मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरेंचं कसं बिनसत गेलं ?

आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत सक्रिय नसलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. आधी त्यांनी लीलाधर डाके यांची भेट घेतली, तर त्यानंतर गुरुवारी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेत, बराच वेळ चर्चाही केली.

एकनाथ शिंदे यांनी ही राजकीय भेट नसून आशिर्वादपर भेट असल्याचं सांगितलं असलं, तरी या भेटीमागे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बदल करण्यासाठी प्रतिनिधी सभेवर वर्चस्व मिळवणं, शिवसेना नेते असणाऱ्या मनोहर जोशींना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करणं अशी कारणं असल्याची चर्चा आहे.

पण शिंदेंनी मनोहर जोशी यांची भेट घेण्यामागचं मुख्य कारण सांगितलं जातंय, ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांचे बिनसलेले संबंध…

साल २०१३, बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर शिवसेनेची सगळी सूत्र पूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या हाती आली होती. बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत होणार पहिला दसरा मेळावा कसा होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्या मेळाव्यात मनोहर जोशींना स्टेजवरुन काढता पाय घ्यावा लागला होता. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनीही त्यांना थांबवलं नाही. ती घटना म्हणजे या दोघांमधल्या तणावाचं टोक होती.

दसरा मेळावा हे निमित्त ठरलं असलं, तरी या निमित्ताला कारणीभूत बऱ्याच गोष्टी होत्या…

मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते. रस्त्यावर उतरुन राडा करण्यासाठी, आंदोलनांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शिवसेनेला मनोहर जोशींच्या रुपानं व्हाईट कॉलर नेतृत्व मिळालं होतं. तीन टर्म विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिलेवहिले मुख्यमंत्री अशी अनेक पदं त्यांनी भूषवली. मुख्यमंत्री म्हणून आपली कारकीर्द पूर्ण करण्याआधीच भ्रष्टाचाराचे आरोप आणि बाळासाहेबांच्या नाराजीमुळे त्यांनी राजीनामा दिला होता.

पुढच्या निवडणुकीत त्यांना लोकसभेवर पाठवण्यात आलं, केंद्रीय मंत्री, लोकसभा सभापती अशा संधीही मिळाल्या. त्यांचं नाव थेट उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत पोहोचलं. मुख्यमंत्रिपदावेळीही सुधीर जोशी यांचं नाव चर्चेत असताना मोठ्या शिताफीनं जोशींनी खुर्ची मिळवली होती.

मग इतका मोठा नेता सेनेतून साईडलाईन कसा झाला आणि उद्धव ठाकरे आणि जोशींचं नेमकं बिनसलं कसं..?

२००४ मध्ये मनोहर जोशी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, तेही फक्त ८ हजार मतांनी. लोकसभा सभापती, माजी मुख्यमंत्री असणाऱ्या जोशींचा मुंबईतच पराभव झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण शिवसेनेनं लगेचच डॅमेज कंट्रोल करत त्यांना राज्यसभेवर पाठवलं. २००९ मध्ये पुन्हा एकदा मनोहर जोशी लोकसभेसाठी उत्सुक होते, मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. राज्यसभेची टर्म संपल्यावर त्यांच्याऐवजी अनिल देसाईंची वर्णी लागली.

विशेष म्हणजे या कालावधीत तिकीट वाटपाचे निर्णय पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतून होत होते. राज ठाकरे, नारायण राणे अशा नेत्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला होता. प्रकृतीच्या कारणांमुळे बाळासाहेबांचा झंझावातही काहीसा मंदावला होता. अशातही मनोहर जोशींना फारशी संधी देण्यात येत नव्हती.

त्यातच मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये दादरमधून मनोहर जोशींच्या निकटवर्तियांना पराभव स्वीकारावा लागला. आधी लोकसभा, मग विधानसभा आणि मग महानगरपालिका अशा सलग तिन्ही वेळा दादरमध्ये शिवसेनेची पिछेहाट होत गेली. याला जोशींची रणनीती आणि स्वतःकडेच पॉवर ठेवण्याची इच्छा कारणीभूत असल्याची चर्चा झाली.

नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळासाहेबांचं निधन झालं. त्यानंतर शिवसेना पूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या अखत्यारीत आली. अशातच साईडलाईन झालेले मनोहर जोशी पुन्हा लोकांमध्ये दिसू लागले, त्यांचा मातोश्रीवरचा वावरही वाढत होता. पण सगळं काही आलबेल नव्हतं.

