गुन्हेगारांनी चकवा दिलाच होता, पण पोलिसांनी दोन शब्दांच्या जोरावर मास्टरमाईंड हुडकले…

फेब्रुवारीचे थंडीचे दिवस. भर दुपारी दिल्ली पोलिसांना एक फोन आला. रेल्वे ट्रॅकजवळ एका बॅगेत मुलीचा मृतदेह सापडल्याची बातमी फोनवर देण्यात आली. पोलिसांनी तपासणी केली, दुर्दैवानं त्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला होता.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पेटून उठले, पण बेवारस मृतदेह त्यामुळं ओळख पटवणार कशी? हा प्रश्न होता.

मात्र नेहमीपेक्षा एक वेगळी घटना या गुन्ह्यात पाहायला मिळाली, मृत मुलीच्या पँटमध्ये एक चिट्ठी सापडली, ज्यात आपल्या जीवाला कुठल्या लोकांपासून धोका आहे याचं कारण, त्यांचं नाव आणि फोन नंबर या सगळ्या गोष्टी तिनं लिहून ठेवल्या होत्या.

केस सिम्पल झाली? नाही का?

पण पोलिसांनी सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्यानं करायच्या ठरवलं. त्यांनी सगळ्यात आधी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. त्यात त्यांना समजलं की या मुलीसोबत सामूहिक बलात्कार झाला आणि त्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आला. हत्येला दोनच दिवस झाले होते. त्यामुळं गुन्हेगार जाऊन जाऊन कितीसे लांब जाणार होते ?

पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, सगळ्यात मोठा पुरावा होता तो म्हणजे मुलीजवळ असलेली चिठ्ठी. या चिठ्ठीचा आशय होता,

माझं नाव सिमरन, माझं दिल्लीच्या संत नगर बुराडीत राहणाऱ्या आरुषवर प्रेम आहे, त्याचंही माझ्यावर प्रेम आहे. पण मला माहीत नव्हतं की त्याचं लग्न झालंय, आता त्याच्या कुटुंबानं माझी जिंदगी हैराण केलीये. आरुष आणि त्याचे दोन मित्र मला धमकावतायत, माझे अश्लील व्हिडीओ बनवून माझ्याकडून पैसे मागतायत. जर माझा खून झालाच, तर आरुष आणि त्याचे मित्रच यासाठी जबाबदार असतील. मी या तिघांचीही नावं आणि फोन नंबर यात लिहिली आहेत.

पोलिसांनी ही चिठ्ठी मिळाल्यावर  सूत्रं हलवली आणि थेट आरुषचं घर गाठलं. तो घरात नाही असं सांगण्यात आलं, तेव्हा त्याच्या आई-वडिलांची चौकशी झाली. ते म्हणाले ‘आम्ही अशा कुठल्याच सिमरनला ओळखत नाही.’

पुढं पोलिसांनी आरुष आणि त्याच्या मित्रांनाही ताब्यात घेतलं, पण त्यांचं उत्तरही सेम होतं की, ‘आम्ही अशा कुठल्याच सिमरनला ओळखत नाही.’ या तिघांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आला, पण पोरांचं उत्तर काय बदललं नाही.

मग पोलिसांनी आरुषचे कॉल रेकॉर्ड चेक केले, त्यात सिमरनच्या नंबरवरुन शेवटचा कॉल त्यालाच आला होता. पोलिसांनी पुन्हा फास आवळला. पण आरुष याच म्हणण्यावर ठाम होता, की ‘प्रेम वैगेरे सोडा मी या मुलीला ओळखत सुद्धा नाही. तिचा फोन आला होता, मात्र काही न बोलताच कटही झाला.’ पोलिसांनी जुने कॉल रेकॉर्ड तपासून पाहिले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या दोघांमध्ये खरंच काही संबंध नाही.

मग हे सगळं केलं कुणी ? आरुषचा संबंध नाही तर त्याचं नाव सिमरननं का लिहिलं ?

पोलिसांनी चिठ्ठीमधलं हस्ताक्षर चेक केलं, तर ते सिमरनचंच असल्याचा निर्वाळा तिच्या वडिलांनी दिला. आपली मुलगी हरवल्याची तक्रार देणाऱ्या सिमरनच्या वडिलांवर दुर्दैवी वेळ ओढवली होती. मात्र तेही गुन्हेगार शोधण्यासाठी आपल्या परीनं प्रयत्न करत होते.

