दिवाळी-गणपती इतकीच छठपुजा मुंबईत महत्त्वाची कशी झाली ?

उत्तर भारतीयांचा महत्वाचा सण असलेल्या छटपूजेच्या मुद्यावरून चांगलेच वातावरण तापले आहे. मुंबईच्या घाटकोपर परिसरातील मैदानात राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव यांच्या पुढाकारातून कृत्रिम तलाव करण्यात येत होता. मात्र याला पालिका प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

या विरोधात राखी जाधव यांनी उच्च न्यायालयात गेल्या आहेत. ३० आणि ३१ ऑक्टोबरला छटपूजा उत्सव आहे. यासाठी घाटकोपर येथील आचार्य अत्रे मैदानात कृत्रिम तलाव तयार करण्यात येत होता. यासाठी जाधव यांनी मुंबई महापालिकेकडे परवानगी मागितली होती.  १८ ऑक्टोबरला ती नाकारण्यात आली. त्यानंतर जाधव यांनी आरोप केला की, महापालिकेने भाजपच्या पत्रावर अन्य काही मंडळांना कोणत्याही अर्जाशिवाय छट पूजा आयोजित करण्याची परवानगी दिली दिल्याचा आरोप राखी जाधव यांनी केला आहे. 

न्यायालय राखी जाधव यांना परवानगी देईल किंवा नाकारेल हा वेगळा मुद्दा. मात्र उत्तर भारतीयांची छट पूजा मुंबईत कधी पासून करण्यात येत आहे. एवढंच नाही तर मनसेनं विरोध करत स्पेस कशी निर्माण केली?  ते पाहुयात 

मुंबईत स्थायिक असलेले उत्तर भारतीय ही पूजा जुहूमध्ये करत.

१९९३ मध्ये जुहू चौपाटीवर सार्वजनिकरित्या सर्वप्रथम छठ पूजा करण्यात आली. सुरुवातीच्या काळात  हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक पूजा करण्यासाठी येत असत. अगदी ४० ते ६० कुटुंबीय येत असत.  हळूहळू जुहूच्या छठ पूजेचं नाव लोकप्रिय होऊ लागलं.

१९९५-९६ मध्ये अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या नातेवाईकांनी जुहूच्या छठपूजेत भाग घेतला आणि छठपूजेला एक नवी ओळख मिळाली. त्याच दरम्यान तत्कालीन शिवसेना नेते संजय निरुपम यांनी जुहूच्या किनाऱ्यावर ‘बिहारी फ्रंट’ नावाचा एक मंच तयार केला.  

या मंचाच्या माध्यमातून पहिल्यांदाच लोकप्रिय गायिका शारदा सिन्हा यांना आमंत्रण दिलं आणि त्यांच्याकडून छठ गीत गाऊन घेतलं. त्यामुळे छठपूजेला आणखी वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर या समुद्रकिनाऱ्यावर अमिताभ बच्चन, उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, मनोज तिवारी, रवी किशन, विजया भारती, रंजना झा तसंच टीव्ही जगताशिवाय राजकारणाशी निगडित असलेल्या डझनभर व्यक्ती सहभागी होऊ लागल्या. या सगळ्यामुळे छठ पूजेचं आकर्षण लोकांमध्ये आणखीच वाढायला सुरुवात झाली.

त्याकाळी निरुपम शिवसेनेचे फायरब्रांड नेते होते. बाळासाहेब ठाकरे जाहिरपणे अनेकदा निरुपमांना आपला दत्तक पुत्र मानायचे. पण २००५ साली याच राजकारणाच्या कारणावरून संजय निरुपमांनी शिवसेना सोडली. 

पुढं २००८ मध्ये राज ठाकरे यांनी छठ पूजेविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली.

३ मे २००८ ला शिवाजी पार्कवर मनसेचा दुसरा वर्धापन साजरा झाला. या समारंभात राज ठाकरे म्हंटले, महाराष्ट्राचा ताबा मिळवण्याची उत्तर प्रदेश अन बिहारी लोकांची योजना माझ्यामुळे निष्फळ ठरली. त्यामुळे ते मला लक्ष्य बनवत आहेत. मणिपूरसारख्या राज्यांमध्ये उत्तर भारतीयांची झालेली हत्या आमच्या माध्यमांना दिसत नाही का? त्या लालूला म्हणावं, ये अन माझ्या घरासमोर छठपूजा करून दाखव. तो परत जाणार नाही. 

राज ठाकरेंच्या विरोधात संजय निरुपम यांनी दंड थोपटले. त्यांच्याकडून छठपूजेच्या त्या मंचाचं काँग्रेसीकरण, छठ उत्सव महासंघाकडून व्यासपीठाचं भगवीकरण किंवा सुभाष पासी यांच्याकडून मंचाला राजकीय रंग देणं सुरूच राहिलं. मात्र मध्यंतरी मनसेने छट पूजे संदर्भातील आपली भूमिका मवाळ केल्याचे पाहायला मिळाले. 

