निमित्त दहीहंडीचं, पण शिंदे-फडणवीस सरकारचा नेमका प्लॅन काय..?

अरे बोल बजरंग बली की जय, हा आवाज दोन वर्षांनी सगळीकडे घुमला आणि राज्यभर दहीहंडीचा उत्सव जोरदार साजरा झाला. ८-९ थर, लाखोंची बक्षिसं यांच्या गदारोळात राजकीय थरांची बांधणी झाली ती वेगळीच.

काही वर्षांपूर्वी दहीहंडी हा मुख्यत्वे शिवसेना आणि काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्सव मानला जायचा. दोन्ही पक्षांमधले अनेक नेते आपापल्या भागात हंड्या उभ्या करायचे, लाखांची बक्षिसं, नेते आणि सेलिब्रेटींच्या भेटी अशा अनेक गोष्टींमधून त्या नेत्याचं आणि पक्षाचं जोरदार ब्रॅण्डिंग व्हायचं. लॉकडाऊनमुळं दोन वर्षांचा ब्रेक लागला, पण यंदा दहीहंडी जुन्याच उत्साहात साजरी झाली.

फक्त एक गोष्ट यावेळी बदलली होती, ती म्हणजे मुंबई-ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवावर शिंदे गट आणि भाजपची छाप दिसून आली.

अनेक ठिकाणच्या दहीहंड्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, शहाजीबापू पाटील सहभागी होते, तर खासकरुन मुंबईतल्या उत्सवामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजप नेते किरीट सोमय्या यांची उपस्थिती होती. तुलनेनं विरोधी पक्षातून फक्त आदित्य ठाकरेंनीच मोठ्या प्रमाणावर मंडळांना भेटी दिल्या.

त्यामुळं दहीहंडी उत्सवात पुढाकार घेण्यामागे शिंदे गट आणि भाजपचा नेमका प्लॅन काय आहे ? दहीहंडी उत्सव हा शिवसेनेच्या जडणघडणीत इतका महत्त्वाचा का मानला जातो ? हेच पाहुयात.

सुरुवातीला दहीहंडी उत्सव हा मुंबईतल्या चाळी किंवा नाक्यांपुरता मर्यादित होता. कित्येक चाळींमध्ये छोट्या दहीहंड्या लाऊन चाळीतलीच मुलं ती फोडायची. पुढं १९८० नंतर उत्सवाचं प्रमाण काहीसं मोठं झालं. पण तेव्हाही मुंबईच्या आजूबाजूच्या व्यायामशाळा, क्रीडापथकंच हंडी फोडायला यायची आणि जवळपास ५-६ थरांवर या हंड्या फुटायच्या. तेव्हा हे उत्सव फारसे राजकीय झाले नव्हते. मात्र १९९० नंतर चित्र बदलत गेलं.

असं सांगण्यात येतं की, या बदलत्या उत्सवाची सुरुवात झाली ठाण्यापासून.

ठाण्यात शिवसेना नेते आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावर वेगवेगळे उत्सव साजरे करायला सुरुवात केली. यात नवरात्र उत्सव, शिवजयंती, दहीहंडी असे उत्सव होते. त्यांनी सुरु केलेले उत्सव ठाण्यातल्या शिवसेनेचे प्रमुख उत्सव मानले जायचे आणि त्याला मोठ्या प्रमाणावर गर्दीही व्हायची.

दुसऱ्या बाजूला शिवसेनेनं मुंबईतही हाच उत्सवाचा फॉर्म्युला वापरला होता. शिवसेनेची मुख्य ताकद त्यांच्या शाखांमध्ये असल्याचं आजही मानलं जातं. प्रत्येक वॉर्डात असणाऱ्या या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचा भरणा असायचा. या तरुण कार्यकर्त्यांना उपक्रम म्हणून सेनेनं उत्सवांचं प्रस्थ आणलं.

उत्तरेत लोकप्रिय असलेला गोपाळकाला उत्सव दहीहंडीच्या रूपानं मराठी घरांमध्येही पोहोचला. दहीहंडीला मराठी सणाची पार्श्वभूमी मिळाली आणि उत्सवांमधून कार्यकर्ते जोडत सेनेनं आपलं वर्चस्व वाढवलं.

