पोरं चोरणारी टोळी या अफवेचा जन्म होतो तरी कसा

मित्र मैत्रणीचे, ऑफिसचे जसे व्हाट्सअपचे ग्रुप असतात तसेच शाळेतील मुलांच्या आई वडिलांचा सुद्धा ग्रुप असतो. त्यात होमवर्क, फी, कार्यक्रमा संबंधित माहिती दिली जात असते. मात्र राज्यभरातील पालकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर शाळेबद्दल कमी माहिती आणि  मुलांच्या अपहरणा बद्दलचे मेसेजच जास्त फिरत आहे. 

मुलांना पळवणारी टोळी सक्रिय झाल्याचा एकच मेसेज शहराचे नाव बदलून राज्यभरात फिरवण्यात येत आहे. शहराचं नाव सोडलं तर बाकी सगळं सेम आहे.   

अत्यंत महत्वाचे, पुणे येथे मुलं चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. कोंढवा येथील शाळेत काही लोक मुलांना पळवून नेण्याच्या दृष्टीने आली होती मात्र स्टाफच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या मुलाकडे बारीक लक्ष ठेवा. अशा प्रकारचा तो मेसेज आहे. तसेच काही व्हिडीओ सोशल मीडियावर सुद्धा शेअर करण्यात येत आहे. अशी अफवा फक्त पुण्यातच नाही तर मुंबई, नाशिक, नागपूर सारख्या शहरात फिरत आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

यामुळेच सांगली जिल्ह्यातील लवंगे गावात मुलं चोरी करण्याच्या संशयावरून उत्तरप्रदेश मधील ४ साधूंना मारहाण करण्यात होती. मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने पालघरची पुनरावृत्ती टळली. मागच्या वर्षी पालघर मध्ये अशाच प्रकारच्या अफवांमधून २ साधूंची हत्या करण्यात आली होती.    

पोलिसांनी अपहरण करणारी कुठलीही टोळी नसल्याचे सांगत सर्व मेसेजेस व व्हिडिओ निराधार आहेत. अशा अफवा व मेसेजेस कोणीही व्हायरल करू नये. तसेच खात्री करूनच मेसेज फाॅरवर्ड करावा असे आवाहन नागरिकांना केले आहे. 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या रेकॉर्ड मुलांच्या अपहरणाना बाबत काय सांगतो

मागच्या महिन्यात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या २०२१ चा अहवाल आला आहे. या अहवालानुसार २०२१ देशात सरासरी  दररोज ८२ खुनाच्या तर प्रत्येक तासाला ११ अपहरणाच्या घटना घडल्या. खुनाच्या सार्वधिक घटना झारखंड मध्ये तर सर्वाधिक अपहरणाच्या घटना देशाच्या राजधानीत  दिल्लीत घडल्या आहेत.       

देशभरात २०२० पेक्षा २०२१ मध्ये अपहरणाच्या घटना १९.९ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले आहे. २०२० मध्ये देशभरात ८४ हजार ८०५ घटना घडल्या होत्या. तर २०२१ मध्ये १ लाख १ हजार ७०७ घटना घडल्या आहेत. त्यात १ लाख ४ हजार १४९ जणांचे अपहरण करण्यात आले. यातील ९८ हजार ६०० जण परत आले तर ८२० जणांची हत्या करण्यात आली.

२०२१ मध्ये भारतात १ लाख ४ हजार १४९ जणांचे अपहरण करण्यात आले होते. यात  शुन्य ते १६ वर्षातील ३५ हजार मुलं होती.   

महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर ० ते ६ वर्षातील ११४ मुलांचं २०२१ मध्ये अपहरण करण्यात आले होते. ६ ते १२ वर्षातील ५४८ मुलाचं अपहरण झाले होते. तर १२ ते १६ वर्षातील मुलांचं ४ हजार २२८ जणांच अपहरण झाले होते. यात मुलींच प्रमाण जास्त आहे. 

