दिव्या भारतीने आत्महत्या केली होती की तिचा खून झाला होता?

ती एक शापित राजकन्या होती. जे अनुभव घ्यायला आपल्याला तीन चार आयुष्य लागले असते ते सगळ अवघ्या आपल्या उन्यापुऱ्या एकोणीस वर्षाच्या आयुष्यात बेभान पणे जगलेली.

दिव्या भारती.

मुंबईमध्ये एका मिडल क्लास इन्शुरन्स ऑफिसरच्या घरात तिचा जन्म झाला. शाळेत असतानाच तिच्या देखणेपणाची चर्चा सुरु झाली होती. एखाद्या बाहुलीसारखी दिसणारी दिव्या अवघी चौदा वर्षाची होती तेव्हा तिला नंदू तोलानी या बॉलीवूडच्या निर्मात्याने हेरलं.

तिला सिनेमात काम करणार का अशी ऑफर दिली. सिनेमात काम म्हणजे बाल कलाकार म्हणून नाही तर हिरोईन म्हणून.

ऐकून खर वाटत नाही ना? दुसरे एखादे पालक असते तर नाही म्हणाले असते पण दिव्या भारतीची आई अतिमहत्वाकांक्षी होती. तिला आपल्या आयुष्यात अधुरे राहिलेले स्वप्न आपल्या लहान मुलीकडून पूर्ण होताना दिसत होते. ‘गुनाहो बादशाह’ या सिनेमातून तिच्या वयाने दुप्पट असणाऱ्या मिथुनसोबत तिची एंट्री ठरली. पण ऐनवेळी कुठे तरी माशी शिंकली आणि दिव्या च्या ऐवजी संगीता बिजलानीला तो रोल मिळाला.

पण दिव्याची आई शांत बसणाऱ्यातली नव्हती. तिने पोरीला फिल्मी पडद्यावर आणायचंच असा चंग बांधला. नववी मध्ये असतानाच दिव्याने शाळा सोडली. पूर्ण वेळ सिनेमात करीयर करायचं असं ठरवल गेलं.

एकदिवस गोविंदाचा भाऊ किर्तीकुमार याची नजर दिव्यावर पडली. त्याला ती अतिशय आवडली. गोविंदाबरोबर तिला राधा का संगम नावाचा सिनेमा सुद्धा साईन केला. दिव्याचे अक्टिंग आणि डान्सचे क्लासेस सुरु झाले. सगळी तयारी झाली पण ऐनवेळी इथे सुद्धा दिव्याच्या ऐवजी जुही चावला आली. 

कारण सांगितलं जात होत की कीर्तीकुमार दिव्याच्या अतिप्रेमात पडला होता आणि याच मुळे तिला बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

बॉलीवूड मध्ये आपली काही डाळ शिजत नाही हे पाहून दिव्याचा मोर्चा दक्षिणेकडे वळवण्यात आला. तिथे मात्र या गोरयागोमट्यां छोट्याशा परीला लगेच संधी मिळाली.  वेंकटेश बरोबर बोबिली राजा नावाच्या तेलगु सिनेमात सोळा वर्षाची दिव्या भारती चमकली. सिनेमा सुपरहिट झाला. दिव्याचे दोन वर्षात सलग सहा सिनेमे रिलीज झाले. सगळे हिट होते.

आता फक्त साउथचेच नाही तर हिंदी सिनेमातले मोठे मोठे डायरेक्टर तिच्या बरोबर काम करायला उत्सुक होते. १९९२ साली दिव्या भारतीचे अकरा पिक्चर रिलीज झाले. यात सनी देओल बरोबरच्या विश्वात्मा मधलं सात समुंदर पार गाण सुपरहिट झालं. गोविंदा बरोबरच शोला और शबनम गाजला.शाहरुख आणि ऋषी कपूरचा दिवाना तर सुपरहिट झाला. 

“ऐसी दिवानगी देखी नही कभी” वगैरे गाणी भारतातल्या प्रत्येक तरुणाच्या ओठावर आणि दिव्या भारतीचे फिल्मफेअर मध्ये छापून आलेले फोटो प्रत्येकाच्या वह्या, पुस्तकात कपाटात आढळू लागले.

१९९२ हे वर्षच दिव्या भारतीच होत. तिचे अनेक सिनेमे आले. बरेच चालले, काही पडले देखील मात्र दिव्याच्या गाडीला ब्रेक नव्हता. अठराव्या वर्षी तिला जे सक्सेस मिळत होत ते आश्चर्यकारक होत. अल्लड वयाची दिव्या सेटवर देखील नखरे दाखवायला सुरवात केली होती. अशातच बातमी आली दिव्या भारतीने लग्न केले आहे.

शोला और शबनमच्या शुटींगवेळी तिची ओळख साजिद नाडियादवाला या तरुण प्रोड्युसरबरोबर झाली. त्याचे आजोबा मोठे निर्माते होते. दोघांचे सूर जुळले. १० मे १९९२ मध्ये दोघांचं लग्न झालं. लग्न झाल म्हणून दिव्या भारतीची स्पीड कमी झाली नाही. दिव्याला भराभर सिनेमे मिळत होते आणि ती साईनही करत चालली होती.

वेगवेगळ्या मॅगझिननी तिला सर्वात लहान वयातली सुपरस्टार घोषित केले  होते. पुढची श्रीदेवी असं तिला म्हणल जावू लागलं.