त्यांना घरात एक कागद सापडला, ज्यावर एक फोन नंबर आणि प्रसाद-जॉब हे दोन शब्द लिहिले होते. त्यांनी लगेच या नंबरवर फोन लावला. सिमरननं जॉबसाठी फोन केला होता का? याची चौकशी केली. फोनवर बोलणाऱ्या पोरानं २०-२५ दिवसांपूर्वी फोन आला होता, असं सांगितलं.

मात्र बोलताना तो अडखळला…

सिमरनच्या वडिलांनी ही गोष्ट पोलिसांना सांगितली. पोलिसांनी नंबरचे रेकॉर्ड पाहिले, तर नंबर होता उत्तरप्रदेश मधला. पण विशेष म्हणजे या नंबरवरुन फक्त सिमरनलाच फोन करण्यात आले होते.

पोलिसांनी आणखी वेगानं चक्र फिरवली आणि दिनेश प्रसाद, धनंजय आणि त्यांच्या आणखी दोन सहकाऱ्यांना अटक केली. पोलिसांनी हे सिद्ध सुद्धा केलं, की या चौघांनीच हा गंभीर गुन्हा केलाय.

मग मुद्दा उपस्थित झाला तो म्हणजे हे त्यांनी केलं कसं आणि आरुषला का अडकवलं…

जानेवारी महिन्यात दिनेश प्रसाद चोरीच्या गुन्ह्याखाली तिहार जेलमध्ये गेला. इथं त्याला मर्डर केसमध्ये आत असलेला धनंजय भेटला. या दोघांची चांगली मैत्री झाली. पण त्याचवेळी धनंजयची त्याच जेलमध्ये असलेल्या बंटी या गुन्हेगारासोबत भांडणं झाली. या दोघांनी ठरवलं बंटीचा बदला घ्यायचा.

बंटीचं बलस्थान होतं त्याच्या कुटुंबाकडे असलेली जवळपास दोनशे एकर जमीन. या दोघांनी बंटीच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवला. बंटी स्वतः जेलमध्ये होता, त्यामुळं प्रॉपर्टीवर ताबा मारायचा असला, तर त्याच्या भावाला अडकवणं गरजेचं होतं. बंटीचा भाऊ होता, आरुष! (ज्याचं नाव आणि नंबर सिमरनच्या चिठ्ठीमध्ये होतं)  

आरुषला मर्डर केसमध्ये अडकवण्यासाठी, दिनेशनं एक षडयंत्र रचलं. सिमरन ही त्याची मैत्रीण होती, तिला जॉबची गरज होती. दिनेशनं दिल्लीतून उत्तर प्रदेशला जात एक नवं सिमकार्ड घेतलं आणि त्यावरुन सिमरनशी कॉन्टॅक्ट केला. तिला आपल्याकडे जॉब असल्याचं खोटं कारण सांगितलं.

मग २५ फेब्रुवारीला तिला पुन्हा कॉल केला आणि सरिता विहारमध्ये इंटरव्ह्यूसाठी बोलावलं. सिमरनला या सगळ्याची कल्पनाही नव्हती, ती मुलाखतीसाठी गेली तेव्हा आरोपींनी तिला मारहाण केली आणि आम्ही सांगतो तशी चिठ्ठी लिहिली नाही तर बलात्कार करण्याची धमकी दिली. 

सिमरननं ते सांगतील तशी चिठ्ठी लिहिली. साहजिकच त्यात आरुष आणि त्याचे मित्र अडकले.

मात्र यानंतर आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा खूनही. पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये म्हणून त्यांनी गाडी भाड्यानं घेऊन पोलिसांना चकवा देण्याचे पूर्ण प्रयत्न केले. सिमरनचा फोनही तिच्याच सोबत ठेवला, मात्र इतकं डोकं लावूनही ते पोलिसांना सापडलेच. सिमरनशी काडीचाही संबंध नसलेल्या आरुषला अडकवणं, पोलिसांना चकवा द्यायला सिमरनच्याच हातून चिठ्ठी लिहून घेणं, एवढं करुनही त्यांची डाळ शिजली नाही.    

यात पोलिसांचा तपास जितका महत्त्वाचा होता, तितकंच सिमरनच्या वडिलांनी खचून न जाता आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी केलेली धडपडही तितकीच महत्त्वाची होती.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.