आयपीएलच्या राड्यात पुजारा कुठंय? गडी कौंटी क्रिकेटमध्ये भारताचा बदला पूर्ण करतोय…

भारताचा २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिया दौरा, पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये ३६ वर ऑलआऊट होऊन टीम इंडियाचा बाजार उठला होता. त्यात या टेस्टनंतर कॅप्टन विराट कोहली आपल्या मुलीच्या जन्मासाठी भारतात आला. तेव्हा भारतासाठी पुन्हा एकदा धाऊन आला, चेतेश्वर पुजारा.

पुजारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकला, तेव्हापासून त्याला ओळख मिळाली प्रतिद्रविड. कारण द्रविड सारखाच डिफेन्स, त्याच्यासारखंच एकदा खेळपट्टीवर उभं राहीलं की टिच्चून खेळायचं, स्वभावही शांत आणि जे काय राडे आहेत ते फक्त बॅटिंगमध्ये असे सगळे गुण पुजारामध्ये होते.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, कांगारू बॉलर्सचे बाऊन्सर्स अंगावर खात, पुजारा क्रीझवर ठाण मांडून उभा राहिला आणि भारतानं फक्त मॅचच नाही तर सिरीज जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला. पुजारा सगळ्या देशाचा हिरो बनला होता.

आपल्या युवराज सिंगचं एक गाजलेलं वाक्य आहे, “जब तक बल्ला चल रहा है, तब तक थाट है.”

तसंच काहीस पुजारा सोबत झालं, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर त्याचा फॉर्म गंडला. तो क्रीझवर थांबून १००-२०० बॉल किरकोळीत खेळायचा, पण रन्स व्हायचे ३०-३५. फिफ्टीचा आकडा कधीतरीच लागायचा. त्याच्या शांतीत क्रांती बॅटिंगचं कौतुक करणारेही आता त्याच्यावर टीका करू लागले.

दुसऱ्या बाजूला भारतीय क्रिकेट विश्वातही बरंच काही घडत होतं. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा नवा कॅप्टन झाला. आता अनेक यंगस्टर्सला संधी मिळेल असा संदेश गेला होताच. श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सिरीजसाठी टीम जाहीर झाली आणि पुजारा संघातून बाहेर गेला.

लोकांनी त्याच्या कारकिर्दीवर मारला फुलस्टॉप.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर सगळी दुनिया आयपीएल, विराट कोहली आणि मुंबई इंडियन्सच्या गंडलेल्या फॉर्मची चर्चा करू लागली. त्यामुळं पुजारा कुठं गेला, काय करतो हे काय फार बातम्यांमध्ये येत नव्हतं.

मग नेहमीप्रमाणं पुजाराची बॅट बोलायला लागली. कुठं? तर कौंटी क्रिकेटमध्ये. 

ज्यावेळी भारतात आयपीएल सुरू असते, त्याचवेळी इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट सुरू असतंय. आता कौंटी क्रिकेट म्हणजे काय तर त्यांच्याकडची रणजी स्पर्धा. वेगवेगळ्या ‘कौंटीज’ (क्लब्स) आमने-सामने येतात, प्रॉपर टेस्ट क्रिकेटसारख्या कडक मॅचेस होतात. 

महत्त्वाचं म्हणजे यात फक्त यंगस्टर्सच नाही, तर अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचाही समावेश असतो. इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायर झालेले कित्येक दिग्गज इथं बॅटिंग करत असतात.

आपला पुजाराही गेल्या काही वर्षांपासून कौंटी क्रिकेट खेळतोय, इंग्लिश कंडिशन्समध्ये खेळण्याचा, स्विंग बॉलिंगला सामोरं जाण्याचा अनुभव घेण्यासाठी कौंटी क्रिकेट फायद्याचं असतंय. सोबतच इंग्लंडमधल्या वातावरणात रन्स झाले, की तुम्हाला कॉन्फिडन्स पण मिळत असतोय.

तुम्हाला एवढं पुराण सांगितलं, कारण यंदाच्या कौंटीमध्ये पुजारानं जबरदस्त हवा करतोय.

