पुण्यात येऊन जनरल अरुण वैद्य यांची हत्या करणारे क्रूर अतिरेकी जिंदा आणि सुखा

इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्ल्यू स्टार घडवून आणले. १९८४ ला १ जून ते ८ जून पर्यंत हे ऑपरेशन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरून करण्यात आलं.

नंतर इंदिरा गांधींना ब्ल्यू स्टार ऑपरेशन घडवून आणले म्हणून आपला जीव गमवावा लागला.इंदिरा गांधींच्या हत्ये नंतर देशभर शीख लोकांच्या कत्तली घडवून आणल्या गेल्या. या एका मिल्ट्री ऑपरेशन नंतर देशभर कित्येक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. या ऑपरेशनने जन्म दिला तो सिरीयल मर्डर घडवून आणणाऱ्या हरजिंदर सिंग ‘जिंदा’ व सुखदेव सिंग ‘सुखा’ या जोडीला.

कोण होते ‘जिंदा-सुखा’?

‘जिंदा-सुखा’ शीख ऑर्गेनाईजेशन खलिस्थान कमांडो फ़ोर्स (KCF) चे सदस्य होते. वेगळा खलिस्थान मागणाऱ्या या संघटनेसाठी ‘जिंदा-सुखा’ या जोडीने प्रचंड हत्त्या व चोऱ्या केल्या.

अमृतसर जिल्ह्यात शेतकरी कुटूंबात १९६२साली जन्मलेल्या हरजिंदर सिंगने ‘जिंदा’ने ऑपरेशन ब्ल्यू स्टार झाले तेव्हा आपले शिक्षण अर्ध्यावर सोडून वेगळ्या खलिस्थानची मागणी करणाऱ्या आंदोलनात आपला सक्रिय सहभाग नोंदवला. याच काळात ब्ल्यू स्टार ऑपरेशन घडवून आणले गेले.

राजस्थानमधील गंगानगरमध्ये असलेल्या सुखदेव सिंग ‘सुखा’नेही ब्ल्यू स्टार घडलेले बघून आपले एमएचे शिक्षण अर्ध्यावर सोडत खलिस्तान कमांडो फोर्स ही संघटना जॉईन केली. तिथेच त्याला भेटला जिंदा. या दोघांनी मिळून केलेल्या गुन्ह्यांच्यामुळे अख्ख्या भारतात त्यांची दहशत पसरली होती.

‘जिंदा-सुखा’ या जोडीने घडवून आणलेल्या मोठ्या तीन हत्या:

१. काँग्रेस खासदार ललित माकन

इंदिरा गांधींच्या हत्ये नंतर शीखविरोधी दंगली घडवून आणल्याचा आरोप ललित माकन यांच्यावर होता. कॉंग्रेसच्या या खासदाराने जमावाला भडकावून दिल्यामुळे तीन हजार शीख लोक दंगलीत मारली गेली होती.

३१ जुलै १९८५चा दिवस. दिल्लीतील तिलक नगरच्या घरातून ललित माकन बाहेर पडले. रोडच्या साईडला असलेल्या आपल्या कार जवळ जायला लागले.तेवढ्यातच त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या जिंदा व सुखाने आपला सहकारी रणजित सिंग गिल सोबत स्कुटरवर एंट्री केली.

त्यांनी रस्त्यावरून आपल्या कारकडे जात असलेल्या ललित माकन यांच्यावर अंधाधुंद गोळ्या झाडल्या.अचानक झालेल्या हल्ल्याला वाचवण्यास माकन यांनी आपल्या घराकडे धाव घेतली. स्कुटरवर बसून आलेल्या तिघांनी कसलाच विचार न करता फायरिंग सुरूच ठेवली होती. यात माकन यांची पत्नी जखमी झाली.  माकन यांचा जीव वाचू शकला नाही.

तीन मारेकऱ्यांपैकी घटनेच्या दोन वर्षानंतर अमेरिकेत पळून गेलेल्या रणजित सिंग याला अटक करून भारतात आणलं गेलं. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. मात्र सुखा व जिंदा पळून जाण्यास यशस्वी ठरले.

जिंदा सुखा यांचे पुढचे टार्गेट होते ते

२.अर्जन दास , काँग्रेस नेता.

अर्जन दास यांना मारण्याचे पण कारण दंगलीशी जुडलेले होतंच. पण त्याहूनही जास्त मारेकऱ्यांचा जिव्हारी लागणारे होते ते अर्जन दास यांनी दंगली दरम्यान दिलेले स्टेटमेंट. दंगली दरम्यान “जब बड़ा पेड़ गिरता है तो धरती हिलती ही है.” असं वाक्य अर्जन दास यांनी वापरलं होतं.

राजीव गांधींचे निकटवर्तिय असलेले अर्जन दास तोवर मारेकऱ्यांचा लिस्टमध्ये सर्वात वर येऊन गेले होते. नानावटी कमिशन समोर दंगल पीडित लोकांनी अर्जन दास यांचा सक्रिय सहभाग असल्याचे आरोप केले होते.

