बच्चू कडू यांचा महाराष्ट्रातल्या राजकारणात इतका प्रभाव कसा निर्माण झाला ?

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आर.आर.पाटील महाराष्ट्राचे गृहमंत्री होते.नेमकं तेंव्हाच चांदूरबाजार इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एका नेत्यानं स्वत:ला गळ्यापर्यंत जमिनीत गाडून अर्धदफन आंदोलन सुरु केलेलं.  बराच वेळ स्वतःला जमिनीखाली असल्यामुळे या नेत्याची तब्येत वरचेवर खालावत चालली होती.

प्रशासन त्यांना मागे हटण्यास सांगत होतं पण तो नेता काय मागे हटायला तयारच नव्हता. तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी अमरावतीच्या काही पत्रकारांना बोलावून काहीही करा पण त्या नेत्याला आंदोलन मागे घेण्यास सांगितलं. तेंव्हा कुठं त्या पत्रकारांच्या विनंतीवरून या नेत्यानं आंदोलन मागे घेतलं.

तो नेता म्हणजे.

ओमप्रकाश बाबूराव कडू. म्हणजेच बच्चू कडू.

बच्चू कडू सद्या का चर्चेत आहेत तर रवी राणा विरुद्ध बच्चू कडू या राजकीय संघर्षांमुळे. दोघांच्या शाब्दिक युद्धात आक्षेपार्ह भाषा वापरल्या गेल्या, प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं, स्फोटक परिस्थिती निर्माण झाली सरतेशेवटी या भांडणात एकनाथ शिंदेंना आणि देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली. मग फडणवीसांच्या जवळचे मानले जाणारे रवी राणा यांना बच्चू कडूंची माफी मागावी लागली. 

बच्चू कडूंनीही मेळाव्याचा इव्हेंट करून, शक्तिप्रदर्शन करून त्यांना माफ केलं. अन् शेवटी वादाला फुलस्टॉप लागला.  पण बच्चू कडूंचा राग शांत करण्यासाठी थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना करावी लागलेली मध्यस्थी पाहून प्रश्न पडतो की बच्चू कडूचा इतका प्रभाव कसा निर्माण झाला. आकडेवारीच्या भाषेत बच्चू कडूंच्या पक्षाचे फक्त दोन आमदार असताना त्यांच उपद्रव्य मुल्य संपूर्ण महाराष्ट्रात कसं काय आहे.

असं म्हणतात कि बच्चू कडू यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांचा प्रभाव होता.

 याच प्रभावामुळे बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. अगदी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले बच्चू कडू कोणताही राजकीय वारसा नाही तरी देखील १९९७ मध्ये ते चांदुर बाजार पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून गेले. तर वयाच्या २५ व्या वर्षी ते चांदुर बाजार पंचायत समितीचे सभापती झाले होते. 

सभापती असतांना बच्चू कडू यांनी पंचायत समितीत झालेला शौचालय घोटाळा उघडकीस आणला होता. उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे बच्चू कडू यांना बरीच प्रसिद्धी मिळाली.  पण काहीच काळात त्यांचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसोबत खटके उडायला लागले होते. 

अपंगांच्या विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३ टक्के निधी राखीव ठेवला जातो. त्या निधीअंतर्गत अपंगांना सायकल वाटण्याची योजना बच्चू कडू यांनी बनवली होती, पण इतर स्थानिक नेत्यांनी याला विरोध केला. या विरोधामुळेच बच्चू कडू यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला. शिवसेना सोडल्यानंतर १९९९ मध्ये बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली.

बच्चू कडूंच्या उपद्रव मूल्याचं सर्वात मजबूत कारण म्हणजे,

बच्चू कडूंची आजवरची आगळीवेगळी आंदोलनं. त्यातलं एक जे आपण पहिलं कि, आर. आर. पाटील गृहमंत्री असताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी स्वतःला जमिनीत गाडून घेऊन अर्धदफन आंदोलन केलं होतं.  तर एकदा आर आर पाटील यांच्या तासगावच्या घरासमोर असलेल्या विहिरीत बसून आंदोलन केलं होतं.  

त्यानंतर स्वतःला झाडाला उलटं टांगून घेऊन आंदोलन करण्याचा प्रकार सुद्धा बच्चू कडूंनीच सुरु केल्याचे सांगितलं जाते. बच्चू कडू यांनी आदिवासी समाजातील लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या खावटी योजनेत भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी खावटी आंदोलन केलं होतं. एकदा मुंबईमध्ये अपंग बांधवांसोबत लोकल ट्रेन अडवून आंदोलन केलं होतं.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान यांच्या घरापर्यंत काढलेली आसूड यात्रा, सरकारी अधिकाऱ्याच्या कार्यालयात साप सोडून आंदोलन करणे, नागपुरात पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं आंदोलन, सरकारी कार्यालयावर चढून केलेलं शोले स्टाईल आंदोलन.दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.

दिल्लीत मेधा पाटकरांनी त्यांचा सत्कारही केलेला, त्यांच्या या कृतीला खूप प्रसिद्धी मिळाली. पारंपरिक आंदोलनाच्या चौकटीबाहेर जाणाऱ्या आंदोलनामुळे त्यांची लोकप्रियताही कमालीची वाढली. आणि व्यवस्थेविषयी राग असलेल्या तरुणांच्या गळ्यातले ते ताईत बनले. 

आंदोलनांच्या जोरावर बच्चू कडू हे ४ वेळेस आमदार म्हणून निवडून आलेत. 

