फॉरेनवरुन एक फॅड आलं आणि कधी नव्हे ते पप्पांचे फोटो व्हॉट्सअपला दिसू लागले

आमच्या रुमवर एक वाढीव कार्यकर्ता राहतो. त्याचं वागणं बोलणं बघितलं की वाटतं, राम गोपाल वर्मानं मनोज वाजपेयीला काढून याला भिकू म्हात्रे म्हणून घेतला असता तरी सत्या चालला असता. भिकू सगळ्या पिक्चरमध्ये फक्त आपल्या बायकोला घाबरला आणि हा गडी फक्त आपल्या फादरला घाबरतो.

त्याची सगळी तुर्रमबाजगिरी घरनं एक फोन आला की गळून पडते. आपल्या वडिलांबद्दल बोलतानाही भावाची फाटते, आम्हाला तर हीच भीती असती, की चुकून याच्या पप्पांनी रुमवर यायचं ठरवलं, तर मुन्नाभाईनं हॉस्पिटल उभं केलेलं तसली खळबळ आम्हाला करावी लागेल.याचे फादर इतक्या कडक स्वभावाचे आहेत, त्यामुळं या दोघांमध्ये एक अघोषित ताण असतोय.  

आज मात्र भावानं पप्पांसाठी खास गुगलवर शोधून ढापलेल्या ओळी स्टेटस म्हणून ठेवल्यात. हे बघून आम्ही हँग झालो, पण आणखी बारीक झटका तेव्हा बसला जेव्हा याच्या वडिलांनी त्या स्टेटसचा स्क्रीनशॉट काढून आपल्या स्टेटसला ठेवलेल्या पाहिलं तेव्हा.

कित्येक बापा-पोराच्या नात्यात ही ‘यहां में पिघल गया’ मोमेन्ट येते, ती ‘फादर्स डे’ मुळं

आजच्या घडीला पार महाराष्ट्रातल्या एखाद्या खेड्यात पोहोचलेलं हे फादर्स डेचं फॅड आलं अमेरिकेतनं. तिथल्या सोनोरा स्मार्त डॉड या पोरीच्या डोक्यातून ही कल्पना आली आणि सगळ्या जगानं आपल्या पप्पांसाठी एक दिवस राखीव ठेवायला सुरुवात केली. 

सोनोराला आई नव्हती. तिचे वडील रिटायर्ड सैनिक होते. घरापासून लांब राहून, हलाखीचे दिवस काढत त्यांनी आपल्या सहा पोरांना आई आणि वडील दोघांचं प्रेम दिलं. या प्रेमामुळं सोनोराच्या मनात आलं, जर आपण आईसाठी मदर्स डे साजरा करतो, तसाच वडिलांसाठी पण एक दिवस असायला हवा.

सोनोराच्या बाबांचा म्हणजेच विलियम जॅक्सन स्मार्त यांचा वाढदिवस असायचा जून महिन्यात. त्यामुळे जून १९१० मध्ये वॉशिंग्टन शहरात तिनं फादर्स डे साजरा करायला सुरुवात केली. हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिनं अनेक कँपेन सुरु केले.

पण नुसतं कॅम्पेन करुन फील येईना, सेलिब्रेशन करायला लोकांकडे वेळही पाहिजे की. म्हणून सोनेरानं सरकारकडे त्यादिवशी सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली.

आणि हे प्रकरण पोहोचलं राष्ट्राध्यक्षांकडे!

त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते वुड्रो विल्सन. त्यांनी १९१६ मध्ये ही मागणी स्वीकारली आणि फादर्स डे साजरा करण्यास सुरुवात झाली.

परंतु या दिवसाला राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून मान्यता दिली ती राष्ट्राध्यक्ष केल्विन कुलीज यांनी. त्यांनी १९२४ मध्ये राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून मान्यता दिली खरी, परंतु याची तारीख काही निश्चित केली नाही. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष लिंडेन जॉन्स यांनी १९६६ मध्ये फादर्स डेची तारीख निश्चित केली.

कोणती एक तारीख निवडण्याऐवजी त्यांनी जून महिन्यातल्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा होईल हे जाहीर केलं. यानंतर १९७२ मध्ये राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी या दिवशी राष्ट्रीय सुट्टी मंजूर केली.

दंगा अमेरिकेत सुरू झाला होता, पण हे फॅड भारतापर्यंत कसं आलं ?

उत्तर आहे जागतिकीकरण. जागतिकीकरणाच्या धोरणानं निव्वळ भारताची अर्थव्यवस्थाच बदलली नाही तर भारतात सांस्कृतिक बदल सुद्धा झाले. यामुळे हे फॅड भारतभर पोहोचलं.

त्यानंतर झालेल्या इंटरनेट क्रांतीनं भारताच्या शहरातील हे फॅड खेड्यापाड्यात पोहोचलं. मग काय इतर दिवशी वडिलांना ठसून राहणारी पोरंही राकट, तापट आणि मातीत राबून कणखर झालेल्या पण आतून हळव्या असणाऱ्या बापाला सुद्धा त्याची पोरं फादर्स डेच्या शुभेच्छा द्यायला लागली.

पण प्रत्येक देशात फादर्स डेच्या शुभेच्छा एकाच दिवशी दिल्या जात नाहीत.

जगातील बहुतेक देश अमेरिकेप्रमाणे जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा करत असले तरी काही देशांचे फादर्स डे वेगवेगळे आहेत. ऑस्ट्रेलिया आणि त्याच्या जवळचे ओशेनिअन देश सप्टेंबरच्या पहिल्या रविवारी फादर्स डे साजरा करतात तर नॉर्डीक देश नोव्हेंबरच्या दुसऱ्या रविवारी.

सध्या युद्धग्रस्त असलेल्या युकेन आणि रशिया या एकेकाळी एकाच सोव्हियत युनियनमध्ये असलेल्या देशात सुद्धा फादर्स डे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. रशियात २३ फेब्रुवारीला तर युक्रेनमध्ये सप्टेंबरच्या तिसऱ्या रविवारी.

आता बाकीचं काहीही असुद्या, शक्य असेल त्या रुपानं वडिलांना शुभेच्छा द्यायला तेवढं विसरू नका..

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.