महान शास्त्रज्ञ असलेले जयंत नारळीकर हे साहित्यिक बनण्यामागे एक रंजक किस्सा आहे.

मराठी साहित्य संमेलन म्हटलं कि, डॉक्टर जयंत नारळीकर यांची आठवण आल्या शिवाय राहत नाही. सगळेचं सांगतात जयंत नारळीकर यांना सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे… त्यांची ‘ नारळीकर सर’ ही ओळख !

म्हणून प्रेमाने आणि आदराने त्यांना नारळीकर सरच म्हणावंसं वाटतं !!!

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची एकमताने निवड करण्यात आली. हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे वैज्ञानिक यासोबतच त्यांची विज्ञान कथा लेखक म्हणून देखील मराठी साहित्य विश्वात त्यांचा वावर होता….

पण महान शास्त्रज्ञ जयंत नारळीकर साहित्यिक कसे बनले?

डॉ. नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे  १९ जुलै, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. ते वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. डॉक्टर नारळीकरांचे बरेचसे शिक्षण हे वाराणसीत झाले….आई आणि वडील दोघेही एवढे शिकलेले त्याचाच प्रभाव त्यांच्या एकंदरीत आयुष्यावर झाला.

डॉ. जयंत नारळीकर हे विज्ञान साहित्य निर्माण करत करतच त्यांनी मराठी साहित्यातील दालन समृद्ध केले, या विषयी दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी केलेल्या या योगदानाचा विचार करताना, मराठी साहित्याची वाटचाल ध्यानात घ्यावी लागेल.

नारळीकरांनी पाश्चात्य देशातील लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढतांना पाहिला त्याच वेळेला आपल्या देशातील लोकांमध्ये देखील विज्ञानाबद्दल आवड व जागरूकता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी मध्ये त्या काळी लिखाण करण्यास सुरुवात केली.

त्यांच्या त्याकाळी प्रकाशित झालेल्या पहिल्या ‘कृष्णविवर’ या कथेबद्दल चा किस्सा मोठा रंजक आहे.

मराठी विज्ञान परिषदेने त्याकाळी एक विज्ञान कथा स्पर्धा आयोजित केली होती. तर त्यात जयंत नारळीकर यांनी लिखाण करण्याचे ठरवले. परंतु आपण जर आपली कथा आपल्या नावानिशी दिली तर प्रेक्षकांवर दबाव येईल या नम्र भावनेने त्यांनी ती कथा आपल्या पत्नीच्या हस्ताक्षरात द्यायचे ठरवले. व आपले नाव न देता वि ना जगताप असे एक वेगळेच नाव दिले सदर कथेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

अशा रीतीने त्यांचा विज्ञान कथा लेखक म्हणून प्रवास सुरू झाला. विज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे यासाठी त्यांनी निरनिराळे प्रयोग समाजात केले.

१९७९ मध्ये डॉ. जयंत नारळीकर यांचा ‘यक्षांची देणगी’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. या एका कथासंग्रहाने विज्ञान साहित्याची सर्व परिमाणे बदलून टाकली.

सर्वसामान्यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमे उपलब्ध होण्याआधीचा तो काळ होता. अवकाशाबद्दल लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. अशा काळात नारळीकरांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला.

त्यांच्या नावाला हॉयल-नारळीकर सिद्धांतामुळे वलय प्राप्त झाले होते; मात्र साहित्याला मान्यता मिळण्यासाठी तेवढे पुरेसे नसते, हेही ध्यानात घ्यायला हवे. लेखनातील आशय, शैली, वाचकाला खिळवून ठेवण्याची क्षमता, विचारप्रवण करणारे कथानक आणि चांगली कलाकृती वाचल्याचे समाधान या गोष्टीही आवश्यक असतात.  नारळीकरांच्या पहिल्याच कथासंग्रहात त्या साध्य झाल्या. नारळीकरांसारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या कथा वाचणे, ही वाचकांसाठी पर्वणीच होते.

त्यांच्या ललित लेखनात ‘आकाशाशी जडले नाते’, ‘विज्ञान आणि वैज्ञानिक’, ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘विज्ञानातील वेचक वेधक’ या आणि अशा पुस्तकांचा समावेश आहे.

चार नगरांतले माझे विश्व’ हे हे त्यांचे आत्मचरित्र आहे आणि याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.