झुंड असो किंवा पावनखिंड, पिक्चरच्या १००-२०० कोटी कमाईमागचं गणित असं असतंय

एका पानाच्या टपरीवर थांबलो होतो, तिथं तीन-चार कार्यकर्त्यांचा ग्रुप होता. आता पान खायला जमलेलं कोंडाळं थुकता थुकता पुतीनच्या फॉरेन पॉलिसीपासून नगरसेवकपदाला कोणाची सीट लागणार अशा सगळ्या विषयांवर गप्पा हाणू शकतंय. नाय म्हणलं, तरी भिडूचे कान गप्पांकडे होतेच.

तर त्यांची चर्चा सुरु होती, की झुंड पिक्चरनं बॉक्स ऑफिसवर एवढे पैसे कमवले, पावनखिंडनं तेवढे कमावले, आता प्रभासचा राधेश्याम रेसमध्ये आलाय. पैशांचे आकडे ऐकून इम्प्रेस व्हायला झालं, म्हणून म्हणलं सध्या पिक्चर बनवू शकत नसलो, तरी पिक्चरची बॉक्स ऑफिसवरची कमाई कशी मोजतात आणि डिस्ट्रिब्युटर्सचं गणित काय असतंय हे फिक्स शोधू शकतो.

शोधल्यावर जे सापडलं, तेच आता तुम्हाला सांगतो.

मल्टिप्लेक्समध्ये गेल्यावर आपण जिथून तिकीट घेतो तिथं वर मोट्ठ्या अक्षरात लिहिलेलं असतंय, बॉक्स ऑफिस. आपण पिक्चर बघायला जाताना जे तिकीट काढतो, तेच बॉक्स ऑफिस कलेक्शन असतंय. पण हे मोजलं कसं जातं आणि त्यात शेअर कुणाकुणाचा असतो.. हा विषय मात्र गंभीर आहे. लोड घेऊ नका, भिडूनं सोपा करून सांगितलाय.

तर पिक्चर बनवायला पैसे लावणारे कार्यकर्ते असतात, ते म्हणजे प्रोड्युसर्स. त्यांनी लावलेल्या पैशातून पिक्चर तयार होतो, त्याची जाहिरात आणि मार्केटिंग होतं, आता पुढचा विषय असतो तो पिक्चर थिएटरमध्ये लावायचा. ते काम करतात डिस्ट्रिब्युटर कार्यकर्ते. प्रोड्युसर आपल्या पिक्चरचे थिएटर राईट्स डिस्ट्रिब्युटरला विकतात. मग डिस्ट्रिब्युटर कार्यकर्ते थिएटरवाल्यांशी करार करुन पिक्चर थिएटरमध्ये लावतात.

आता या सगळ्यात पिक्चर पडला, तर लॉस डिस्ट्रिब्युटरला सहन करावा लागतो. प्रॉफिट झाला तरी पैसे डिस्ट्रिब्युटरच्याच खिशात जातात.

अजून दोन कार्यकर्त्यांचा रोल राहिलाय. पहिले म्हणजे थिएटर मालक. डिस्ट्रिब्युटर आणि मालकांमध्ये एक करार झालेला असतो. त्यानुसार डिस्ट्रिब्युटर लोक थिएटरमध्ये पिक्चर लावतात. आपल्या भारतात दोन टाईप्सची थिएटर्स आहेत, पहिलं म्हणजे मल्टिप्लेक्स, जिथं आपण फॅमिली सोबत किंवा आपल्या खड्यासोबत जातो. तिथं पिक्चर बघणं हा रॉयल कारभार असतो.

दुसरं म्हणजे सिंगल स्क्रीन थिएटर, जिथं कितीपण रद्दी पिक्चर बघण्यात, आपल्या दोस्तांसोबत जाण्यात एक वेगळीच शान असते, बरं हा कारभार मात्र स्वस्तात मस्त.

सगळ्यात महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणजे तुम्ही आणि आम्ही, अर्थात प्रेक्षक. आपण थिएटरला गर्दी केली, की बॉक्स ऑफिस कलेक्शन वाढतंय, नायतर पिक्चर पडला. आपण समजा पहिल्याच आठवड्यात लय गर्दी केली, तर पिक्चर दुसऱ्या आठवड्यात जाणार. पहिल्याच आठवड्यात गर्दी नाय झाली, तर पिक्चरचे शो कमी होतात आणि त्याला थिएटर मिळत नाय.

आता समजा पुष्पा पिक्चर आहे, ज्याचं तिकीट आहे शंभर रुपये, आठवड्याला शो लागलेत शंभर आणि प्रत्येक शोला जातायत शंभर लोकं. तर एका आठवड्यात त्या थिएटरमध्ये पुष्पाचं कलेक्शन झालं, १० लाख रुपये. आपल्या भारतात डिस्ट्रिब्युशनचे १४ सर्किट्स आहेत, त्या १४ सर्किट्समधल्या सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स थिएटर्सचं कलेक्शन एकत्र केलं जातं आणि मग शंभर कोटी, दोनशे कोटी असे आकडे फुटतात. जे काय कलेक्शन होतं त्यातून राज्यानं ठरवल्यानुसार एन्टरटेन्मेंट टॅक्स कट होतो. मग उरलेले पैसे म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शन.

आता हे पैसे डिस्ट्रिब्युट कसे होतात, याचं पण एक गणित असतंय. सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये अर्थातच शो कमी लागतात, त्यामुळं होणारा प्रॉफिट थोडा कमी असतो. त्यामुळं डिस्ट्रिब्युटर आणि सिंगल स्क्रीन थिएटर मालकांमधला करार थोडा वेगळा असतो.

ज्या आठवड्यात पिक्चर लागतो, तेव्हापासून शेवटच्या आठवड्यापर्यंत जे कलेक्शन थिएटरमध्ये होईल त्यातली ७० ते ९० टक्के रक्कम डिस्ट्रिब्युटरला दिली जाते.

मल्टिप्लेक्सवाले मात्र पहिल्या आठवड्यातल्या कलेक्शनमधली ५० टक्के रक्कम डिस्ट्रिब्युटरला देतात. दुसऱ्या आठवड्यात हा आकडा असतो ४२ टक्के, तिसऱ्या आठवड्यात ३७ टक्के आणि त्यानंतर पिक्चर सुरू आहे तोवर आठवड्याला ३० टक्के रक्कम डिस्ट्रिब्युटरला दिली जाते.

आता डिस्ट्रिब्युटर लोकं फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनमधूनच नाही, तर ओटीटी राईट्स, म्युझिक आणि सॅटेलाईट राईट्स यातून पण पैसे छापतात. अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेसची स्वतःचीच डिस्ट्रिब्युशन कंपनीही असते. आता यात आपल्याला पैसा दिसत असला, तरी पिक्चरचे राईट्स महागात घेतले आणि पिक्चर पडला, तर नुकसानाची रिस्क पण तेवढीच असते.

पण कसंय ना लाला, रिस्क है तो इष्क है.

आता पुढच्या वेळी कुणी टपरीवर बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल गप्पा हाणत असलं, तर त्यांना हे बिनधास्त हे ज्ञान द्या आणि तुम्हाला कुठून मिळालं हे सांगायला तेवढं विसरु नका.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.