जडेजानं चेन्नईची कॅप्टन्सी वशिल्यानं नाय मेहनतीनं कमावलीये…

सध्या क्रिकेटविश्वात फक्त एकाच गोष्टीची चर्चाय, धोनीनं चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व सोडलं. धोनी शिवाय चेन्नई ही कल्पना करणंच लई जणांसाठी अवघड आहे. पण आपण सचिनशिवाय क्रिक्रेट बघायची सवय लाऊन घेतली, तशीच आता धोनीशिवायही क्रिकेट बघावं लागणार आहे. कॅप्टन्सी सोडत त्यानं आपल्या एक्झिटची नांदी दिलीच आहे.

पण हे सगळं असूनही, चेन्नईच्या फॅन्सला टेन्शन नाय आलं किंवा आपल्या टीमचं कसं होणार असा प्रश्नही पडला नव्हता. कारण अगदी सिम्पल आहे… धोनीनं उत्तराधिकारी निवडलाय… सर रवींद्र जडेजा.

एक जमाना होता, जेव्हा धोनी सोशल मीडियावर खतरनाक ऍक्टिव्ह असायचा.

त्यानंच जडेजाला उपाधी दिली होती… ‘सर’

त्याकाळात जगात तीन लोकं काहीही करु शकत होती, रजनीकांत, मकरंद अनासपुरे आणि रवींद्र जडेजा.

भारतीय टीममध्ये जडेजानं बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही डिपार्टमेंटमध्ये नाव कमावलं आणि नाणं खणखणीत वाजवलं. आयपीएलमध्ये त्यानं राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात लायन्स आणि पुन्हा चेन्नई सुपर किंग्स असा प्रवास केला. धोनीच्या अनुपस्थितीत काही वेळा रैनानं चेन्नईचं नेतृत्व केलं, पण पहिल्यांदाच चेन्नईला धोनी सोडून दुसरा फुल टाईम कॅप्टन मिळालाय, रवींद्र जडेजाच्या रूपात.

पण मास्टरमाईंड धोनी आणि चेन्नईच्या हुशार थिंक टॅंकनं जडेजाचीच निवड का केली? यामागची ऑफ द फिल्ड कारणं अनेक असली, तरी मैदानावरची कारणं काय आहेत हे बघुयात.

कुठल्याही कप्प्यात बसणारी बॅटिंग-

जडेजाची मेन ताकद आहे, त्याच्या फटकेबाजीत. जडेजा क्रीझवर आलाय, हातात बॉल कमी आहेत आणि तो सेट व्हायला वेळ घेतोय असं फार कमी वेळा दिसतं. समोरचा बॉलर कुणीही असला तरी जडेजा तुटून पडायचं काम अगदी परफेक्ट करतो. प्लेअर भारी कशामुळे बनतात, तर समोरच्या परिस्थिती कशीही असली, तरी ती योग्यपणे हाताळतो. जडेजा भारी असण्याचं कारण हेच आहे.

तो सहाव्या नंबरवर आला, तर पहिल्या ओव्हरपासून धुवाधुवी असते. पण तेच जर तो चौथ्या किंवा पाचव्या नंबरला आला, तर तो गोष्टींचा अंदाज घेतो, लगेच रिस्क घेत नाही. फक्त आयपीएल २०२१ बद्दल बोलायचं झालं, तर जडेजाचा स्ट्राईक रेट होता १४५.५१. विशेष म्हणजे ९ इनिंग्स खेळून भावाचं ॲव्हरेज ७५ च्या वर आहे.

बॅटिंगचा विषय निघालाच आहे, तर जडेजाच्या एका इनिंगबद्दल सांगायलाच हवं, २०२१ चीच आयपीएल. आरसीबी विरुद्ध सीएसके मॅच होती. चेन्नईचा स्कोअर झालेला, १९ ओव्हर्समध्ये ४ आऊट १५४. जडेजा २१ बॉल्समध्ये २६ वर होता. लास्ट ओव्हर संपली तेव्हा चेन्नईचा स्कोअर होता १९१. डोक्यावर पर्पल कॅप असणाऱ्या हर्षल पटेलला जडेजानं ओव्हरला ३६ रन्स मारले, ५ सिक्स, १ फोर आणि १ डबल. पटेलला नोबॉलही महाग पडला होता आणि बँगलोरला जडेजाचा शून्यावर सुटलेला कॅच.

एका ओव्हरमध्ये जडेजानं मॅचचा नूर पालटला.

साधी, सरळ पण अवघड बॉलिंग-

त्याच मॅचबद्दल बोलू. बॉलिंगमध्ये जडेजानं तीन विकेट्स काढल्या, वॉशिंग्टन सुंदर, एबी डिव्हिलिअर्स आणि ग्लेन मॅक्सवेल. कोहली गेल्यावरही एबीडी आणि मॅक्सवेल मॅच फरवू शकत होते. पण जड्डूनं बँगलोरच्या फुग्याला टाचणी मारली.

