लोकं म्हणतायत दाऊद संपला, पण चौकशीत उघड होतंय ‘दाऊद 2.0’ व्हर्जननं मुंबई पोखरलीये…

इब्राहिम कासकर, मुंबईच्या गर्दीनं भरलेल्या डोंगरी भागातला पोलिस हेड कॉन्स्टेबल. घरची परिस्थिती गरीब, त्यात पदरात ८ पोरं. इब्राहिम कासकर प्रचंड धार्मिक होता, त्यात एका बाबानं त्याला सांगितलं होतं, ‘इब्राहिम तुझा दुसरा पोरगा मोठं नाव कमावेल.’ इब्राहिमची या भविष्यवाणीवर खतरनाक श्रद्धा होती. पहिला पोरगा साबीरच्या पाठीवर त्याला दुसरा पोरगा झाला, तेव्हा त्याची ही श्रद्धा पक्की झाली.

इब्राहिम कासकरच्या दुसऱ्या पोरानं खरंच मोठं नाव कमावलं, जगातल्या कित्येक देशात त्याचं नाव आजही चर्चेत असतं आणि भारतात तर बारकी पोरंही इब्राहिम कासकरच्या दुसऱ्या पोराचं नाव विसरू शकत नाहीत…

त्याच्या दुसऱ्या पोराचं नाव… दाऊद शेख इब्राहिम कासकर.

मुंबईच्या अंडरवर्ल्डचा बादशहा, भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार म्हणजे दाऊद. इब्राहिम कासकरच्या दुसऱ्या पोरानं नाव कमावलं, पण सुप्रसिद्ध होण्याऐवजी तो कुप्रसिद्ध झाला.

भारतात कधी कुणाला तरी दाऊदचा फोन येतो, कुणाला धमकी येते, तर मधूनच दाऊद मेल्याची बातमी. सध्याही दाऊद चर्चेत आहे, कारण राष्ट्रीय तपास संस्थेनं म्हणजेच एनआयएनं दाऊदला पकडून देणाऱ्याला २५ लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. एनआयए बक्षीस जाहीर करतंय, तपासाची सूत्रं पुन्हा एकदा हलतायत, यावरुन एकच प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे…

दाऊद पुन्हा सक्रिय झालाय का ?

हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण फक्त एनआयएनं जाहीर केलेलं बक्षिस हेच नाहीये, तर मागच्या काही वर्षात घडलेल्या घडामोडींकडे बारकाईनं पाहिलं की लक्षात येतं. दाऊद नुसताच सक्रिय नाहीये, तर तो मुंबईत अंडरवर्ल्डच्या नव्या व्हर्जनची तयारी करतोय.

पण मुंबईत सूत्रं हलवणारी दाऊदची माणसं नेमकी आहेत कोण ?

पहिलं नाव येतं दाऊदचा भाऊ इकबाल कासकरचं.

एनआयएनं केलेल्या चौकशीत इकबाल कासकरनं दाऊदचं पाकिस्तानातलं लोकेशन सांगितलं अशी बातमी नुकतीच झळकली. त्यानं दाऊद, त्याचा राईट हॅन्ड छोटा शकील आणि भाऊ अनीस इब्राहिम पाकिस्तानात असल्याचं सांगितलं. खरं खोटं त्यालाच माहित, पण इकबाल कासकर हा असा माणूस आहे ज्याच्या रुपानं दाऊद मुंबईबाहेर असताना मुंबईवर राज्य करायचा.

२००३ मध्ये इकबाल कासकरचं भारताकडं हस्तांतरण करण्यात आलं, मात्र त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमधून तो २००७ मध्ये निर्दोष सुटला आणि मुंबईत राहून दाऊदचे सगळे व्यवहार हाताळू लागला. २०१७ मध्ये एका बिल्डरकडून खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली. त्यानंतर जून २०२१ मध्ये एनसीबीनं इकबाल कासकरला ड्रग्सच्या स्मगलिंगच्या आरोपाखाली अटक केली. सध्या त्याची एनआयएकडून चौकशी सुरु आहे.

छोटा राजननंतर दाऊदचं मुंबईतलं साम्राज्य वाढवण्यात सगळ्यात मोठा रोल या इकबाल कासकरचाच राहिलाय. खंडणी आणि ड्रग्सचं स्मगलिंग यातून त्यानं मोठ्या प्रमाणावर पैसा मिळवलाय.