५ डिसेंबर १९८५ जिंदा सुखा यांनी अर्जन दास यांची हत्या घडवून आणली.हत्या करून पळून जाण्यास नेहमीप्रमाणे जिंदा सुखा पळून जाण्यास यशस्वी झाले.

जिंदा-सुखाच्या मते ही केवळ सुरवात होती. त्यांना अजून बऱ्याच हत्या घडवून आणायच्या बाकी होत्या.

३.जनरल अरुणकुमार वैद्य 

ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी करणारे भारताचे लष्करप्रमुख जनरल अरुण वैद्य आता जिंदा सुखाच्या हिटलिस्टवर होते.  अरुण वैद्य निवृत्तीनंतर पुण्या स्थायिक झाले होते. खरेतर त्यांना यापूर्वीही अनेक धमक्या आल्या होत्या मात्र दोन युद्धामध्ये पराक्रम गाजवणाऱ्या अरुण वैद्य यांनी त्याला भिक घातली नव्हती.

जिंदा-सुखा हि जोडी त्यांचा शोध घेत काळ बनून पुण्यात आली.

१० ऑगस्ट १९८६ चा दिवस होता. जनरल अरुण वैद्य आपल्या पांढऱ्या मारुती कारमध्ये पत्नीसोबत मार्केटमध्ये खरेदी करून घरी परतत होते. पावणे बाराच्या दरम्यान राजेंद्रसिंहजी मार्गवर त्यांची कार अडवण्यात आली. पोलिसांच्या रिपोर्ट नुसार चार क्लीन शेव्ह असलेले तरुण मोटारसायकलवरून तिथे आले. यात जिंदा आणि सुखा होते.

त्यांनी मारुती कार थांबवून तिच्यावर अंधाधुंद गोळ्या झाडल्या. अरुण वैद्य यांना मानेवर व डोक्यात नऊ गोळ्या लागल्या. त्याच्या पत्नीला चार गोळ्या लागल्या. काय घडतंय हे कळायच्या आतच जिंदा सुखाने अरुण वैद्य यांची हत्या करून पळ काढला.

सुखाची अटक

पुण्यातून हत्या करताच सुखा व जिंदा ट्रकने मुंबईला पळून गेले. तिथून त्यांनी उत्तर भारत गाठला. महिन्याभराने सुखाला पुण्यात यायचं होतं. फरार होताना त्यांनी आपली शस्त्र पुण्यातच सोडली होती. ठरल्या प्रमाणे सुखा पुण्यात आला. पुण्यात येताच त्याचा एक ट्रकशी अपघात झाला. हत्येच्या वेळी वापरली गेलेली काळी स्कुटर अपघातात सापडली.

सुखाची येरवडा तुरंगामध्ये रवानगी करण्यात पोलिसांना यश आले. सुखा अटक होऊनही जिंदा बाहेर होता.सुखाच्या जाण्याने पण जिंदाच्या गुन्हेगारीला रोक लागली नव्हती.

खलिस्थान कमांडोच्या आपल्या पंधरा साथीदारांना घेऊन जिंदाने १३ फेब्रुवारी १९८७ला भारतातील इतिहासामधली सर्वात मोठी चोरी घडवून आणली.

पंधरा लोकांनी पोलिसांचा वेष धारण करून लुधियानातील मिलर गंजच्या पंजाब नॅशनल बँकेतून ५ करोड ७५ लाख रुपये एवढी रक्कम लुटून नेली. मशीनगन घेऊन आलेल्या या नकली पंधरा पोलिसांच्या चोरीची नोंद लिम्का बुक ऑफ़ रिकॉर्ड्समध्ये करण्यात आली.या घटने नंतर मात्र पोलिसांनी दिवसरात्र एक करून गुन्हेगारांना शोधण्याची मोहीम हाती घेतली.

अटक व फाशी

सतत पळून जाण्यात यशस्वी ठरलेला जिंदा मात्र आता लवकरच अटक होणार होता. पोलिसांच्या निश्चयापुढे कोणताच गुन्हेगार जास्तकाळ बाहेर नाही राहू शकत. जिंदाच्या बाबतीत ही असेच घडले. बँक चोरीच्या एक महिन्या नंतर जिंदाला पोलिसांनी दिल्लीतील मजनू का टीला नामक वस्तीतील एका गुरुद्वाऱ्यातून अटक केली गेली.

पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या जिंदाला पायात गोळी घालून पाडण्यात पोलिसांना यश आलं. येरवड्यात जिंदाला आणले गेले. जिंदा व सुखा जोडी परत एकत्र आली ती म्हणजे थेट येरवड्याच्या तुरुंगातच.

दोघांवर खटला चालला. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली मात्र गुन्हेगार आहोत म्हणून मानण्यास नकार दिला. राष्ट्रपतींना पत्र लिहून माफी ‘न’ देण्याची विनंती केली. ज्या ललित माकन यांच्या खुनाचे त्यांच्यावर आरोप होते त्याच माकन यांचे सासरे शंकर दयाळ शर्मा यांनी त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तोब केला.

९ ऑक्टोबर १९९२ला दोघांना फाशीची शिक्षा देण्यात आली.फाशी जातांना त्यांनी सीखो की आझादी व खलिस्थान जिंदाबादचे नारे दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.