बंडखोरीच्या राड्यात सेनेच्या दोन बालेकिल्ल्यांना सुरूंग लागला, एक ठाणे आणि दुसरं मराठवाडा
एकनाथ शिंदे यांचं बंड नेमकं काय दिशा घेणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. बंडाची बातमी पहिल्यांदा बाहेर आली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत फक्त १०-१२ आमदार असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र नंतरच्या २४ तासात हा आकडा सातत्यानं बदलत गेला. अखेर सुरतहून आमदारांसोबत गुवाहाटीला जाताना शिंदे म्हणाले, “आमच्यासोबत ४० आमदार आहेत आणि आणखी १० आज येतील,” असा दावा केला.
त्यानंतर त्यांनी शिवसेनेनं काढलेलं आमदारांना आदेश देणारं पत्र बेकायदेशीर असून, शिवसेनेच्या मुख्य प्रतोद पदी भरत गोगावले यांची नियुक्ती करत असल्याचं ट्विट केलं. या सगळ्या राड्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या पाहता, ते शिवसेनेला प्रचंड डॅमेज करू शकतात असं बोललं जातंय.
एकनाथ शिंदेंचं बंड यशस्वी झालं, तर सेनेच्या दोन ताकदवान बालेकिल्ल्यांना सुरुंग लागणार आहेत. एक बालेकिल्ला आहे ठाणे आणि दुसरा म्हणजे मराठवाडा.
सगळ्यात आधी बोलूयात ठाण्याबद्दल…
ठाण्यात शिवसेना रुजली ती बाळासाहेबांच्या काळात. सेना स्थापन झाली १९६६ ला. सहा महिन्यांनी १ जानेवारी १९६७ ला ठाण्यात शिवसेनेची पहिली शाखा सुरु झाली आणि अवघ्या ८ महिन्यांमध्ये ठाण्यात सेनेनं सत्ता मिळवली.
शिवसैनिक वसंतराव मराठे हे ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष झाले, त्यानंतर शिवसेनेनं ठाण्यात जबरदस्त मुसंडी मारली. १९७४ मध्ये शिवसेनेचे सतीश प्रधान ठाण्याचे नगराध्यक्ष झाले, तर त्यानंतर ठाणे नगरपालिकेचं रूपांतर जेव्हा महानगरपालिकेत झालं. तेव्हाही महापौर सतीश प्रधान यांच्या रुपानं सेनेनं भगवा फडकवला.
पुढे आनंद दिघे ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख झाले आणि त्यांनी शिवसेना ठाण्यात आणखी खोलवर रुजवली. आनंद दिघेंच्या मृत्युनंतर त्यांचे पट्टशिष्य म्हणून ओळख असलेले एकनाथ शिंदे ठाण्यातलं मोठं प्रस्थ बनले. बाळासाहेबांनीही निवडणुकांवेळी ठाण्यात प्रचार करण्यावर विशेष लक्ष दिलं.
त्यामुळंच ठाण्यात शिवसेना प्रचंड मजबूत बनली.
सध्याच्या घडीला बघायचं झालं, तर ठाण्यात ६ महानगरपालिका आहेत. ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सेनेची सत्ता आहे. सोबतच कल्याण डोंबिवली मधून श्रीकांत शिंदे खासदार आहेत, तर कोपरी पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे आमदार आहेत. ठाण्यात सेनेचे एकूण पाच आमदार आहेत.
इतकंच नाही, तर पंचायत समित्या, ग्रामपंचायत अशा सत्ताकेंद्रांवरही एकनाथ शिंदे आणि पर्यायानं शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्यामुळं आता एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडली, तर पारंपारिक बालेकिल्ला असणारा ठाण्याचा गड राखण शिवसेनेला कठीण होणार आहे.
