बुद्धीमान चाणक्यचा खून कसा झाला ? 

राजकारणातला सर्वात बेस्ट डाव टाकला तर त्याला चाणक्यनिती म्हंटलं जातं. तो टाकणाऱ्याला चाणक्य म्हंटलं जातं.  शरद पवारांपासून ते अमित शहा अनेकांचा उल्लेख राजकारणातले चाणक्य म्हणून केला जातो. इतकंच काय तर स्वत:चा शहाणपणा सांगायचा झाला तर तो आपल्याला चाणक्याच्या नावावर फोटोशॉप करुन खपवावा लागतो. गेल्या कित्येक वर्षातला सक्सेसचा ब्रॅण्ड म्हणून कोणाच नांव ठामपणे घेता येईल तर ते ‘आचार्य चाणक्य’.

पण तुम्हांला माहितेय का ? याच अतिहुशार आणि कुटिल आचार्य चाणक्य यांचा मृत्यू नेमका कसा झाला ?

जगात अनेक गोष्टींबद्दल लोकांची मतमतांतरे असतात. असं चाणक्य सांगतो. चाणक्यच्या खूनाबाबत देखील याच त्यांच्या ‘कधीच न सांगितलेल्या’ वाक्याचा दाखला द्यावा लागतो. चाणक्य यांच्या खुनाबाबत देखील मतमतांतरे आहेत.

पहिली थेअरी.

चंद्रगुप्त मौर्यानंतर  बिंदुसार  गादीवरती विराजमान झाले. चंद्रगुप्त मौर्यप्रमाणेच बिंदुसारचे गुरू देखील आचार्य चाणक्य होते. मात्र बिंदुसारच्या काळात अंतर्गत राजकारणाचा कडेलोट झाला. याच काळात बिंदुसार आणि आचार्य चाणक्य यांच्यामध्ये मतभेद होऊ लागले. या मतभेदाचा फायदा बिंदुसार यांच्या राजदरबारातील सुबंधु यांनी घेतला.

दरबारात मंत्री असणाऱ्या सुबंधु यांनी चाणक्याविषयी बिंदुसारचे कान भरण्यास सुरवात केली. त्यातून आचार्य चाणक्य अज्ञातवासात गेले. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.हा मृत्यू राजदरबारातील लोकांनी घडवून आणला. आपल्याकडून चुक झालीये असं वाटून बिंदुसार  एकट्याने जिवन कंठू लागला व त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला.

दूसरी थेअरी.

सेम वरीलप्रमाणेच चंद्रगुप्त मौर्यनंतर बिंदुसार राजगादीवर विराजमान झाला. पण या थेअरीनुसार बिंदुसारला एका सेविकेकडून आपल्या जन्माची कहानी समजली.

स्टोरी फ्लॅशबॅकमध्ये,

चाणक्य गुरूंची अशी इच्छा होती की, आपल्या राजाने सर्वशक्तीशाली व्हावं. त्यातूनच चाणक्य गुरू राजावरती न कळतपणे विषप्रयोग करत असत. रोज विषाची मात्रा वाढवत नेत. यामुळे राजाच्या अंगी प्रतिकारशक्ती निर्माण होईल असा चाणक्य गुरूंचा समज होता. मात्र एके दिवशी चुकून राजाच्या पत्नीने राजाचं अन्न खाल्ल.

राणी गर्भवती होती. राणीला विषबाधा झाली. आपल्याला वंश मिळणार नाही, या भितीनं चंद्रगुप्ताने राणीचं पोट फाडलं आणि बिंदुसार राजा जन्माला आल्याचं बोललं जातं. आपल्या आईच्या मुत्यूचं कारण चाणक्य आहे हे समजल्यानंतर बिंदुसारने चाणक्यचा खून केला असं देखील सांगितलं जातं.

तर अशा या दोन थेअरी. हे खरं खोटं हे थेअरी मांडणाऱ्यांनाच माहिती.

खरं असो किंवा खोटं पण त्यामुळे चाणक्याचा महान ग्रंथ अर्थशास्त्र फेल होत नाही. तसंही हा ग्रंथ काय सांगतो याचा विचार न करता आपापले विचार चाणाक्याच्या नावावर खपवणारे अनेकजण आजही चाणाक्याचा खूनच करत असतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.