इंग्रजांना धोबी हवे होते, म्हणून महाराष्ट्रात उत्तर भारतीय लोक आले
रविवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबईत सभा झाली, सभेचं निम्मित होतं ‘हिंदी भाषिक संकल्प संमेलन.’ खरंतर ही सभा गाजली ती शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या मास्टरसभेला ‘उत्तर’सभा म्हणून. पण सभा सुरू झाल्यावर कुठल्या गोष्टीनं लक्ष वेधलं असेल… तर आयोजकांचं, नेत्यांचं हिंदी बोलणं.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळ्याच नेत्यांनी उत्तर भारतीय लोक घालतात तसा ‘गमचा’ गळ्यात घातलेला. सभेच्या स्टेजवर असेल किंवा प्रेक्षकांमध्ये उत्तर भारतीय नागरिकांची संख्या प्रचंड होती.
राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात उत्तर भारतीय लोकांविरोधात आंदोलन केलेलं. अनेकांना मारहाणही झाली होती. तेव्हा पेटलेला मनसे विरुद्ध उत्तर भारतीय वाद आता शमला असला तरी, खासदार बृजभूषण सिंग यांनी याच कारणामुळं राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केलाय.
गेल्या काही महिन्यांत राज यांची उत्तर भारतीयांविषयीची भूमिका मवाळ झाली आहे. दुसऱ्या बाजूला भाजपही राज्यातल्या उत्तर भारतीय वोटबँकेला आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरत आहे. त्यामुळं, उत्तर भारतीयांचं राज्यातलं प्राबल्य काही प्रमाणात वाढतंय, अनेक पक्ष ही वोटबँक आपल्याकडे यावी यासाठी प्रयत्न करतंय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
पण मुख्य मुद्दा असा येतो, की उत्तर भारतीय लोक महाराष्ट्रात कसे आले? त्यांच्या स्थलांतराचा इतिहास काय आहे?
सगळ्यात पहिला संदर्भ सापडतो, तो पेशवाईच्या काळात
पानिपतच्या लढाईआधी आणि नंतरही, मराठ्यांनी उत्तरेचा प्रचंड भूभाग आपल्या घोड्यांच्या टापांखाली आणला होता. दिल्लीच्या तख्तावरही मराठ्यांचा अंमल आला होता. उत्तर भारतात पसरलेल्या आणि झुंजणाऱ्या मराठा सैन्यात सैनिक म्हणून उत्तर प्रदेशच्या पूर्व पट्ट्यातले लोक भरती झाले. यांना ओळखलं जायचं, पूरभैय्या या नावानं. पुढे पेशवे पुण्यात आले, तेव्हा हे सैनिकही पुण्यातच स्थायिक झाले.
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री राममनोहर त्रिपाठी यांनी ‘बंबई के उत्तर भारतीय’ या नावानं एक पुस्तक लिहिलंय. त्यात या इतिहासाबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
या पुस्तकात ते सांगतात की, ‘१८५७ च्या आधी इंग्रज अधिकाऱ्यांसोबत मुंबईत घरगडी म्हणून आलेले धोबी बांधव हे स्थलांतर झालेले पहिले उत्तर भारतीय. यांच्यासोबतच १८५७ च्या उठावानंतर अनेक उत्तर भारतीय सुरक्षेसाठी म्हणून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी आसऱ्याला आले आणि इकडचेच झाले.’
उत्तर भारतीय लोकांचं महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईत स्थलांतर होण्यामागचं मुख्य कारण होतं, ते म्हणजे मुंबईचं झपाट्यानं झालेलं औद्योगिकीकरण.
मुंबईत गिरण्या उभ्या राहिल्या, तिथं कामगारांची गरज भासू लागली. मुंबई बंदर म्हणून विकसित होऊ लागलं, त्यामुळं रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. राज्यातल्या इतर भागांमधूनही अनेक जण मुंबईत स्थायिक झाले होते. मुंबईची लोकसंख्या वाढली आणि तिच्या गरजा पूर्ण करायला मनुष्यबळ हवंच होतं.
उत्तर भारतीयांनी लोकांच्या मूलभूत गरजा हेरल्या. ज्यांना महाराष्ट्रात येऊन नोकरी करायची नव्हती त्यांनी कमी भांडवलात चालतील असे व्यवसाय करायला सुरुवात केली. पानटपऱ्या, भेळपुरीच्या गाड्या, पिठाच्या गिरण्या, कोळशाची वखार, टॅक्सी, रिक्षा, ड्रायव्हर, वॉचमन, हमाल अशा अनेक ठिकाणी ते काम करु लागले.
