“लालबागचा राजा” या गोष्टींमुळे पॉप्युलर होत गेला..!!!

आमच्या ओळखीचे एक काका आहेत. परळच्या एका छोट्याशा चाळीत नोकरी सांभाळत एकटेच राहतात. गणेशोत्सव जवळ आला की काका कधीच घरी सापडत नाहीत. ते सापडतात ते लालबागच्या राजाच्या कार्यकारी मंडळात.

दरवर्षी, आमच्या राजाच्या दर्शनाची सोय हे काकाच लावतात पण फक्त फोनवरुन. भेटा म्हणलं तर तेवढाही वेळ त्यांच्याकडे नसतो. हे तर काहीच नाही, दोन वर्षांपूर्वी त्यांना गणपतीची सुट्टी मिळाली नाही म्हणून त्यांनी डायरेक्ट नोकरीच सोडलेली.

बरं, गणपती बाप्पाविषयीची ही क्रेझ फक्त या काकांचीच नाही तर मुंबईच्या लालबाग परळ भागात राहणाऱ्या प्रत्येकाचीच असते. 

घरगुती बाप्पा असो नाहीतर मोठ्ठं सार्वजनिक मंडळ, गणेशोत्सवाबाबतीत लालबाग परळवाल्यांचा नाद नसतो करायचा. 

गणेशगल्ली, चिंतामणी, तेजुकाया या सगळ्या गणपतींची अख्ख्या देशात चर्चा असते आणि आपल्या लालबागच्या राजाची तर अख्ख्या जगात.

पण राहून राहून एक प्रश्न आवर्जून पडतो कि लालबागचा राजा इतका फेमस झाला कसा? लोकांमध्ये लालबागच्या राजाची क्रेझ टप्प्या टप्प्याने कशी वाढत गेली ते पाहूया.

नवसाला पावणारा गणपती

पहिलं म्हणजे लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून ज्याची कीर्ती सर्वदूर पोहोचली त्या लालबागच्या राजाची निर्मितीच मुळात एका नवसातून झाली होती. 

ही गोष्ट आहे १९३४ सालची. मुंबईत दादर आणि परळला लागून असलेला लालबाग परिसर प्रामुख्याने मच्छिमार आणि कोळी लोकांचा होता. त्याकाळी मुंबईकरांचं उत्पन्नाचं साधन म्हणजे गिरण्या होत्या. या परिसरात गिरणी कामगार तसच अनेक लहान मोठे दुकानदार सुद्धा राहत होते.

१९३२ मध्ये या विभागातली पेरू चाळ बंद झाल्याने मच्छीमार आणि दुकानदाराची कमाई थांबली होती. लालबागचा मच्छिबाजार उघड्यावर बसायचा, तेव्हा तिथल्या कोळीणींनी नवस केला की आम्हाला आमचा मच्छीबाजार बांधून मिळाला, तर त्या जागेत आम्ही गणपती बसवू.

सध्या अस्तित्वात असलेलं मार्केट निर्माण होण्यासाठी कोळी आणि इतर व्यापारी बंधूनी नवस केला आणि त्यांची इच्छा पूर्णही झाली.

पेरूचाळ इथे उघडयावर भरणारा बाजार १९३२ साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला. १९३२ मध्ये चाळ बंद करण्यात आली आणि स्थानिक मच्छीमार आणि विक्रेत्यांनी त्या जागी गणपती बसवण्याची शपथ घेतली.

केलेला नवस पूर्ण झाला म्हणून पुढे हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणूनच ओळखला जाऊ लागला आणि फेमस होत गेला. लोकं रांगा लावत बाप्पाच्या दर्शनासाठी लांबून लांबून यायला लागले. असं म्हटलं जातं की आधी गणेशगल्लीचा गणपती म्हणजे लालबाग परळची शान होता पण हळूहळू हे वलय नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाभोवती निर्माण होत गेलं.

स्वातंत्र्यपूर्व काळातला गणपती

लालबागचा राजा हा स्वातंत्र्यपूर्व काळातला गणपती आहे. लालबागच्या राजाची स्थापना झाली १९३४ साली. या काळात संपूर्ण देशभरातच स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. त्यात अख्खी मुंबई स्वातंत्र्य सैनिकांच्या, नेत्यांच्या भाषणांनी आणि घोषणांनी दुमदुमलेली असायची.

शिवाय सामान्य नागरिकांवर सुद्धा या मोठ्या हस्तींचा आणि त्यांच्या भाषणांचा कायम प्रभाव असायचा. 

१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि १९४९ सालचा लालबागचा राजा गांधीजींच्या रूपात लोकांच्या समोर आला. राजाचा देखावा आणि आजू बाजूची आरास सुद्धा त्याकाळच्या, आजू बाजूच्या परिस्थितीशी बांधलेली होती.

लोकांमध्ये महात्मा गांधींविषयी प्रचंड आत्मीयता आणि आदराची भावना होतीच, त्यामुळे साहजिकच लालबागच्या राजाविषयी वाटणारी ओढ सुद्धा त्या काळापासून दिवसेंदिवस वाढत गेली. शिवाय त्याकाळी चाललेल्या स्वातंत्र्य चळवळी, सामाजिक विषय, शेतकऱ्यांच्या समस्या अशा अनेक गोष्टी लालबागच्या राजाच्या मंडळातर्फे लोकांपर्यंत पोहोचवल्या जात असत. 

