मदत मागण्याची वेळ आली, विनोद कांबळीचं नेमकं चुकलं तरी कुठं ?

साधारण १९९३ चा किस्सा. मुंबईमध्ये भारताची क्रिकेट मॅच होती. प्लेअर्सचं थांबण्याचं ठिकाण होतं ताज हॉटेल. ताजच्या पार्किंगला सचिनची कार लागायची, अझरुद्दीनची मर्सिडीज लागायची, कपिलपाजी बीएमडब्ल्यू घेऊन यायचे आणि या सगळ्यांच्या गर्दीत एक होंडा कायनॅटिक लागायची.

जशा इतर गाड्या ताजमधले दरबान लावायचे, तसंच या कायनॅटिकचा मालकही आपल्या साध्या टू व्हीलरची चावी दरबानाकडेच द्यायचा आणि त्याला गाडी बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीजच्या मध्ये लावायला सांगायचा. हॉटेलमधून निघायची वेळ आली की, पुन्हा दरबानच त्याला गाडी आणून द्यायचे…

हे असं शानमध्ये राहणारा प्लेअर होता, विनोद कांबळी. भारतीय क्रिकेटचा पहिला स्वॅगर बॉय.             

मध्यंतरी कांबळीनं एका मुलाखतीत खुलासा केला की, ‘मला आर्थिक मदतीची गरज आहे. माझा जो काही उदरनिर्वाह चालतोय, तो बीसीसीआयकडून मिळणाऱ्या ३० हजारांच्या पेन्शनवर चालतो. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे अनेकदा कामाची मागणी केली आहे. कोचिंग संबंधी काहीही काम असलं तरी मी ते करायला तयार आहे.’

पुढं त्यानं सचिन  तेंडुलकरचाही उल्लेख केला. तो म्हणाला,

‘माझ्या या परिस्थितीबद्दल सचिन तेंडुलकरलाही माहिती आहे. पण मी त्याच्याकडून मदतीची अपेक्षा करत नाही. कारण त्यानं मला ‘तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमी’मध्ये कोचिंगची संधी दिली होती, मात्र त्या कामासाठी भरपूर प्रवास करावा लागत असल्यानं मी ते काम सोडलं.’

थोडक्यात काय तर एकेकाळी आपल्या खतरनाक बॅटिंगमुळं, लाईफस्टाईलमुळं ओळखला जाणारा कांबळी मदतीची अपेक्षा करत होता.

पुढं जाऊन त्याला मदत मिळाली पण कांबळीवर ही वेळ कशामुळं आली ? तो क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर यशस्वी का ठरला नाही ? हे प्रश्न पडणं साहजिक आहे.

उत्तरं शोधायची म्हणलं, तर सुरुवात विनोद कांबळीच्या बालपणापासून करावी लागते

कांबळीचा स्ट्रगल लहानपणीपासूनच सुरू झाला. त्याचे वडील गणपत कांबळी हे फास्ट बॉलर होते, पण त्यांना व्यावसायिक क्रिकेटमध्ये हवं तसं यश मिळालं नाही. ते मेकॅनिक म्हणून काम करायचे. वडिलांचं क्रिकेट कांबळीमध्ये अगदी व्यवस्थित उतरलं होतं, शारदाश्रम शाळा आणि रमाकांत आचरेकर सरांसारखा गुरु मिळाल्यानं कांबळीच्या खेळाला व्यवस्थित पैलू पडत गेले.

पण शारदाश्रम शाळा त्याच्या कांजूरमार्गमधल्या घरापासून चांगलीच लांब होती, त्यामुळं रोज सकाळी गर्दीच्या लोकलमधून तो शाळेत यायचा. दुपारी परत घर गाठायचा आणि यावेळी किटबॅग घेऊन लोकलनं शिवाजी पार्कला प्रॅक्टिसला यायचा.

या प्रवासाला तो इतका कंटाळला की वयाच्या १२ व्या वर्षीच तो मित्राकडं वरळीला येऊन राहू लागला, क्रिकेटसाठी त्यानं वयाच्या १२ व्या वर्षीच घर सोडलं.