छट पूजेसाठी मुंबईतील सगळेच पक्ष आग्रही असल्याचे कारण म्हणजे उत्तर भारतीय मतदारांची संख्या 

मुंबई महापालिकेची मुदत संपली आहे. त्यामुळे पुढील काळात कधीही महापालिकेची निवडणूक होऊ शकते. यामुळे इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. २०१७ च्या पालिका निवडणुकित  २२७ सदस्यसंख्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेत ७२ बिगरमराठी आहेत नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी २६ मुस्लिम, २४ गुजराती, १४ उत्तर भारतीय, पाच दक्षिण भारतीय आणि तीन ख्रिश्चन होते. आता हे झालं निवडून आलेल्यांचं. पण त्यापलीकडेही इतर जागांवर पण उत्तर भारतीयांची मतं  निर्णायक असतात.

मुंबईत २७% पेक्षा जास्त उत्तर भारतीय मतदार आहेत, तर संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात  (MMR) १ कोटी ५० लाख मतदान उत्तर भारतीयांचं असल्याचं सांगण्यात येतं.

मुंबईतील एकूण प्रभागांपैकी १८४ मध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या ५ ते ५३% पर्यंत आहे. यापैकी तर ६३ प्रभागांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचे प्रमाण २५% पेक्षा जास्त आहे. पूर्व उपनगरांपेक्षा पश्चिम उपनगरात विशेषतः अंधेरी, वांद्रे, भाईंदर, बोरिवली, दहिसर, गोरेगाव, जोगेश्वरी, जुहू, कांदिवली, खार, मालाड, मीरा रोड, सांताक्रूझ या भागात उत्तर भारतीय मतांचा बऱ्यापैकी बोलबाला आहे.आणि त्यातही उत्तर भारतीय मतदार हिंदू मुस्लिम हे विभाजन सोडलं तर आपली एकगठ्ठा मतं पक्षाच्या पारड्यात टाकतो असं निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवतात.

२०१७ च्या आधी उत्तर भारतीय मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जायचा. संजय निरुपम, नसीम खान, राजहंस सिंह, चंद्रकांत त्रिपाठी अशी उत्तर भारतीय नेत्यांची फळी काँग्रेसकडे उत्तर भारतीय मतदान मोठ्या प्रमाणात आणायची. मात्र २०१७ च्या निवडणुकीत मात्र चित्र पालटलं आणि उत्तर भारतीयांनी मोठ्या प्रमाणात भाजपाला मतदान केलं.

भाजपने २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेवर सर्वाधिक ३६ अमराठी नगरसेवक पाठवले होते, ज्यात २३ गुजराती, १२ उत्तर भारतीय आणि एक दक्षिण भारतीय आहे. आणि त्यानंतर भाजपने उत्तर भारतीय मतदानावरची आपली पकड अजूनच घट्ट केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचा प्रमुख उत्तर भारतीय चेहरा असलेल्या विद्या ठाकूर यांना स्थान होतं. त्याचबरोबर कृपाशंकर सिंग आणि राजहंस सिंग हे काँग्रेसचे उत्तर भारतीयांचे नेते आज भाजपात आहेत. त्यापैकी राजहंस सिंग यांना भारतीय जनता पार्टीने विधनपरिषेदेचं तिकीट देऊन आमदार देखील केलं आहे.

भाजपच्या महापालिकेच्या गटनेतेपदीही उत्तर प्रदेशातील आझमगड येथून आलेल्या विनोद मिश्रा यांची निवड करण्यात आली होती. इतिहासात असं पहिल्यांदा झालं होतं जेव्हा एक उत्तर भारतीय महापालिकेत भाजपचा गटनेता बनला होता.

उत्तर भारतीय मुस्लिमांचाही स्वतःच असं मोठं मतदान आहे.

मुंबईतल्या उत्तर भारतीय मतदानाच्या एकूण मतदानापैकी ४०% मतदान मुस्लिमांचं आहे. आत हे मतदान तर भाजपाला जात नाही मात्र या मतांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी अशी चौरंगी स्पर्धा असते. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकांत काँग्रेसचे ११, समाजवादी पक्षाचे ७, एआयएमआयएमचे ४, राष्ट्रीय काँग्रेसचे ६ आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला असे मुस्लिम नगरसेवक महानगरपालिकेवर निवडून गेले होते.

 काँग्रेसचे नसीम खान, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, राष्ट्रवादीचे नवाब मलिक हे मुस्लिम उत्तर भारतीयांचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात.  त्यामुळं उत्तर भारतीय मतांसाठी सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे. त्यामुळे ही मते छट पूजेच्या माध्यमातून आपल्याकडे कसे वळतील यासाठी सगळे पक्ष प्रयत्नशील असणार आहेत. 

हे ही वाच भिडू 

 

   

   

Leave A Reply

Your email address will not be published.