सामाजिक विषय पुढे आणणारा आणि काळासोबत चालणारा गणपती

लालबागचा राजा म्हणजे सामाजिक विषय पुढे आणणारा आणि काळासोबत चालणारा गणपती असंही आपल्याला म्हणता येईल. स्वातंत्र्य काळात तर झालंच पण लालबागच्या राजाचं सार्वजनिक मंडळ कायमच सामाजिक विषयांना हाताळणारं म्हणून समोर येतं. 

अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम या मंडळातर्फे कायम राबवण्यात येत असतात. या मंडळातर्फे रेग्युलर ब्लड डोनेशन आणि प्लाजमा डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात येतात तसंच या मंडळाचं डायलिसिस सेंटर सुद्धा आहे. 

बरं या सगळ्याची पब्लिसिटी करण्यात सुद्धा राजाचं मंडळ कोणतीही कसर सोडत नाही. काळाप्रमाणे बदलून सोशल मीडियावर अपडेटेड राहणं, पीआर अॅक्टिविटीज करणं तसंच प्रशासकीय अधिकारी, सेलेब्रिटीज, खेळाडू आणि राजकीय नेते यांना दर्शनासाठी निमंत्रणं देणं या सगळ्या गोष्टी मंडळाकडून आवर्जून केल्या जातात आणि यामुळे सुद्धा लालबागच्या राजाची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढणारीच ठरत असते. 

याशिवाय लालबागचा राजा फेमस होण्याचं एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे बरीचशी मिडिया हाऊजेस ही लालबाग परळ एरियातच असल्याने त्यांना तिथल्यातिथे असणाऱ्या गणपती मंडळांचं स्ट्रीमिंग करणं सोयीस्कर असायचं. 

यामुळेच सतत टेलिकास्ट होत राहून लालबागचा राजा आणि त्या एरियाचे जवळ जवळ सगळेच गणपती अख्ख्या देशभरात पोचायला मदत  झाली.

सोन पाऊलांचं वाढीव आकर्षण

लालबागच्या राजाची लोकांमध्ये क्रेझ वाढण्याचं अजून एक कारण सांगायचं तर त्याच्या सोन पाउलांचं वाढीव आकर्षण. खरं म्हणजे हि सोन पाऊलं तयार करण्यामागचं कारण काय होतं तर राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढल्यामुळे २००६ साली हि सोन पाऊलं तयार करण्यात आली.

त्याचं झालं असं कि गर्दीतला प्रत्येक भक्त दर्शनासाठी आला कि राजाच्या पाया पडत असे. पण यामुळे मूर्तीच्या पायाची झीज व्हायला सुरवात झाली. ती रोकण्यासाठी म्हणून ४० किलो चांदी आणि १ किलो सोनं वापरून हि सोन पाऊलं तयार करण्यात आली आणि लोकांमध्ये प्रचंड हिट झाली.

या पाऊलांपैकी एका सोन पाऊलाची किंमत सुमारे ७ करोड ५० लाख इतकी होती. या सोन पाऊलांमुळे लालबागच्या राजाचं एवढं नाव झालं की इतर छोटी मोठी मंडळं सुद्धा याचं अनुकरण करून मूर्त्यांचे हात आणि पाय सोनेरी करायला लागली. 

राजाचा देखावा 

आणि आता शेवटचं कारण सांगायचं ते म्हणजे राजाचा देखावा. २००८ साली लालबागच्या राजाचं जेव्हा ७५ वं वर्ष होतं त्यावेळी राजाची लोकांमधली क्रेझ अधिक वाढली होती. याला कारण ठरलं ते म्हणजे प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर नितीन चंद्रकांत देसाई यांनी लालबागच्या राजासाठी बनवलेला भव्य दिव्य असा देखावा.

त्याच दरम्यांन बॉलीवुड पिक्चर जोधा अकबर रिलीज झाला होता, त्यामुळे चित्रपटात दाखवल्या प्रमाणे सेट उभारण्यात आला होता. हत्तींचा भला मोठा सेट त्या वर्षी उभारण्यात आला आणि लालबागच्या राजाची चर्चाच चर्चा झाली. आधीच राजबिंडा दिसणाऱ्या लालबागच्या राजाची शोभा, या भव्य दिव्य देखाव्यामुळे अधिकच वाढीव दिसत होती.

तेव्हापासून लालबागच्या राजाच्या देखाव्याचं काम नितीन चंद्रकांत देसाइ यांच्याकडे लागलं आणि मग पुढे राजाच्या मूर्तीसोबतच राजासाठी केलेला भव्य दिव्य देखावा सुद्धा लोकांच्या आकर्षणाचा महत्वाचा केंद्र बिंदू बनला. 

२०१८ साली लालबागच्या राजाच्या मंडळाला सर्वात जास्त म्हणजे जवळ जवळ १४ करोड रुपयाची देणगी मिळाली होती.

त्यामुळे राजाच्या मंडळाला मिळणारा अमाप पैसा, राजाच्या पायी नतमस्तक होणारे शेकडो सेलेब्रिटीज, राजाचं होणारं पद्धतशीर विसर्जन या आणि अशा अनेक गोष्टी सुद्धा त्याच्या फेमस असण्याला कारणीभूत ठरतच असतात.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.