मार्केटमध्ये सिल्क आली आणि चॉकलेट डे खिशाला महाग पडू लागला…

Kiss Me, Close Your Eyes
Miss Me, Close Your Eyes
I Can Read Your Lips… On Your Fingertips
I Can Feel Your Smile…Come On My Lips
And Happiness In Your Eyes!!

हे तुम्ही चालीत वाचलं असेल, तर तुम्ही लय भारी आहात. स्लाईसच्या जाहिरातीत ओठांवर आंब्यांचा रस पडणारी कॅटरिना जेवढी मादक दिसत नाही, तेवढ्या सिल्कच्या जाहिरातीमधल्या हिरॉईनी गोंडस दिसायच्या. त्यात त्यांच्या हाताला, ओठाला लागलेलं चॉकलेट बघून विषय गंभीर व्हायचा. सिल्कची चव, तिचा सॉफ्टनेस आणि लय बाप फ्लेव्हर या गोष्टींमुळे सिल्क सुपरहिट झाली. आणि गिफ्ट काय द्यायचं.. याचं उत्तर बनलं सिल्क.

मार्केटमध्ये सगळ्यात मोठा दंगा होता कॅडबरी डेअरी मिल्कचा. पार पाच रुपयापासून मिळणारी डेअरी मिल्क, स्वस्तात मस्त कार्यक्रम होती. वर तिच्यासोबत एक सोनेरी रंगाचा कागद यायचा, जो जपून ठेवला की कॅडबरी कधी आणि कुणी दिली याची अगदी पद्धतशीर आठवण रहायची. कित्येक चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन डे, याचे-तिचे बड्डे, रुसवे फुगवे.. पाच, दहा आणि डोक्यावरुन पाणी वीसवाल्या डेअरी मिल्कमुळं भागले, नंतर मार्केटमध्ये आली सिल्क.

आता सिल्क आणि आपली डेअरी मिल्क हे एकाच ब्रँडचे. पण कायतरी नवं हवं म्हणून सिल्क मार्केटमध्ये आली आणि तिनं धुरळाच केला. सिल्कमध्ये तसं काय रॉकेट सायन्स नव्हतं, पण तोंडात तुकडा पडला की विरघळायचा… असली भारी जादू सिल्कची होती.

सिल्कचं मार्केटिंग करताना कॅडबरीनं एक ट्रिक वापरली. सगळ्या जाहिरातींमध्ये प्रेम आणि कपल या गोष्टी हमखास दिसायच्या. त्यामुळं लोकांच्या मनात एक गोष्ट पक्की बसली… आपल्या विषयाला गिफ्ट द्यायचंय म्हणजे सिल्कच दिली पाहिजे. गर्लफ्रेंड कुणाचीही असली तरी ती आधीपासूनच हुशार असते, त्यामुळं पोरीही साध्या डेअरी मिल्कवर ऐकायच्या नाहीत, त्यांना भेटायला जा, त्यांच्या बड्डेला जा, प्रपोझ करायला जा… मागच्या खिशात डेअरी मिल्क सिल्क पाहिजे म्हणजे पाहिजे. (तुमची वाली अजूनही पाच रुपयाच्या कॅडबरीवर खुश होत असेल… तर जिकलाय गड्या तू.) या अशा मार्केटिंगमुळं सिल्क बेक्कार हिट झाली आणि खप पण वाढला.

त्यात सिल्क थोडीशी महाग असल्यानं, ती देणाऱ्याची पण इज्जत वाढली आणि प्रत्येकाच्या कानात किस मी गाणं आणि जिभेवर सिल्कचा तुकडा रेंगाळू लागला.

सिल्कनं मध्ये पॉप अप हार्ट असली कन्सेप्ट आणली. कॅडबरीच्या मधोमध एक छोटंसं चॉकलेटचं हृदय असतंय.. ते हळूच बाहेर काढायचं… आपल्या अँजेलिना जोलीला द्यायचं आणि स्वतः ब्रॅड पिटसारखं खुदकन हसायचं, असला रोमँटिक सीन केल्यावर पोरगी फिक्स पटणार की भिडू… (तरीही नसेल पटत, तर अवघड ए गड्या.)

सिल्कचं पॅकिंग पण लय वांड असतंय, त्यामुळे ७०-८० रुपये गेले तरी काय वाटत नाय. आपला ब्रँड आधीच हिट असताना एक सब ब्रँड काढायचं धाडस कॅडबरीनं केलं आणि ते सध्या डेअरी मिल्कला टक्कर देणारं ठरलं… हा तसा लय भारी आणि मार्केटिंगच्या पोरांनी अभ्यास करण्यासारखा विषय.

सिल्कचा एक तोटा तेवढा झाला…

आधी कॅडबरीसोबत तो गोल्डन कलरचा कागद यायचा, तो आपल्या आठवणींचा कप्पा होता. गादीच्या खाली, वहीत, पुस्तकात आपण तो जपून ठेवायचो… मग अचानक कधीतरी तो कागद घावायचा आणि ती कॅडबरी देणारी व्यक्ती, ज्या लांबसडक बोटांनी आपल्याला कॅडबरी भरवली ती बोटं आणि त्या कॅडबरीपायी मिटलेलं भांडण या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर यायच्या. आता सिल्कमध्ये ती मजा नाय…

आधी तसं चॉकलेट डेचं फॅड नव्हतं, तिच्या वाढदिवसाला बाकीच्यांना एक आणि आपल्याला दोन चॉकलेट मिळाली तरी आपण सिग्नल समजून जायचो. चाराण्याचं एक किसमी दोघात खायची सर सिल्कला येणार नाही आणि रॅपर जपून ठेवलं तरी सोनेरी कागदाच्या मागं तिनं नाजूक हातांनी लिहिलेली दोघांची नावं आणि बाण गेलेलं हृदय आता फक्त आठवणीतच राहील.

चॉकलेट डे ला तुम्हाला कुणी सिल्क दिली नसेल, तर १५० घालवा आणि स्वतः घेऊन खा. तुम्ही दिलेली कॅडबरी तिनं घेतली नसेल, तर मित्राला द्या… तो गडी खुश होईल आणि चॉकलेट डे उदास गेला म्हणून प्रेम करणं सोडू नका… प्रेम करत रहा.. कारण प्रेम ही लय भारी गोष्ट आहे!!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.