पुढं त्याच्या नावापुढं रन्सचे आकडे जमा होऊ लागले, गरज पडली तर थांबून खेळण्याचं आणि उचलून हाणायचं ठरवलं की पार बाजार उठवायचं स्कील कांबळीकडं होतं. त्यामुळं डोमेस्टिक क्रिकेटचा टप्पा पार करत त्यानं सचिननंतर दोनच वर्षांनी १९९१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

कांबळीच्या इंटरनॅशनल क्रिकेट करिअरचे तीन टप्पे करता येतात-

पहिला टप्पा हाणामारीचा, मैदानावरच्या हाणामारीचा. कांबळीनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर चौथ्याच इनिंगमध्ये इंग्लंडविरुद्ध डबल सेंच्युरी हाणली, त्याच्या पुढच्याच मॅचला झिम्बाब्वेला २२७ चोपले. त्यानंतर श्रीलंकेला सलग दोन शतकं हाणली. कांबळीचा हा टप्पा बघता, तो लॉर्ड क्रिकेटर होणार असंच सगळ्यांना वाटत होतं.

दुसऱ्या टप्प्यात मात्र त्यानं ९ वेळा टीममध्ये कमबॅक केलं. त्याला सलग अशी संधी मिळालीच नाही. दुर्दैव म्हणजे, ज्या वनडे टीममध्ये कांबळी परफेक्ट बसला असता, तिथं त्याला संधी मिळूनही सोनं करता आलं नाही. त्याच्या नावावर मोठे स्कोअर तर जमा झाले मात्र त्यात सातत्य तेवढं नव्हतं. त्यामुळं संघात आत बाहेर सुरूच राहिलं.

तिसरा टप्पा होता, १९९६ च्या वर्ल्डकपच्या सेमीफायनलचा. ही मॅच कोणताही भारतीय चाहता विसरु शकत नाही. भारताची टॉप ऑर्डर कोसळली होती, त्यानंतर विनोद कांबळी नावाचा एकच बादशहा भारताची आशा टिकवून होता, मात्र प्रेक्षकांनी ईडन गार्डन्सवर राडा सुरू केला आणि मॅच श्रीलंकेला बहाल करण्यात आली. भर मैदानातून रडत जाणारा विनोद कांबळी कित्येकांनी पाहिला. 

ही मॅच जिंकून दिली असती, तर कांबळी आयुष्यभर सुपरस्टार म्हणून जगला असता, पण या मॅचनंतरच त्याचं करिअर गंडत गेलं.

विनोद कांबळी संघाबाहेर का गेला..?

कांबळी भारताकडून १७ टेस्ट मॅचेस खेळला आणि १०४ वनडे. त्याचं वनडे करिअर ९ वर्ष टिकलं, तर टेस्ट करिअर फक्त २ वर्ष. चांगला परफॉर्मन्स नसला तरी खेळाडू अनेक वर्ष टीममध्ये टिकतात, पण कांबळी अनेकदा चांगली कामगिरी करुनही संघाबाहेर राहिला.

पहिलं कारण होतं त्याचा फॉर्म आणि बॅटिंगमधले कच्चे दुवे

कांबळी स्पिनर्सला किरकोळीत हाणायचा, त्याची ताकद आणि टायमिंग जबरदस्तच होतं. मात्र त्याचा विषय गंडायचा तो बाऊन्सर्ससमोर. हूक किंवा पूल करताना कांबळी अनेकदा आऊट व्हायचा. 

वेस्ट इंडिजच्या केनिथ बेंजामिन नावाच्या फास्ट बॉलरसमोर त्याची उडालेली तारांबळही सगळ्यांनी पाहिली होती.

दुसरं कारण होतं, भारताबाहेर खेळण्यात येणारं अपयश. 

त्या जमान्यात भारतीय टीम फारशी स्ट्रॉंग नव्हती, बाहेरच्या देशात आपण एखादी मॅच जिंकलो तरी खूप असायचं. त्यामुळं टीम निवडताना ज्यांच्या खेळाची खात्री आहे अशाच प्लेअर्सला निवडलं जायचं, कांबळी तुफान हाणायचा पण सातत्य नसल्यानं त्याचं नाव आपोआप तळाला जायचं. टेस्ट क्रिकेटमध्ये तो न्यूझीलंड आणि श्रीलंका वगळून कुठं खेळलाच नाही आणि वनडे क्रिकेटमध्ये युएईच्या स्पिनर फ्रेंडली पिचवर वगळता (१५ इनिंग्स, ३९८ रन्स) त्याची बॅट लई काही बोलली नाही.

तिसरं कारण होतं मैदानाबाहेरचे राडे. 

