पवारांचा अर्थसंकल्प चुकला होता
महाराष्ट्राला अनेक अभ्यासू नेत्यांची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळात होणाऱ्या चर्चा या देशभर आदर्श समजल्या जायच्या. ही परंपरा टिकली जावी म्हणून नवीन येणाऱ्या आमदाराला संसदीय कामकाजाच व्यवस्थित ज्ञान मिळावं या कडे जेष्ठ नेत्यांचा कटाक्ष असे. त्यामुळेच फक्त विरोधी पक्षातच नव्हे तर सत्ताधारी पक्षात देखील सभागृह गाजवणारे नेते आपण पहिले आहेत.
काही वर्षापूर्वी महाराष्ट्र विधानमंडळाचा अमृत महोत्सव होता, त्या प्रसंगी “सभागृहातील आठवणी” म्हणून एक पुस्तक सरकारतर्फे प्रकाशित करण्यात आले होते. त्यात तत्कालीन आमदार उपराकार लक्ष्मण माने यांनी एक किस्सा सांगितला आहे.
माने यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होती.मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांना पहिल्या दिवशी भेटायला बोलावलं आणि सांगितल की रा.सु.गवई आणि श्रीकांत जिचकर यांच्या शेजारी बसून संसदीय कामकाजाच प्रशिक्षण घ्यायचं.
डॉ. श्रीकांत जिचकर हे वीस पदव्या मिळवलेले अनेक विषयांचे व्यासंगी असे काँग्रेसचे तरूण नेते होते. तेव्हा त्यावर्षीचा अर्थसंकल्प विधानसभेत पास होऊन विधानपरिषदेमध्ये चर्चेसाठी आलेला. जिचकरांनी मानेंना अर्थसंकल्प शिकवायचं ठरवलं. दोघे आमदारांना मिळतात त्या बजेटची कागदपत्रे असलेल्या भल्यामोठ्या बगा घेऊन विधानपरिषदेच्या पाठीमागच्या बाकावर जाऊन बसले. जिचकरांनी लक्ष्मण मानेना बजेटबद्दल सगळ समजावून सांगितलं.
पण बजेट समजावून सांगत असताना डॉक्टर जिचकरांना काही तरी गडबड दिसली. त्यांनी कॅलक्युलेटर मागवले. माने आणि त्यांनी मिळून सगळे हिशोब तपासले. अर्थसंकल्पाच्या ताळमेळ मध्ये गडबड होती. बजेट बनवताना बेरीज वजाबाकीच्या चुका झाल्या होत्या. त्यांनी विधिमंडळ सचिवाच्या ऑफिसमध्ये जाऊन बजेट परत चेक करून पाहिलं. ग्रंथालयातील मुख्य प्रत पाहून बेरजेची चूक झाली आहे याची पक्की खात्री करून घेतली. माने आणि जिचकर दोघे मग सभागृहात आले.
तेव्हा लोकमान्य टिळकांचे नातू जयंत टिळक विधानपरिषदेचे सभापती होते. विधानपरिषदेत चर्चा सुरु होती. जिचकरांनी प्रश्न विचारण्यासाठी हात वर केला. टिळकांनी परवानगी दिली. तेव्हा डॉक्टरांनी बजेट मधली बेरजेची चूक सभागृहापुढे मांडली. हे ऐकताच सभापती ताडकन जागेवर उभे राहिले. मुख्यमंत्रीसुद्धा जागेवरून उठले. सभा १० मिनिटासाठी तहकूब करण्यात आली. जिचकर आणि लक्ष्मण मानेना सभापतींच्या चेंबर मध्ये बोलवण्यात आलं.
सभापती चेंबर मध्ये त्या दोघांना घेऊन मुख्यमंत्री शरद पवार हजर झाले. जिचकरांनी मुख्यमंत्री आणि सभापतीना सगळ्या चुका दाखवल्या. नाजूक प्रसंग उद्भवला होता कारण विधानसभेत बजेट पास झाले होते आणि विधानपरिषदेला बजेट अडवण्याचे अधिकार नसतात. टिळक म्हणाले, “हि बाब खुप गंभीर आहे. कदाचित बजेट सेशन परत बोलवावे लागेल. चुका तांत्रिक आहेत. पण त्यामुळे सगळेच अडचणीत येतील. ” परत बजेट सेशन बोलवून सगळी प्रक्रिया आटोपून घ्यायला खूप वेळ जाणार होता आणि त्यामूळे शेवटी जनतेच्या विकासकामावर परिणाम होणार होता. टिळकांनी जिचकरांना जास्त ताणून न धरता पॉइंट ऑफ ऑर्डर मागे घेण्याची विनंती केली.
मुख्यमंत्र्यांनी दोन्ही तरुण सदस्यांचे कौतुक केले. चुकाची दुरुस्ती करून त्या चुका करणाऱ्या नोकरशाहीचे कान पकडण्याचे आश्वासन दिले. जिचकरांनीसुद्धा आपल्या नेत्यांचे शब्द मानून बजेट सुरळीतपणे पार पडू दिले. लक्ष्मण माने म्हणतात ,”या प्रसंगात डॉ. जिचकरांचा अभ्यासूपणा, त्यांची चिकाटी , त्यांची तळमळ, एका सभासदाने नीट काम केले तर प्रशासन हळू शकते हे सारे अनुभवले.”
हे ही वाच भिडू
- १९६८ साली सांगलीचा माणूस बनवलां ठाण्याचा नगराध्यक्ष शरद पवारांची अशीही करामत.
- कर्नाटकचे राज्यपाल १९९६ सालातील राजकीय पेचप्रसंगाचा बदला घेताहेत काय?
- कसलाही प्रचार न करता ४ वेळा आमदार झालेला नेता!!!
- शरद पवारांपासून ते सुशिलकुमार, भाई वैद्य, राम नाईक…. सर्वांनी मिळून कस फसवलं ?