एक उदाहरण सांगायचं झालं तर छगन भुजबळांनी सेना सोडल्यावर त्यांना माझगावात हरवायचंच यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसली होती. तेव्हा भुजबळांसमोर नगरसेवक असणारे बाळा नांदगावकर उभे राहिले आणि भुजबळ १२ हजारांच्या फरकानं पडले. बाळा नांदगावकरांची लोकप्रियता वाढण्यामागं जसा बाळासाहेब, राज ठाकरे यांनी केलेला प्रचार कारणीभूत होता, तसंच माझगाव ताडवाडी गोविंदा पथकात असलेला नांदगावकर यांचा सक्रिय सहभाग हेही एक कारण होतंच.

या गोविंदा पथकामुळं साहजिकच ते कित्येक तरुणांशी जोडले गेले आणि निवडणुकीवेळी कार्यकर्त्यांची फौज उभी करता आली.

फक्त बाळा नांदगावकरच नाही, तर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ठाण्यातली हंडी, आधी शिवसेनेत आणि आता काँग्रेसमध्ये असलेले संजय निरुपम यांची अंधेरीतली दहीहंडी या सुद्धा कायम चर्चेचा विषय ठरल्या आहेत. सोबतच राष्ट्रवादीनंही दहीहंडीच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली. ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांची संघर्ष प्रतिष्ठानची दहीहंडी कायम चर्चेत असायची, काही लाखातली बक्षिसं, सेलिब्रेटींचा वावर, नावाजलेली गोविंदा पथकं, थेट प्रक्षेपण आणि स्पेनच्या कॅसलर्स संघाचं सादरीकरण यामुळं संघर्षची दहीहंडी गाजली. 

आधी राष्ट्रवादी आणि सध्या शिवसेनेत असलेले सचिन अहीर यांनी २०१० सालापासून वरळीमधल्या जाम्बोरी मैदानावर दहीहंडी उत्सव सुरू केला, मुंबईमधली अनेक गोविंदा पथकं त्यांच्या हंडीला हजेरी लावायची. सोबतच भाजप मनसे आणि पुन्हा भाजप असा प्रवास करणाऱ्या राम कदमांची हंडीही दरवर्षी गाजते. 

बॅनर्सपासून वर्गणीपर्यंत अनेक गोष्टींमुळं हे नेते आणि त्यांचे पक्ष या उत्सवांमुळं घरोघरी पोहोचले.

पण हे झालं २०१९ पर्यंतचं, त्यानंतर २ वर्ष उत्सवांना ब्रेक लागला आणि यंदा मात्र शिवसेना, राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेले हे उत्सव पूर्णपणे भाजप-शिंदे गटानं ताब्यात घेतल्याचं चित्र दिसून आलं. 

याची सुरुवात झाली वरळीतल्या जांबोरी मैदानासाठीच्या राड्यापासून. जांबोरी मैदानावर आजपर्यंत सचिन अहिर यांची दहिहंडी साजरी व्हायची. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात होणारी ही दहीहंडी सध्याची परिस्थिती पाहता शिवसेनेसाठी महत्त्वाची होती. 

मात्र यावर्षी भाजपनं हे मैदान मिळवलं आणि तिथं आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपची दहीहंडी झाली. त्यामुळं आदित्य ठाकरे, सचिन अहीर, सुनील शिंदे असे ३ आमदार असूनही वरळीत सेनेला बॅकफूटवर ढकलण्यात भाजपला यश आलं.

पण हे चित्र फक्त वरळीपुरतंच मर्यादित राहिलं नाही. याआधी दहीहंडीमध्ये फारशा सक्रिय नसणाऱ्या भाजपनं यावर्षी ३७० हंड्यांचं आयोजन केलं, ज्याच्यासाठी जवळपास ३५५ गोविंदा पथकांनी नोंदणी केली होती. त्यामुळं भाजपचं तर वर्चस्व दिसून आलंच, पण शिंदे गटही मागे नव्हता. आनंद दिघे यांनी सुरु केलेली टेंभी नाक्याची दहीहंडी त्यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंनी चालवली आणि आता ही हंडी श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून सुरू आहे. 