दुसरं नाव येतं, दाऊदचाच भाऊ अनीस इब्राहिमचं

अनीस इब्राहिम म्हणजे १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा कट पूर्णत्वास नेणारा, दाऊदचा माणूस. छोटा शकील आणि अनीसमध्ये कायम चढाओढ राहिली असली, तरी दाऊदचा रक्ताचा भाऊ असल्यानं अनीसची बाजू अनेकदा भक्कम राहिली. दाऊदच्या कारवाया काहीशा थंड झाल्या तेव्हा अनीसचं नावही चर्चेतून गायब झालं होतं. मात्र दाऊदचं नाव वापरुन बिल्डरकडून खंडणी वसूल करणं, ड्रग्स तस्करीच्या आरोपात खास माणसाला अटक होणं आणि तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण देणं या असल्या प्रकरणांमध्ये मागच्या दीड वर्षात अनीस इब्राहिम हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

तिसरं नाव म्हणजे, छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट

अंडरवर्ल्डला पैसे गोळा करण्यासाठीचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे खंडणी आणि या खंडणीसाठी रडारवर असतात ते बिल्डर लोक. जेव्हा ऑगस्ट महिन्यात या सलीम फ्रुटला एनआयएकडून अटक करण्यात आली तेव्हा त्याच्याकडे मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातल्या प्रॉपर्टीची १० हजार कागदपत्रं सापडली होती. इकबाल कासकरच्या अटकेनंतर हाच सलीम फ्रुट वसुलीसाठी दाऊदचा मुंबईतला ‘मेन माणूस’ झाला होता, असं सांगितलं जातं.

सलीम फ्रुटकडे कागदपत्रांसोबतच तस्करी केल्या जाणाऱ्या सिगारेट्स आणि उंची वस्तूही सापडल्या होत्या. त्यामुळं वसुली, स्मगलिंग अशा गुन्ह्यांमधून दाऊदचा पैशाचा स्रोत सुरू ठेवण्याचं काम सलीम फ्रुट करत होता, असे आरोप त्याच्यावर करण्यात आलेत.

या तिघांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या नेटवर्कमधून दाऊदनं पैसा कमवणं सुरू ठेवलं. सर्वाधिक उत्पन्न ड्रग्सच्या स्मगलिंगमधून मिळतं, त्यामुळंच दाऊदची टोळी विशेषत: मुंबईतल्या स्मगलिंगमध्ये सक्रिय असल्याचं सांगण्यात येतं.

मागच्या दोन वर्षांची आकडेवारी पाहिली, तर मुंबई आणि आसपासच्या भागातून एनसीबीनं २ हजार कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. याच आकड्यावरुन अंदाज येतो की डी गॅंग फक्त ड्रग्समधूनच किती पैसा मिळवत असेल.

ड्रग्ससोबतच बिल्डर लोकांकडून होणारी वसुली, मोठ्या व्यावसायिकांमधले वाद, सोन्याची तस्करी हे ‘डी गॅंग’ चे उत्पन्नाचे स्रोत असल्याची माहिती स्वतः सलीम फ्रुटनंच एनआयएला चौकशीमध्ये दिल्याच्या बातम्या आहेत.

दाऊद आणि ‘डी गॅंग’ एवढ्या प्रमाणावर पैसा कमवतायत, पण त्याचा वापर कुठं होतोय..?

तर भारताविरोधी दहशतवादी कारवाया करणाऱ्या लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद, अल कायदा यांना हा पैसा पुरवला जातो, अशी कबुली खुद्द सलीम फ्रुटनंच दिली आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये दिल्लीतून ६ आणि उत्तर प्रदेशमधून एकाला अटक करण्यात आली. या ७ जणांचा प्लॅन भारतात दहशतवादी हल्ला करण्याचा होता. विशेष म्हणजे यातल्या काही जणांनी पाकिस्तानात आयएसआयकडून दहशतवादी हल्ल्यासाठीचं प्रशिक्षण घेतलं असल्याचं समोर आलं.

भारतात अंडरवर्ल्ड 2.0 उभं करायचं असेल, तर दाऊदला बाहेरची ताकद लागणार हे स्पष्ट आहे.