थोडं डीप जाऊन बोलायचं म्हणलं, तर स्पिनर असलेला जडेजा काय हातभर बॉल वळवण्यामुळं फेमस नाहीये. तो बॉल अगदी परफेक्ट लेंथला ठेऊन खेळवतो, नायतर स्पीडमध्ये बदल करुन फसवतो. त्याचे व्हेरिएशन्सही मनगटाच्या पोझिशनवरुन किंवा ऍक्शनवरुन लक्षात येत नाहीत. इतर स्पिनर्सपेक्षा स्पीड जास्त असल्यानं बॅट्समनला पटकन पुढं पाय काढणं झेपत नाही. त्यात जर जडेजानं टप्पा पकडला, तर तो सलग काही ओव्हर्सही एकाच टप्प्यावर टाकू शकतो.

टी२० मध्ये जडेजाच्या बॉलिंगमधल्या दोन गोष्ट भारी आहेत. एक म्हणजे तो जास्त रन्स देत नाही. फारशी रुम मिळत नसल्यानं बॅट्समनला हात खोलायला वेळ मिळत नाही आणि मोठे फटके मारणं अवघड होऊन जातं. 

दुसरी गोष्ट म्हणजे त्याची चपळता. छोटासा रनअप आणि स्पीडमुळं जडेजाची ओव्हर अगदी पटकन संपते. ओव्हर रेट काहीसा स्लो सुरू असला, की जडेजाची एखादी ओव्हर पटकून निघू शकते. त्यात तो बॅट्समनला व्यवस्थित अनसेटल करु शकतो.

वस्ताद फिल्डर-

या सेक्शनमध्ये लय काय लिहायची गरज नाय. सध्याच्या काळात जडेजा हा एकमेव प्लेअर असावा जो आपल्या टीमला फक्त फिल्डिंगच्या जोरावर मॅच जिंकवून देऊ शकतो.मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यातून जडेजा स्टंप उडवू शकतो. त्याचा हात जमिनीपासून अगदी पॅररल येऊन ज्या स्पीडनं थ्रो येतो, की त्याच्या हाताला रॉकेट आर्म का म्हणतात, हे सहज लक्षात येईल.

या तीन गुणांसोबतच आणखी दोन गुण जडेजाला भारी बनवतात.

जडेजा आऊट ऑफ फॉर्म कधी गेलाय आठवतं का? झटकन आठवणारच नाही. गुगल करावं लागेल. जडेजाच्या कामगिरीत प्रचंड सातत्य आहे. एका डिपार्टमेंटमधलं योगदान कमी झालं असेल, तर जडेजा भात्यातून दुसरी दोन अस्त्रं काढतोच. अगदी पन्नास रन्स नाही झाले, तरी कमी बॉलमध्ये जास्त रन्सचं युटिलिटी पॅकेज जडेजाकडे असतंच. फिटनेसच्या जोडीला असलेला हाच फॉर्म जडेजाला भारी बनवतो.

जडेजा टीकांकडे फारसं लक्ष देत नाही आणि त्याचं प्रेशरही घेत नाही. एखाद्यानं त्याला डिवचलंच, तर पुढच्या एक दोन मॅचेसमध्येच जडेजाचा भारी परफॉर्मन्स येतो आणि गडी कॅमेराकडे बघून नुसतं हसतो.

कितीही टेन्स सिच्युएशन असली, तरी जडेजा आपल्या झोनमधून बाहेर येत नाही. तो भला आणि त्याचा खेळ भला, फक्त फिफ्टी आणि शतक झाल्यावर बॅटची तलवार होते.

काही दिवसांपूर्वीच तो कसोटी क्रमवारीत एक नंबरचा ऑलराऊंडर ठरला, द्विशतकाची सुवर्णसंधी असताना त्यानं टीमला प्राधान्य देत इनिंग डिक्लेअर करायला लावली, समोरचा प्लेअर नवखा असल्यावर त्यानं स्वतः एक स्टेप मागं राहून त्याला स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली.

आता कॅप्टन्सीचा मुकुट डोक्यावर आला असला, तरी त्याच्यावर प्रेशर नसेल, असेल तर फक्त जिंकण्याची जिद्द.

राजघराण्याची परंपरा असलेल्या जडेजाचे वडील वॉचमनचं काम करायचे, तर आई नर्स होती. त्याचं बालपण काय ऐषोआरामात गेलं नाही. आईचं अचानक निधन, घरातली आर्थिक परिस्थिती, अभ्यासात नसलेला रस अशा कित्येक गोष्टी होत्या…

यातून निसटण्याचा जडेजाला एकच मार्ग मिळाला… क्रिकेट. जो त्याचं आयुष्य ठरला.

जामनगरमधलं एक पोरगं आयपीएलमधल्या बाप टीमचं कॅप्टन बनलंय, तेही धोनीचा वारसा म्हणून. ही गोष्टच तशी लय मोठी आहे. जडेजाला एक कॉमेंटेटर ‘बिट्स अँड पिसेस प्लेअर’ म्हणला होता. आज जडेजानं सगळे तुकडे जोडून एक भारी चित्र पूर्ण केलं, जे बघून म्हणावं वाटलं,

मामू आसमाँ देखते रहे, और बच्चे ने चाँद चूम लिया…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.