मागच्या वर्षी राज्यात ० ते १६ वर्षातील ४ हजार ८९० मुलांचं अपहरण झाले होते. याचा अर्थ राज्यात सुद्धा सरासरी दररोज १३ अपहरणाच्या घटना घडत असतात. हे सगळं झालं रेकॉर्ड वरच. 

मुलं पळवणारी टोळी गावात आली आहे ही अफवा देशात काही नवीन नाही. 

लहानपण आठवून बघा, गावात सांगितलं जायचं की, मुलं पळवणारी टोळी आली आहे. त्यामुळे  गावातील सगळी पुरुष मंडळी रात्र रात्र भर जागून चौका थांबत असायची. मुलं पळवणारी टोळी असते अशी अफवा कधी पासून पसरवली जाते, त्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने काय उपाययोजना करण्यात येतात. 

याबाबत बोल भिडूशी बोलतांना माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी सांगितले की, 

सतराव्या-अठराव्या शतकात भारतात पेंढारी, ठग या टोळ्या गावात दरोडा टाकायच्या. तसेच यावेळी ते आपल्या सोबत मुलं पळवून नेत. ब्रिटिश काळात तर या टोळ्यांचा प्रचंड सुळसुळाट वाढला होता. याच बरोबर म्हणजे अनेक ठिकाणी नरबळी देण्यासाठी सुद्धा मुलांना पळवण्यात येत असायचे. 

नरबळी देण्याची प्रथा खूप जुनी आहे. त्यामुळे अनेकवेळा लहान मुलांना पळवून नेल्याच्या घटना इतिहासात घडल्या आहेत. यामुळे ब्रिटिश काळाच्या अगोदर पासून मुलं पळवून नेट असल्याची अफवा पसरवण्यात येते. त्यावेळी सुद्धा अनोळखी माणसाला मारहाण करण्यात येत होती. 

तसेच नवीन पूल, रस्ता बांधतांना लहान मुलांना खड्यात लहान मुल टाकले जातात अशी अफवा सुद्धा होती. मात्र ते काही खरे नाही. कोणी तरी एकाला सांगतो तो दुसऱ्याला सांगतो. अशा प्रकारेच्या अफवा पूर्वीपासून गावा गावात पसविण्यात येतात.    

अफवा पसरविण्यात येत असल्याचे समजल्यानंतर पोलीस अधिकारी  गावा – गावात जाऊन पोलीस पाटील, कोतवाल, गावकऱ्यांची  बैठक घ्यायचे. तसेच भीती जावी म्हणून गस्त पथक सुद्धा नेमायचे. यामुळे गावातील इतर लोक निवांत राहायचे. कालानंतरने लोकांना लक्षात यायचे की, अशा प्रकारे कुठलीच घटना घडत नाही. त्यामुळे लोक अफवा विसरून जायचे आणि त्यानंतर मग सगळं सुरळीत व्हायचं.      

 याबाबत बोल भिडूशी बोलतांना पुणे सायबर ठाण्याचे निरीक्षक दगडू हाके म्हणाले की,

पोर पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि शाळकरी मुलांच अपहरण करत अशा प्रकारची तक्रार आमच्याकडे आली नाही. कोणीही अशा प्रकराची अफवा नागरिकांनी पसरवू नये. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्हाट्सअपला एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन असल्याने पहिला मेसेज कोणी पाठवला हे समजत नाही. यासाठी कोणी कोणी फॉरवर्ड केला हे मॅन्युअली जाऊन चेक करावं लागणार आहे. तसेच हे काम सोपं नसल्याचे त्यांनी सांगितले. 

अफवेमुळे गावच्या गावे पहारे देत बसायची. अगोदर एकमेकांना भेटून अफवा पसरवली जात होती. आता ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्यात येत आहे. हाच काय तो फरक. 

हे ही वाच भिडू  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.