५ एप्रिल १९९३. मुंबई वर्सोवा मधील तुलसी अपार्टमेंट, रात्रीचे साडे अकरा वाजले होते. अचानक एक जोराची किंकाळी ऐकू आली. पाचव्या मजल्यावरून एक मुलगी खाली पडली होती. लोक गोळा झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती मुलगी म्हणजे सुपरस्टार दिव्या भारती होती. दवाखान्यात नेई पर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

पोलीस पंचनाम्यात जी गोष्ट समोर आली ती अशी.

आदल्या दिवशी दिव्या नुकतच चेन्नईवरून परत आली होती. दुसऱ्या दिवशी परत हैद्राबादला शुटींगसाठी जायचं होत. त्यादिवशी आपल्या लहान भावासोबत ती एक फ्लट पसंत करून आली होती. काही दिवसांनी तिच्या नवऱ्याच्या म्हणजेच साजिद नाडीयादवालाच्या सिनेमाच शुटींग शेड्युल मॉरीशसला ठरल होत. त्यातल्या कोश्चुमची चर्चा करायला ड्रेस डिझायनर नीता लुल्ला दिव्याच्या घरी आली. तिच्यासोबत तिचा नवरा देखील होता.

ते आल्यावर दिव्याने रमची बॉटल उघडली. गप्पा मारत मारत ती रेलिंगहालच्या खिडकीवर चढून बसली. तिच्या मित्रांच्यामते ही तिची नेहमीची सवय होती. एरवीच्या आयुष्यात न मिळणारा स्वातंत्र्याचा खुला श्वास घ्यायला तिला मिळायचा. नीता लुल्ला आणि तिचा नवरा टीव्ही बघत होते. 

दिव्याची एक अमृता नावाची मेड किचन मध्ये चखना बनवत होती. ती लहानपणापासून दिव्याची काळजी घेत होती. दिव्या तिला काही सांगत होती. हातात दारूचा ग्लास होता. आणि अचानक दिव्याचा तोल सुटला आणि ती खाली पडली.

तीच अकाली जाणं हे कोणालाच पटत नव्हत. दुसऱ्या दिवशी पेपरात सुवासनीच्या वेशातला तिचा मृतदेह पहिल्या पानावर छापून आला होता.

दिव्याच्या मृत्यूमागे अनेक कारणे सांगण्यात आली होती. तीच आणि साजिदचं काही दिवसापासून भांडण चालू होत असं दबक्या आवाजात म्हटल जात होत. याच भांडणातून तिचा खून झाला असं म्हणल जाऊ लागलं. साजिद त्या रात्री नेमका कुठे होता हे कधीच समोर आलं नाही. पण नीता लुल्ला आणि बाकीचे तिचे मित्र मात्र साजीद्ची बाजू घेत राहिले.

दिव्याची मेड अमृता जी या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार होती तिचा एकाच महिन्यात हृदयविकाराने मृत्यू झाला.

दिव्याची आई ही एक या प्रकरणाची वेगळीच बाजू होती. तिच्या दारूच्या आणि जुगाराच्या सवयीची चर्चा सुद्धा जोरात होत्या. असं म्हणतात की घरच्या या कटकटीना दिव्या कन्टाळली होती. दिव्याला स्वतःला त्रास देणे खूप आवडायचं. कधी हाताची नस कापून घे, कधी अंगावर जखमा करून घे असे तिला शौक निर्माण झाले होते. कोणी म्हणायचं दिव्या ड्रगच्या नशेत हे सगळ करते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून तिने आत्महत्या केली.

हे सगळे अनुमान कोर्टात खोटे ठरले. पाच वर्षाच्या तपासानंतर काहीही हाती लागले नाही.

साजिद नाडीयादवाला आजही आपले दिव्यावर किती प्रेम होते हे सांगत असतो. त्याच्या सिनेमाच्या सुरवातीला दिव्याचा फोटो हमखास असतो. त्याने आता दुसरे लग्नही केले आहे. आज इंडस्ट्रीमधल्या सर्वात श्रीमंत निर्मात्यांपैकी तो एक आहे.

दिव्याच्या मृत्यूचा फिल्मइंडस्ट्रीवर सुद्धा मोठा परिणाम होणे सहाजिक होते. तिचे अनेक सिनेमे पेंडीग होते. हे सिनेमे रविना टंडन, श्रीदेवी अशा तिच्या स्पर्धक अभिनेत्रींना मिळाले. ८०% शुटींग पूर्ण झालेला अनिल कपूरचा लाडला श्रीदेवीला घेऊन परत रिशुट करण्यात आला. साउथ मधल्या काही सिनेमात तर दिव्याची डुप्लिकेट असलेल्या रंभाला चान्स मिळाला. 

वयाच्या सोळाव्या वर्षी जेव्हा अजूनही आपल्याला घरचा अभ्यास पूर्ण करायचं टेन्शन सतावत असत तेव्हा ती बॉलीवूडची हिरोईन बनली होती. कॉलेजमध्ये सायकलवर जायचं की बसने जायचं हे विषय आपण सोडवत असतो तेव्हा अठरा वर्षाची ती सुपरस्टार होऊन लग्न संसाराला सुद्धा लागली होती. इंजिनियरिंग मध्ये पहिली केटी बसली यामुळे जेव्हा आपण निराश झालेलो तेव्हा नुकताच एकोणीसावा वाढदिवस साजरी केलेली दिव्या भारती मेली पण होती.

तीच आयुष्य हे एक दंतकथा बनून राहिलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.