यावर्षी तो खेळतोय, ससेक्स कौंटी कडून. जेव्हा यंदाच्या सिझनमधली पहिली मॅच होती, तेव्हा पुजारा पहिल्या इनिंगमध्ये ६ रन करुन आऊट झाला, मात्र पुढच्या इनिंगमध्ये त्यानं नॉटआऊट २०१ रन्स मारले. साहजिकच बातमी पेपरपासून सोशल मीडियापर्यंत सगळीकडे पसरली.

काही कुजकी लोकं तरी म्हणालीच की मटकाय हा. पण भावानं पुढच्या मॅचमध्येही १०९ केले. बरं हे कमी की काय म्हणत, तिसऱ्या मॅचमध्ये डरहमच्या बॉलिंगला चोपत २०३ रन्स केले. थांबायचं नाव त्यानं चौथ्या मॅचमध्येही घेतलं नाही, मिडलसेक्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये टीमला गरज असताना त्यानं नॉटआऊट १७० रन्स चोपले.

सलग चार मॅचेसमध्ये सेंच्युरीज, त्यातही दोन डबल सेंच्युरीज आणि हे सगळं कुठं? तर जिथं भल्याभल्यांचा बाजार उठतो, त्या इंग्लिश कंडिशन्समध्ये.

मिडलसेक्स विरुद्ध ससेक्स या मॅचमध्ये आणखी एक लक्षवेधी मॅच होती.

शाहीन शाह आफ्रिदी विरुद्ध चेतेश्वर पुजारा.

आता हा आफ्रिदी म्हणजे लाला आफ्रिदीचा जावई. २०२१ च्या टी२० वर्ल्डकपमध्ये यानीच आपल्या बॅटिंगची हवा काढून घेतली होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टेस्ट सिरीजमध्येही आफ्रिदीनं कांगारूंना सतावलं होतं. थोडक्यात सामना बरोबरीचा होता.

या सामन्यात आफ्रिदी भारी पडला असता, तर त्यानं दिलेली जखम आणखी खोल झाली असती. पण पुजारानं आपली भिंत त्याच्यासमोरही खडी केली. आफ्रिदी बाऊन्सर मारायला लागला, तेव्हा त्यानं आधी सोडून दिले. मग जरा दिशा भरकटलेली दिसली तेव्हा अप्पर कट मारुन छकडा टाकला.

असं भर उन्हाळ्यात गारव्याची झुळुक आल्यासारखं झालं. एकतर पुजाराला सिक्स मारताना पाहिलं, सिक्स कुणाला तर शाहीन आफ्रिदीला आणि तेही टेस्ट मॅचमध्ये. आता कुठं वर्ल्डकप मधल्या जखमेनं खपली धरली.

त्याच वर्ल्डकप मॅचमध्ये भारताचा बाजार उठवणारा आणखी एक कार्यकर्ता होता, तो म्हणजे मोहम्मद रिझवान. कौंटीमध्ये रिझवान आणि पुजारा एकाच टीमकडून खेळतायत. हे बघून रिझवान इतका इम्प्रेस झालाय की, गडी पुजाराचं कौतुक करताना थांबत नाहीये.

जसं आधी पाकिस्तानचे प्लेअर सचिन, दादा, द्रविडचं करायचे, ती परंपरा पुजारा आणि विराटच्या रुपानं सुरू राहिलीये.

फॉर्म गंडलेला पुजारा कौंटीमध्ये खेळून परत फॉर्मात आलाय, संघातल्या जागेवर दावेदारी सांगण्याचे त्याचे चान्सेस देखील वाढलेत. याआधीही सुनिल गावसकर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गौतम गंभीर, युवराज सिंग अशा कित्येक भारतीय प्लेअर्सनं ही स्कीम वापरलीये.

एकदा विराट कोहलीही कौंटी खेळायला जाणार होता, पण दुखापतीमुळं घोडं अडलं.

पुजाराचा फॉर्म गेल्यावर त्याला बाहेर बसवायचं म्हणणारे आज त्याचं कौतुक करतायत, टी२० मधल्या हाणामारीपेक्षा पुजाराची संयमी पण सुंदर बॅटिंग बघणं हा कधीपण भारी विषय आहे. एवढं भारी खेळून पुजारानं सिलेक्शन, फॉर्म याबद्दल एकही शब्द बोलला नाही, त्यानं फक्त यंदाच्या कौंटी क्रिकेटमध्ये ४ मॅचेसमध्ये ७१७ रन्स मारले… शब्दांपेक्षा त्याची बॅट जास्त बोलली.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.