बच्चू कडू यांनी पहिल्यांदा १९९९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला. आंदोलनांमुळे सारखे चर्चेत आल्यानंतर २००४ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यातही त्यांचा पराभव झाला. पण त्यानंतरच्या २००४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं. 

२००४ मध्ये बच्चू कडू यांनी काँग्रेसच्या वसुधाताई देशमुख यांना हरवून अचलपूर मतदारसंघ स्वतःच्या ताब्यात घेतला.  २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग बच्चू कडू हेच अचलपूर मतदार संघातुन निवडून येत आहेत. आजच्या घडीला बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे २ आमदार आहेत. एक स्वतः बच्चू कडू तर दुसरे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल.

याबाबत बोल भिडूशी बोलतांना आमदार राजकुमार पटेल म्हणाले की, 

 “बच्चू भाऊंच्या प्रहार जनशक्तीच्या प्रत्येक जिल्ह्यात संघटना आहेत. विदर्भातील काही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये पक्षाचे सदस्य आहेत. तर विदर्भ आणि मराठवाड्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सुद्धा आहेत. 

आम्ही जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच असलो तरी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणुकांसाठी जर आम्ही आमचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी उभे केले तर स्थानिक गणितच बिघडून जाईल अशी ताकद आहे आणि याची कल्पना राजकीय पक्षांना आहे. 

म्हणूनच येत्या निवडणुकीत आम्ही युतीमध्ये असावं असं मत शिंदे आणि फडणवीस साहेबांचं आहे म्हणून बच्चू भाऊंना एवढं महत्व आहे. मात्र इथून पुढे इतरांना मदत करण्याऐवजी येत्या लोकसभेत आम्ही अमरावतीमध्ये आमचा उमेदवार उभा करू अशी माहिती राजकुमार पटेल यांनी बोल भिडूसोबत बोलताना दिली मात्र प्रहारचा लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार कोण असेल हे वेळ आल्यास जरूर कळेल हे हि ते सांगायला विसरले नाही..

याबाबत बोल भिडूशी बोलतांना लोकसत्ताचे अमरावतीचे ब्युरो चीफ, मोहन अटाळकर म्हणाले की, 

अमरावतीच्या स्थानिक राजकारणात रवी राणा आणि बच्चू कडू दोघेही अपक्ष आमदार, दोघेही आक्रमक शैलीचे आमदार. त्यांच्यातल्या संघर्षात स्थानिक पातळीवर पक्षाचा विस्तार, मंत्रिपदाची शर्यत कारणीभूत आहे. तसेच खोक्यांच्या आरोपांमुळे सरकारला उत्तर द्यावं लागत होतं त्यामुळे शिंदे सरकारची परीक्षा लागली होती म्हणून सरकारने यात मध्यस्थी केली. 

बच्चू कडूंच्या आजवरच्या राजकारणचा फोकस हा आजवर शेतकरी, कष्टकरी, अपंग वर्गावर असल्यामुळे जमिनीवरचा कार्यकर्ता अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. पण खोक्यांच्या आरोपांमुळे बच्चू कडूंच्या प्रतिमेला लागलेला डाग कसा पुसायचा याची संधी म्हणून हा कालचा मेळावा आयोजित करण्यात आला. 

राहिला मुद्दा बच्चू कडूंच्या उपद्रव मूल्याचा तर शिंदे सरकारला सत्ता टिकवून ठेवण्यासाठी एक-एक आमदार महत्वाचा आहे. मग तोच आमदार वर्ग टिकवून ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असते तेच या प्रकरणात होत आहे असं मत मोहन अटाळकर यांनी सांगितले. 

आणखी एक म्हणजे बच्चू कडूंच्या कारकिर्दीमध्ये सहानुभूतीचे राजकारण आणि लोकप्रियता केंद्रस्थानी राहिली आहे.

दीनदलित, पीडित, अपंग, निराधारांच्या प्रश्नांना हात घातला की समाजाकडून आपसूकच सहानुभूती मिळते. त्यांचे समर्थक सांगतात की, ज्या ज्या तालुक्यात बच्चू कडू गेलेत त्या त्या तालुक्यांमध्ये त्यांनी अगदी तन-मन-धनाने अपंगांसाठी काम केलं. इतकंच नाही सातत्याने त्यांची विचारपूस करणं, त्यांचे प्रश्न सोडवणे. 

जेवढे अपंग व्यक्ती आहेत ते थेट बच्चू कडू यांच्याशी जोडलेले आहेत. त्यांनी अपंगांसाठी केलेलं कार्य, सोडवलेले प्रश्न पाहता अपंगांविषयी असलेली त्यांची कळकळ खरी असेलही पण यातून त्यांची प्रतिमा अपंगांचा कैवारी अशी झाली. बच्चू कडू यांची शैली ही थेट जनतेत मिसळून काम करण्याची आहे. शेतकरी, सर्वसामान्यांसाठी लढणारा, सरकारशी दोन हात करणारा नेता म्हणून ग्रामीण भागात त्यांचं वजन आहे.

पण इतकं महत्व असूनही महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले बच्चू कडू शिंदे सरकारच्या स्थापनेपासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत राजकीयदृष्ट्या हतबल दिसून येत आहेत. तशी महत्वाकांक्षा त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मानाचे स्थान मिळेल, हा कार्यकर्त्यांचा विश्वास डळमळीत होत चालला असल्याचे सांगितले जात आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.