आता बघायला गेलं तर कांबळीनं काय हाणामारी केली नाही. पण त्यानं दारु पिल्याचे, शॉपिंगचे किस्से प्रचंड गाजले. एका बाजूला, कृष्णम्माचारी श्रीकांतनं लॉर्ड्सच्या बाल्कनीत सिगरेट पिली हे आजही अभिमानानं सांगितलं जातं. मात्र मैदानाबाहेर कांबळीनं दारु पिल्याच्या चर्चा मात्र कुचेष्टेनं केल्या जातात, हा विरोधाभास आहे. 

त्यापलीकडेही कांबळीचा उद्धटपणा, ॲटिट्यूडही त्याला नडला. त्यामुळं टीममधल्या सिनिअर्ससोबत आणि मॅनेजमेंटसोबत त्याचे संबंध फार काय जिव्हाळ्याचे राहिले नाहीत.

आणखी एक कारण म्हणजे, त्याकाळी टीम इंडियामध्ये अनधिकृत कोटा सिस्टीम होती. निवड समितीतले अधिकारी वर्चस्व वापरुन आपल्या विभागातले कार्यकर्ते पुढं आणायचे. कांबळी मुंबईचा, आधीच मुंबईचे काही प्लेअर्स टीममध्ये होतेच, त्यात बाकीच्या खेळाडूंशीही स्पर्धा असायची, त्यामुळं कांबळीला अनेकदा मुंबई सोडून दुसऱ्या विभागाकडून खेळण्याचा सल्ला मिळाला होता, मात्र त्यानं मुंबई काही सोडली नाही.

फॉर्म, बॅटिंगमधले कच्चे दुवे, वागणं आणि राजकारण या सगळ्याचा फटका कांबळीला बसला आणि त्याच्या क्रिकेट करिअरला अपेक्षेपेक्षा फार आधीच ब्रेक लागला आणि इथंच त्याचं गणित चुकलं.

रिटायरमेंट जाहीर केल्यानंतरही अनेक क्रिकेटर्स, क्रिकेटशी जोडलेले असतात. कांबळीची रम्मी मात्र तिथंही लागली नाही. कोचिंगममध्ये त्याला फारशी संधी मिळाली नाही, जी मिळाली त्यात काही विशेष करता आलं नाही.

त्यापेक्षा जास्त गाजलेला मुद्दा म्हणजे, १९९६ च्या वर्ल्डकप सेमीफायनलनंतर त्यानं कॅप्टन अझरुद्दीन आणि संघातल्या इतर खेळाडूंवर सेमीफायनल फिक्स असल्याचे आरोप केले होते. अर्थात खेळाडूंपासून सगळ्यांनी हे आरोप झिडकारले आणि त्यांच्याशी कांबळीचे संबंध बिघडलेच.

कांबळीही अनेकदा, ‘आपण या मॅचबद्दल बोलल्यानंच आपल्याला टीमबाहेर ठेवण्यात आलं’ असा आरोप करतो.

त्यानंतर कांबळी चर्चेत आला, तो ‘सच का सामना’ या रिऍलिटी  शोमध्ये त्यानं सचिन तेंडुलकरबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं. आपण खराब वेळेतून जात असताना सचिननं आपल्याला पाठिंबा दिला नाही, त्याच्यासाठी मला कायम सक्रिफाईज करावं लागलं. सचिननं आपल्याला फेअरवेल पार्टीला बोलावलं नाही, फेअरवेलच्या भाषणात माझा उल्लेख केला नाही, अशा अनेक गोष्टी तो या शोमध्ये बोलून गेला, ज्यामुळं थोडीशी सहानुभूती मिळाली असली, तरी विनोद कांबळीच्या वाट्याला नैराश्यच आलं.

यापलीकडेही कांबळी बातम्यांमध्ये राहिला तो त्याचा दारू पिऊन झालेला ऍक्सिडेंट, त्याच्याविरुद्ध करण्यात आलेली पोलिस तक्रार, रमीझ राजा आणि नवज्योत सिंग सिद्धूला ट्विटरवरुन केलेली शिवीगाळ, निवडणुकीत आलेलं अपयश, पिक्चरमधल्या कामावरुन झालेली टिंगल या आणि अशाच गोष्टींमुळं.

याच कारणांमुळे क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर कांबळीला डावलण्यात आलं आणि त्याला आपल्यातल्या टॅलेंटला न्याय देता आला नाही. 

ज्या शानमध्ये तो आपली कायनॅटिक पार्क करायला लावायचा, त्या शानमध्ये त्याला मैदानावरचा रुबाब राखता आला नाही, तो राखता आला असता तर आज कांबळी मदत मागण्याच्या नाही तर मदत करण्याच्या जागी असता, हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.