोणता पक्ष ते पुढे सांगतो, पण आधी त्यांचं काम काय होत, तर त्यांची मुख्य जबाबदारी होती पक्षाचे मतदार ओळखणे. ते पक्षाच्या कितपत जवळ आहेत. अजेंड्याकडे कसं बघतात, पक्षासाठी किती उदासीन आहेत अशा सगळ्या गोष्टी.

या रिसर्च सोबत केंब्रिज ॲनालिटिकाला ग्रामीण स्तरावर पक्षाच्या संघटनेला व्यवस्थित करण्याचं काम देखील मिळालं. कारण मतदारांशी संवाद आणि संपर्क वाढवायचा होता.

निवडणुकीनंतर केंब्रिज ॲनालिटिकाने सांगितलं, ज्या जागांवर आम्ही काम केलं त्यातील ९० जागांवर आमच्या क्लाइंटला (ज्या पक्षासाठी काम केलं होत त्या पक्षासाठी) मिळाल्या. 

२०१० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त जागा आणि सत्ता मिळाली होती भाजप आणि जनता दल युनायटेडला.

आता आणखी एक गोष्ट. तुम्ही म्हणाल की केंब्रिज ॲनालिटिकाची स्थापना तर २०१३ मध्ये झाली होती. तर थांबा. कारण स्ट्रॅटेजिक कम्यूनिकेशन्स लॅबोलेटरीज प्रायवेट लिमिटेड (SCL) आणि ऑवलेना बिजनेस इंटेलिजन्स (OBI) या दोन पार्टनर कंपनी आहेत.

जनता दल (युनाइटेड)चे नेता के. सी. त्यागी यांचा मुलगा अमरीश त्यागी यांची ही OBI कंपनी. तिने भाजपा, काँग्रेस आणि जनता दल युनाइटेडसाठी काम केलं आहे. SCL ही जी कंपनी आहे ती केंब्रिज ॲनालिटिकाची मालकी हक्क असलेली कंपनी. ही आहे ब्रिटिशची कंपनी, जी भारतात देखील काम करते. ग़ाज़ियाबादमध्ये त्यांचं ऑफिस होत.

आता आणखी एक गोष्ट, या SCL कंपनीचे डायटेक्टर आहेत, अमरीश त्यागी आणि अलेक्झांडर निक्स

अलेक्झांडर निक्स म्हणजे तेच केंब्रिज ॲनालिटिकाचे हेड आणि ज्यांचं स्टिंग ऑपरेशन बाहेर आलं.

OBI ने त्यावेळी हे देखील मान्य केलं होत की, त्यांनी भारतात २०१२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपसाठी, २०११ मध्ये झारखंड विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेससाठी आणि २०१२ मध्ये युथ काँग्रेससाठी काम केलं आहे, पण ते हे देखील सांगतात की, त्या दरम्यान आम्ही कोणताही नियम तोडलेला नाही.

यानंतर सीबीआयने तपास सुरु केला. 

यानंतर २०१८ मध्ये भारतात सीबीआयने यासंबंधीचा तपास सुरु केला होता, सुरुवातीच्या तपासात युनायटेड किंगडमच्या या दोन कंपन्यांचा डाटा चोरीच्या बाबतीत हात असल्याच सीबीआयने सांगितलं होत.

सीबीआयने त्यासाठी फेसबुक आणि केंब्रिज ॲनालिटिकाला काही डिटेल्स मागितले होते, यात किती डाटा चोरी झाला, त्याचा चुकीचा वापर कसा होऊ शकतो, वगैरे. सोबतच हे देखील विचारलं होतं की, केंब्रिज ॲनालिटिका कशा पद्धतीने भारतातील निवडणूक प्रभावित करण्यासाठी या डाटाचा वापर करू शकते.

भारतीयांचा डाटा कसा आला बाहेर?

तर याच उत्तर सीबीआयने दाखल केलेल्यात FIR मध्ये मिळत. त्यामध्ये लिहिलंय की ,

“डॉ एलेक्सान्दर कोगन ग्लोबल सायन्स प्रायवेट लिमिटेडचे फाउंडर आणि डायरेक्टर आहेत. त्यांनी फेसबुकवर एक ॲप बनवलं होत. ज्याचं नाव ‘This Is Your Digital Life’ असं होत. 

फेसबुकच्या पॉलिसीनुसार हे ॲप काही अकेडमिक आणि रिसर्च कामासाठी युजर्सचा काही डाटा गोळा करत आहे. पण या ॲपने युजर्सच्या फ्रेंड नेटवर्क सुद्धा शोधून काढले. 

आता ग्लोबल साइंसवर हा आरोप आहे की, त्यांनी जो काही डाटा गोळा केला त्याला केंब्रिज ॲनालिटिकासोबत शेअर केला. त्यानंतर केंब्रिज ॲनालिटिकाने त्या डाटाचा वापर आपल्या मनमानी पद्धतीने केला.

यावर फेसबुकने पुन्हा उत्तर दिल. 

भारतात केवळ ३३५ यूजर्सनेच या ॲपचा वापर केला आहे. त्या ३३५ वापरकर्त्यांच्या माध्यमातून हे ॲप यूजर्सच्या मित्रांपर्यंत पोहचले. याच फ्रेंडशिप नेटवर्कला फॉलो करत ॲपने लाखो युजर्सचा डाटा कव्हर केला. अशा पद्धतीने ५.६२ लाख लोकांचा डाटा अवैध पद्धतीने वापरला गेला असण्याची शक्यता आहे.

सध्या सीबीआयने केंब्रिज ॲनालिटिका विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे. जशी काही नवीन माहिती येत राहील तसं ती आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवत राहू.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.