विलासराव देशमुखांचं सरकारही डीके शिवकुमार यांनीच वाचवलं होतं…

काँग्रेसनं भाजप आणि जेडीएस या दोन्ही पक्षांना मात देत कर्नाटक जिंकलंय. बहुमताचा आकडा पार करत काँग्रेसनं जेडीएस सोबतची आघाडी आणि ऑपरेशन लोटस या दोन्ही शक्यता मोडीत काढल्या. काँग्रेसच्या या विजयाचं श्रेय देण्यात आलं, काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांना.

भारत जोडो यात्रेचं परफेक्ट नियोजन, स्थानिक मुद्द्यांवर लावलेला जोर, सिद्धरामय्या व्हर्सेस शिवकुमार या अंतर्गत कलहात घेतलेली सामंजस्याची भूमिका, जेडीएसची पारंपारिक व्होटबँक असणाऱ्या वोक्कलिगा समाजाची मतं आपल्याकडे खेचण्यात मिळवलेलं यश अशा सगळ्या पातळ्यांवर डीके शिवकुमार यशस्वी ठरले. काँग्रेसच्या विजयाचं निर्निवाद श्रेय डीके शिवकुमार यांना देण्यात आलं.

आज काँग्रेसला कर्नाटकमध्ये बूस्टर मिळवून दिलेल्या डीके शिवकुमार यांनी बरोबर २१ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विलासराव देशमुखांचं सरकार वाचवलं होतं.

साल १९९९…

सेना-भाजप युतीला दुसऱ्यांदा सत्तेत येण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं आव्हान होतं, त्यांचा सामना होता मुरलेल्या काँग्रेससोबत आणि शरद पवारांनी नुकत्याच स्थापन केलेल्या राष्ट्रवादीसोबत. निवडणुका झाल्या आणि सेना-भाजपला १२५ जागा मिळाल्या, काँग्रेसनं ७५ जागा खिशात घातल्या, तर नवख्या राष्ट्रवादीनं ५८ जागांवर मुसंडी मारली. शरद पवार किंगमेकर बनले आणि राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, डावे, समाजवादी आणि अपक्ष असं सरकार सत्तेत आलं. सत्ता स्थापन तर झाली पण अंतर्गत कुरबुरी होत होत्या. या कुरबुरी शिगेला पोहोचल्या, २००२ मध्ये.

साल २००२…

सुनील तटकरेंवर नाराज असलेल्या शेकाप आमदारांनी सरकारचा राजीनामा काढल्याचं पत्र राज्यपालांना दिलं. तिकडं शिवसेनेच्या नारायण राणेंनी शालिनीताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे आठ-दहा आमदार फोडले, काँग्रेसचा एक आमदार फोडला आणि असा दावा केला की, या आमदारांसह शेकाप आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा आपल्याला आहे. या फुटलेल्या आमदारांनीही राज्यपालांना पत्र दिलं.

साहजिकच मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामोर आव्हान उभं राहिलं अविश्वास ठरावाचं.

आमदारांनी साथ सोडून जाऊ नये म्हणून सगळ्याच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली. फुटलेल्या आमदारांना नारायण राणेंनी मातोश्री स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवलं. आणखी आमदार फोडण्यासाठी राणे प्रयत्नशील आहेत ही कुणकुण लागली तेव्हा शरद पवारांनी आपल्या आमदारांना इंदौरला हलवलं.

पण सगळ्यात मोठा प्रश्न होता विलासरावांपुढे. काँग्रेस आमदारांना कुठे ठेवायचं यासाठी त्यांनी पर्याय निवडला, बँगलोरचा. बँगलोरच्या ईगलटन रिसॉर्टमध्ये सगळ्या काँग्रेस आमदारांची सोय झाली आणि त्यांच्यावर देखरेख करत होते, त्या रिसॉर्टचे मालक काँग्रेस आमदार डीके शिवकुमार.

काँग्रेसचे आमदार या रिसॉर्टमध्ये होते. मुळात हे रिसॉर्ट गाजलं होतं ते रिसॉर्ट पॉलिटिक्समुळेच. कर्नाटकमध्ये सरकार कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली की आमदारांची बस या ईगलटन रिसॉर्टकडे वळायची. डीके शिवकुमारही या राजकारणात प्रचंड चतुर होते. साहजिकच विलासरावांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि डीके शिवकुमार यांनीही तो सार्थ ठरवला. काँग्रेसच्या आमदारांना घेऊन ते स्वतः अविश्वास ठरावाच्या दिवशी हजर झाले.

काँग्रेसचा एकही आमदार फुटला नाही, उलट जे पद्माकर वळवी फुटल्याची चर्चा होती त्यांनीही नारायण राणेंविरोधात तक्रार करत आपलं मत आघाडीलाच दिलं.

अविश्वास ठराव पार पडला, तेव्हा युतीला १४२ मतं मिळाली, तर विलासराव देशमुखांच्या सरकारला १४३. एक आमदार फुटणंही कॉंग्रेससाठी धोक्याचं होतं, पण डीके शिवकुमार यांनी ही जबाबदारी चोखपणे पार पाडली आणि विलासरावांचं सरकार एका मतानं का होईना, पण वाचलं…

हे ही वाच भिडू:

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.