जामा मशिदीतून राष्ट्रपतींच्या विजयाची घोषणा करण्यात आली…!!!

१९६७ सालची राष्ट्रपतीपदाची निवडणूक. याच निवडणुकीतून देशाला पहिले मुस्लीम राष्ट्रपती मिळाले होते, परंतु १९६९ साली म्हणजेच राष्ट्रपती पदावर विराजमान फक्त २ वर्षच झाल्यानंतर हार्ट अॅटकने झालेल्या मृत्यूमुळे हेच राष्ट्रपती आपला कार्यकाळ पूर्ण न करू शकलेले देशाचे पहिले राष्ट्रपती देखील ठरले होते. राष्ट्रपतीपदी निवडून आलेल्या नेत्याचं नांव होतं डॉ. झाकीर हुसेन.

१९६७ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या काही दिवसानंतरच राष्ट्रपतीपदाची निवडणूक देखील आली होती. १९६२ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत १९६७ साली काँग्रेसच्या बऱ्याच जागा घटल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते डॉ. झाकीर हुसेन. विरोधी पक्षीयांनी आपल्या उमेदवाराच्या स्वरुपात मैदानात उतरवलं होतं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश के. सुब्बाराव यांना.

काँग्रेस विरोधात संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला होता.

या निवडणुकीत जर काँग्रेस उमेदवाराचा पराभव करण्यात विरोधी पक्षीयांना यश आलं तर तो काँग्रेसचा नैतिक पराभव ठरणार होता. त्यामुळे सर्व विरोधी पक्षीयांनी  एकत्र येऊन त्यासाठी कंबर कसली होती.

काँग्रेसकडून निवडणूक न होता सर्वसंमतीने राष्ट्रपती निवडण्यासाठीचे प्रयत्न करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. झाकीर हुसेन यांना बिनविरोध निवडून आणण्याच्या बदल्यात विरोधी पक्षांचे उमेदवार असणाऱ्या के.सुब्बाराव यांना उपराष्ट्रपती बनविण्याची तयारी दर्शविली होती. परंतु विरोधी पक्षीयांनी हा प्रस्ताव फेटाळला. काँग्रेस कमकुवत झाल्याने काँग्रेसकडून वाटाघाटी करण्यात येत आहेत, असा संदेश त्यातून विरोधकांनी घेतला. शिवाय काँग्रेसवर हल्ला करून काँग्रेसला अजून कमजोर करण्याची हीच योग्य वेळ आहे, असं देखील विरोधकांना वाटलं. त्यामुळे निवडणूक पार पडणं ही अपरिहार्यता झाली.

काँग्रेसकडे झाकीर हुसेन यांना निवडून आणण्यासाठी बहुमत होतं, परंतु ते काठावरचं बहुमत होतं. निवडणुकीत जर क्रॉस-वोटिंग झालं तर झाकीर हुसेन यांचा पराभव होऊ शकतो अशी भीती काँग्रेसला होती. अशा परिस्थितीत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मदत झाली ती गांधीवादी नेते जयप्रकाश नारायण यांची. खरं तर तोपर्यंत जेपिंनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती, परंतु अशाही परिस्थितीत त्यांनी एक स्टेटमेंट दिलं. आपल्या स्टेटमेंटमध्ये जेपी म्हणाले की, “ झाकीर हुसेन हे जर या निवडणुकीत पराभूत झाले तर ही घटना देशाच्या धार्मिक एकतेस बाधा पोहचविणारी ठरू शकेल. देश विभागला जाईल” जेपींच्या या विधानाचा अपेक्षित परिणाम राष्ट्रपतीपदाच्या निकालावर दिसून आला.

६ मे १९६७. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. डॉ. झाकीर हुसेन यांना विजयी घोषित करण्यात आलं आणि अशाप्रकारे देशाला पहिले मुस्लीम राष्ट्रपती मिळाले. हुसेन साहेबांचे अभिनंदन करण्यासाठी इंदिरा गांधी लगबगीने हुसेन साहेबांच्या निवास्थानी पोहोचल्या, परंतु त्यांच्या विजयाची बातमी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आधीच हुसेन साहेबांना दिली होती. या निकालांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं.

देशाच्या इतिहासात प्रथमच जामा मशिदीतून राष्ट्रपतींच्या विजयाची घोषणा करण्यात आली.

राष्ट्रपतीपदावर विराजमान तर झाले परंतु डॉ. झाकीर हुसेन यांच्या तब्येतीची नेहमीचीच असणारी किरकिर देखील सुरूच होती. हार्ट अॅटकचा एक झटका पूर्वीच येऊन गेला होता आणि डायबीटीचा त्रास देखील होता. आपल्या तब्येतीची त्यांना नियमित तपासणी करून घ्यावी लागत असे. ३ मे १९६९ रोजी देखील अशाच नियमित तपासणीसाठी हुसेन साहेबांचे डॉक्टर आलेले होते. त्यावेळी बाथरूमहून आल्यानंतर तपासणी करू असं सांगून हुसेन साहेब बाथरूममध्ये गेले ते परतलेच नाहीत.  हार्ट अॅटकचा दुसरा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला आणि देशाचे पहिल्या मुस्लीम राष्ट्रपतींनी आपला कार्यकाळ पूर्ण न करताच जगाचा निरोप घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.