आणखी एका व्यवसायावर उत्तर भारतीयांनी पकड मिळवली, ते म्हणजे दुधाचा व्यवसाय.
मुंबईची लोकसंख्या ज्या झपाट्यानं वाढत होती, त्याच झपाट्यानं दुधाची गरजही. अनेक उत्तर भारतीय लोकांनी परळ, कुलाबा, ताडदेव, ग्रांट रोड, आगरीपाडा अशा भागांमध्ये गोठे (त्यांच्या भाषेत तबेले) सुरू केले. (लिंक लागत नसेल तर सत्या पिक्चरची सुरुवात आठवा.) पुढं याच गोठ्यांमधून डेअऱ्या उभ्या राहिल्या. इथं काम करण्यासाठी त्या मालकांनी उत्तर भारतीय लोकांनाच बोलवून घेतलं.
१९८० च्या दशकात उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या वस्त्रो उद्योगात मंदी आली, साहजिकच तिथले कामगारही रोजगाराच्या आशेनं महाराष्ट्रातच आले. त्याचवेळी उत्तर भारतीय राज्यांमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळल्यानं अनेकांनी मुंबईचा रस्ता धरला.
राजकारणात बसवलेला जम-
आजच्या घडीला पाहिलं तर, अबू आझमी, नवाब मलिक, कृपाशंकर सिंग, राजहंस सिंग, संजय निरुपम, विद्या ठाकूर इत्यादी नावं महाराष्ट्राच्या राजकारणात गाजतायत. हे नेते महाराष्ट्रात स्वतःच्या जीवावर निवडून येऊ शकतायत. कारण महाराष्ट्रात उत्तर भारतीय मतदारांची संख्या पुरेशी आहे. पण या सगळ्याची सुरुवात झाली प्रजासमाजवादी पक्षापासून.
अशोक मेहता यांनी उत्तर भारतीय मतदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी आपल्या पक्षात त्यांना प्राधान्य दिलं. पण महाराष्ट्राचे पहिले उत्तर भारतीय आमदार झाले, पंडित भगीरथ झा. त्यांनी १९५१ च्या निवडणुकांमध्ये चिंचपोकळी-लोअर परळ मतदारसंघातून ते मुंबई विधानपरिषदेवर निवडून गेले.
त्यानंतर अनेक जणांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जम बसवला आणि सरकारमध्ये मोठी मजलही मारली.
सध्याची परिस्थिती काय सांगते-
इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, २०१७ च्या पालिका निवडणुकांमध्ये २२७ सदस्यसंख्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेत ७२ बिगरमराठी नगरसेवक निवडून आले. त्यापैकी १४ उत्तर भारतीय आहेत.
मुंबईतल्या एकूण प्रभागांपैकी १८४ प्रभागांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या ५ ते ५३ टक्क्यांपर्यंत आहे. यातल्या ६३ प्रभागांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचं प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
२०११ जनगणनेनुसार मुंबईला लागून असलेल्या ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये हिंदीभाषकांची संख्या ८० टक्क्यांनी वाढली होती.
रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन दरम्यान स्थलांतर झालं, तेव्हा महाराष्ट्रातून जवळपास १ लाख ७० हजार मजूर उत्तर भारतात गेले होते, तेच लॉकडाऊन शिथिल झाल्यावर, २ लाखापेक्षा जास्त मजूर महाराष्ट्रात आले होते.
थोडक्यात अगदी इंग्रजांच्या काळात धोबी म्हणून, त्यानंतर १९८० च्या दशकात रोजगाराची संधी म्हणून उत्तर भारतीय लोक महाराष्ट्रात आले आणि आता राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत त्यांच्या वोटबँकेला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे पक्ष प्रयत्न करतायत.
संदर्भ: ठाकरे विरुद्ध ठाकरे, धवल कुलकर्णी
हे ही वाच भिडू:
- या आधीही उत्तर भारतीय असणाऱ्या या नेत्यांनी राज ठाकरेंशी पंगा घेतला होता…पण
- मुंबईत फिरू देणार नाही.. सेनेच्या धमकीला उत्तर देणारा एकमेव माणूस म्हणजे ‘राहूल गांधी’
- समृद्धी महामार्गाचं श्रेय कोणाचं, फडणवीस की ठाकरे..?