याआधी शिवसेनेत बंड झालं की, तेव्हा शिवसैनिक जसे शिवसेना भवनासमोर जमून आंदोलन करायचे अगदी तसंच ठाण्याच्या टेंभीनाक्यावरही व्हायचं. ठाण्यातून कोणत्याही बंडाचा प्रचंड आक्रमक विरोध व्हायचा. ठाण्यातलंच श्रीधर खोपकर प्रकरणही प्रचंड गाजलं होतं. यावेळी मात्र सेनेत मोठं बंड होऊनही टेंभीनाक्यावर शुकशुकाट आहे, कारण यावेळचं बंडच ठाण्यातून झालंय.
आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे म्हणजेच ठाण्यातली शिवसेना असं म्हणलं जात होतं, त्यांनीच बंड केल्यानं शिवसेनेच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागल्यात जमा आहे.
दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे मराठवाड्याचा…
शिवसेनेच्या आजवरच्या प्रवासातला टर्निंग पॉईंट समजला जातो तो म्हणजे, औरंगाबादमध्ये उघडलेली शिवसेनेची शाखा. १९८५ मध्ये गुलमंडी इथं शिवसेनेची शाखा स्थापन झाली. मुंबई आणि ठाण्याच्या बाहेर उघडण्यात आलेली ही शिवसेनेची पहिली शाखा होती असं बोललं जातं.
मराठवाड्यामध्ये शिवसेनेची पाळमुळं रोवण्यात या एका शाखेनं महत्त्वाची भूमिका बजावली. औरंगाबादमधल्या प्रवेशानं शिवसेना फक्त मराठवाड्यातच नाही, तर अनेक ठिकाणच्या खेड्यांमध्ये पोहचली.
शाखा सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन तीन वर्षांत शिवसेनेनं तब्बल २७ नगरसेवक निवडून आणत औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये सत्ता मिळवली. यानंतर औरंगाबादच्या माध्यमातून सेना मराठवाड्यात सत्तास्थानी पोहोचली. फक्त विधानसभेतच नाही, तर लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेनं मराठवाड्याचा गड राखला. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सेनेनं प्रत्येकी ३ खासदार निवडून आणण्यात यश मिळवलं.
सध्याचं गणित बघायचं झालं, तर मराठवाड्यातले ८ आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. ज्यात औरंगाबादमधल्या पाचही सेना आमदारांचा समावेश आहे.
मराठवाड्यात शिवसेनेला पुन्हा बूस्टर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मिशन मराठवाडाची घोषणा केली होती. त्यानुसार शिवसंपर्क अभियानाची बांधणीही करण्यात आली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात जातीनं लक्ष घालण्याचं ठरवलं होतं. नवे संपर्कप्रमुख नेमण्यात आले होते, शिवसंपर्क अभियानाला सुरुवातही झाली होती..
मात्र आता मराठवाड्यातले आमदार मोठ्या संख्येनं एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानं शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.
औरंगाबादचं पालकमंत्री पद आणि समृद्धी महामार्गाच्या कामादरम्यान औरंगाबाद आणि मराठवाड्याकडे दिलेलं विशेष लक्ष. आमदारांशी साधलेली जवळीक याचा एकनाथ शिंदेंना मराठवाड्यात आपलं वर्चस्व वाढवण्यात फायदा झाला होता.
मात्र आता त्यांनीच बंड केल्यानं शिवसेनेला मराठवाडा हा महत्त्वाचा बालेकिल्ला हातातून जाण्याची भीती सतावत असेल, अशी चर्चा आहे.
थोडक्यात एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ठाणे आणि मराठवाडा या दोन्ही भागात शिवसेनेला शिंदेंच्या बंडामुळं मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. त्यामुळं इथं मुसंडी मारण्यासाठी उद्धव ठाकरेंचा नवा ऍक्शन प्लॅन काय असणार ? शिंदेंना पर्याय म्हणून कोणत्या नेत्याला बळ देणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील.
हे ही वाच भिडू:
- त्या दिवशी पवारांनी फक्त एकाच्या नाही दोघांच्या स्वप्नांचा चक्काचुर केलेला…
- ३७ पेक्षा जास्त आमदार असतील तर शिवसेना ठाकरेंची न राहता एकनाथ शिंदेंची होणार का.?
- भाजपची सत्ता कशी येणार ; अशी असेल भाजपची रणनिती..