त्यासाठीच तो दहशतवादी संघटनांना पैसे पुरवतोय आणि या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचं काम पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय करतंय. त्यानंतर या दहशतवाद्यांना भारतात आणण्याचं, त्यांना शस्त्र आणि पैसा पुरवण्याचं काम अनिस इब्राहिमकडे देण्यात आलंय. मुंबईला टार्गेट करण्यासाठी अनीस देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी स्लीपर सेलही पसरवत आहे आणि यासाठी लागणारा सगळा पैसा मुंबईतूनच उभा राहतोय.

2.0 द हायटेक व्हर्जन

पोलिसांना आपल्या व्यवहाराचे कोणतेही सुगावे लागू नयेत म्हणून दाऊद आणि डी गॅंग, हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची माहिती ईडी आणि एनआयएनं दिली आहे. सलीम फ्रुटीला जेव्हा अटक झाली तेव्हा त्याच्याकडे काही टेराबाईट्स (TB) मध्ये डेटा आणि मोठ्या प्रमाणावर फोन नंबर असल्याचं समोर आलं होतं.

दाऊद, छोटा शकील, अनीस इब्राहिम आणि त्यांचे इतर शूटर्स एकमेकांशी संपर्क साधायला वेगवेगळे ऍप्स वापरतात. या ऍप्ससाठी इंटरनॅशनल सिमकार्ड वापरलं जातं, त्यामुळेच हे कॉल ट्रेस करणं पोलिसांना कठीण जातं.

आर्थिक व्यवहारांसाठीही हवाला सोडून इतर जुने मार्ग वापरणं डी गॅंगनं बंद केलंय आता यासाठी क्रिप्टो करन्सी आणि डार्कनेटचा वापर केला जात असल्याचं ईडीच्या तपासात समोर आलंय.

दाऊदच्या नव्या अंडरवर्ल्ड उभारणीसाठी सुरु असलेल्या हालचालींची तीव्रता लक्षात येते, ती मागच्या काही महिन्यात झालेल्या अटकसत्रांमधून…

वरती संगितल्याप्रमाणे दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आलेल्या तरुणांनी अनिस इब्राहिमच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्याचं प्रशिक्षण घ्यायला गेल्याची कबुली दिली. रायगडमध्ये ड्रग्स तस्करी प्रकरणात अटक झालेला आरिफ भुजवाला हा सुद्धा अनिस इब्राहिमचा खास माणूस निघाला. त्यामुळं मुंबईभोवती फिरणारं ड्रग्स रॅकेट आणि दहशतवाद्यांना प्रशिक्षण हे काम अनीस इब्राहिम बघतोय हे स्पष्ट झालं. हा अनीस कोण ? तर दाऊदचा भाऊ.

ईडीनं दाखल केलेल्या आरोपांनुसार इकबाल कासकर बिल्डर आणि सेलिब्रेटी लोकांकडून पैसे उकळण्याचं काम पाहतोय. तर ईडीच्याच चौकशीत पुढं आलेल्या माहितीनुसार इकबाल कासकर आणि इतर भावंडांना दार महिन्याला १० लाख रुपये मिळायचे, हे पाठवणारा माणूस अर्थातच दाऊद होता.

सलीम फ्रुट छोटा शकीलचा मेव्हणा असला तरी, त्यानं आपण पाकिस्तानात अनीस इब्राहिमकडे काही दिवस राहिल्याची कबुली दिली होती. खोऱ्यानं पैसा मिळवून देणाऱ्या मुंबईतल्या मालमत्तांची दहा हजार कागदपत्रं सलीमकडेच सापडली. छोटा शकील आणि अनीस या दोघांशी इतक्या जवळचे संबंध असले, तर अर्थातच सलीम फ्रुटचाही गॉडफादर एकच माणूस ठरतो, तो म्हणजे दाऊद.

ईडी, एनआयए या सरकारी यंत्रणांनी केलेली छापेमारी, अटकसत्र आणि इकबाल कासकर, सलीम फ्रुट, दाऊदचा भाचा अलीशाह पारकर या बड्या धेंडांसह, इतर प्याद्यांच्या चौकशीतून एकच गोष्ट समोर येतीये, ती म्हणजे दाऊदचं 2.0 व्हर्जन पुन्हा आपली ताकद वाढवतंय.

थोडक्यात काय तर, इब्राहिम कासकरनं ऐकलेली भविष्यवाणी पुन्हा एकदा खरी ठरलीये, फक्त त्याच्या पोराच्या नावावर बक्षीस लागलंय, ज्याची किंमत आहे… २५ लाख रुपये!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.