२०१४ च्या निवडणुकांना सामोरं जाण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होतं. त्याचवेळी मनोहर जोशींनी दक्षिण मध्य मुंबईतून उभं राहण्यासाठी उत्सुकता दाखवली. याआधी त्यांना मुंबईत सपाटून पराभव स्वीकारावा लागला होता, मात्र तरीही आपण दक्षिण मध्य मुंबईतून निवडून येऊ असा विश्वास त्यांना होता. मात्र मतदारसंघात बळ मिळालं ते उद्धव ठाकरेंचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या राहुल शेवाळे यांना.

सगळ्या मतदारसंघात त्यांचे बॅनर झळकू लागले आणि अप्रत्यक्ष्यपणे मनोहर जोशींना मेसेज पोहोचवण्यात आला.

त्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली होती. तेव्हा बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा चर्चेत होता. जोशींनी त्यावरुन थेट उद्धव यांनाच लक्ष्य केलं.

ते म्हणाले होते, ‘जर बाळासाहेबांना आपल्या वडिलांच्या स्मारकासाठी इतकी वाट पाहावी लागली असती, तर त्यांनी थेट सरकारच पाडलं असतं.’ या टोल्यामुळे शिवसैनिकांमध्ये त्यांच्या विरोधात चांगलीच नाराजी पसरली.

मनोहर जोशींच्या नाराजीच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगलेल्या होत्या, मात्र उद्धव ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या. पण या चर्चांना खतपाणी मिळालं ते मनोहर जोशींनी घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीमुळं.

दक्षिण मध्य मुंबई मधून त्यांना तिकीट मिळणार नाही हे जवळपास निश्चितच होतं, सेनेकडून त्यांना कल्याणचा पर्याय सुचवण्यात आला होता. पण इतक्या मोठ्या नेत्यानं बालेकिल्ला सोडणं कठीण होतं. अशातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. 

त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याचं सांगण्यात येत असलं, तरी उद्धव यांच्यावर असलेली नाराजी आणि तिकीट मिळण्याची धूसर शक्यता या गोष्टींमुळं मनोहर जोशी सेना नेतृत्वावर प्रेशर निर्माण करत असल्याचं चित्र उभं राहीलं.

या सगळ्याचा परिणाम दिसला तो २०१३ च्या दसरा मेळाव्यात

उद्धव ठाकरे यांचं आगमन झालं तरी मनोहर जोशी मात्र स्टेजवर आले नव्हते. जेव्हा मनोहर जोशी स्टेजवर आले तेव्हा शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात ‘मनोहर जोशी हाय हाय, मनोहर जोशी मुर्दाबाद’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं, मात्र घोषणा सुरूच राहिल्या. अखेर मनोहर जोशींनी स्टेजवरुन काढता पाय घेतला, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.

आपल्या भाषणातही त्यांनी झाल्या प्रकाराचा उल्लेख केला नाही, ते फक्त म्हणाले, “मी शिवसेनेत बेबंदशाही खपवून घेणार नाही.”

त्यानंतर मनोहर जोशींनी जे काही घडलं ते शिवसैनिकांच्या गैरसमजातून घडलं आणि मी उद्धव यांच्या नेतृत्वविरोधात कधीच काही बोललेलो नाही, अशी सारवासारव केली.

मात्र भर दसरा मेळाव्यात उद्धव यांच्यासमोर शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांचा अपमान होऊनही उद्धव त्यावर बोलले नाहीत, याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

या दसरा मेळाव्यानंतर मनोहर जोशी सक्रिय राजकारणातुन जवळपास नाहीसेच झाले. शिवसेना दोनदा सत्तेत येऊनही त्यांच्यावर कोणतीच जबाबदारी देण्यात आली नाही. शिवसेना आणि भाजप तसंच शिवसेना आणि मनसे एकत्र येतील अशी विधानं जोशींकडून करण्यात आली, मात्र त्यावरही सेना नेतृत्वाकडून कोणत्याच प्रतिक्रिया उमटल्या नाहीत.

मनोहर जोशींना बाजूला करत उद्धव ठाकरेंनी संजय राऊत, सुनील प्रभू, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर या आपल्या मर्जीतल्या नेत्यांना पुढं आणलं आणि दोघांच्या बिनसलेल्या संबंधांवर तोडगा निघालाच नाही. मनोहर जोशींच्या पुस्तक प्रकाशनाला उद्धव ठाकरेंची उपस्थिती होती, त्यांनी जोशींचं कौतुकही केलं पण तोवर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं.

आता एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भेट हा उद्धव यांच्या नेतृत्वामुळं साईडलाईन झालेल्या जोशींना सहानुभूती देण्यासाठी होती की राष्ट्रीय कार्यकारिणीत नवा हादरा देण्यासाठी, हे पुढे घडणाऱ्या घडामोडीच स्पष्ट करतील.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.