मानाची दहीहंडी म्हणून लोकप्रिय असलेल्या हंडीला यावेळी शिंदे आणि फडणवीस यांनी उपस्थिती तर लावलीच, पण सोबतच एकनाथ शिंदे यांनी ‘आम्ही दीड महिन्यापूर्वी मोठी दहीहंडी फोडली, त्यासाठी ५० थर लावले होते,’ असं विधानही केलं. 

पण त्याहीपेक्षा मुद्दा गाजला तो टेंभीनाक्याच्या दहीहंडीच्या आसपास लावलेल्या पोस्टरचा. यावर्षी टेंभीनाक्यावर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांच्यासोबतच नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची पोस्टर्सही लावण्यात आली होती. त्यात बाळासाहेबांच्या पोस्टरवर मी माझ्या शिवसेनेची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही, अशी वाक्यही लिहिली होती, साहजिकच दहीहंडीच्या निमित्तानं हा राजकीय कालाही चांगलाच गाजला. 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन घेतलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी ११ तर देवेंद्र फडणवीस यांनी १० मोठ्या दहीहंडी उत्सवांना हजेरी लावली. मनसेनंही ठाण्यात आणि मुंबईत काही ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलं होतं.

आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे, या सगळ्या उत्सवात शिवसेना कुठं होती ?

 तर शिवसेनेनं यावर्षी ठिकठिकाणी निष्ठा दहीहंडीचं आयोजन केलं होतं. मात्र त्यांच्या दोन दहीहंड्यांची विशेष चर्चा झाली. सेनाभवनासमोरच आयोजित करण्यात आलेली निष्ठा दहीहंडी आणि ठाण्यात खासदार राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टनं आयोजित केलेली महादहीहंडी. राजन विचारे हे टेंभी नाक्यापासून फक्त काही अंतरावर असलेल्या जांभळी नाक्यावर दहीहंडीचं आयोजन करतात. 

त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्याच बालेकिल्ल्यात झालेली ही हंडी आणि त्याला आदित्य ठाकरेंनी लावलेली उपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला. आदित्य यांनीही जवळपास १० प्रमुख हंड्यांना भेटी दिल्याची माहिती शिवसेनेच्या सोशल मीडिया पेजवरुन मिळते.

आता मुद्दा राहतो तो म्हणजे, उत्सवांना पाठबळ देण्यामागे एकनाथ शिंदे आणि भाजपचा नेमका प्लॅन काय आहे ? 

तर दहीहंडी साजरी होण्याआधीच एकनाथ शिंदेंनी सार्वजनिक सुट्टी, गोविंदांना खेळाडूंचा दर्जा, विमा संरक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण असे निर्णय घेतले. प्रो-गोविंदा स्पर्धेचीही घोषणा केली. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी ठीकठिकाणी हजेरीही लावली. साहजिकच यामागे आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर मात करण्याची योजना असल्याचं बोललं जातंय. 

ज्या उत्सवांनी सेनेला पाठबळ दिलं, शाखांमधल्या तरुणांच्या माध्यमातून कॅडर बेस वाढवण्यात मदत केली आता त्याच माध्यमातून भाजप आणि शिंदे गट आपली ताकद वाढवायला बघतोय.

 हजारो तरुणांशी येणारा संपर्क, उत्सवप्रिय मराठी घरांमध्ये लोकप्रियता वाढवण्याची संधी आणि याचा मतपेटीत दिसणारा सकारात्मक फायदा या सगळ्या गोष्टी शिंदे गट आणि भाजपनं अचूक हेरल्या. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठिकाणांवरच्या हंड्यांमध्ये मोदी, शहा आणि फडणवीस यांचे फोटो लागणं हीच गोष्ट बरीच बोलकी होती. 

दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे वगळता सेनेकडून कुठल्याच मोठ्या नेत्यानं या दहीहंडीच्या व्यासपीठाचा उत्स्फूर्तपणे वापर केला नाही आणि उत्सवांच्या जुन्याच ग्राऊंडवर नव्यानं बॅटिंग करण्याची शिवसेनेची संधी हुकली.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.