दोन राधेशाम एकत्र आले आणि भारताला ‘थंडा थंडा कूल कूल’ बनवणारा ब्रँड तयार झाला

उन्हाळा जवळ आला की, शाळेला लागणाऱ्या सुट्ट्या, बर्फाचे गोळे, आंब्याच्या पेट्या या गोष्टी आठवतात; तशी आणखी एक गोष्ट आठवते. ती म्हणजे टीव्हीवर लागणारी जाहिरात- दुनिया का सबसे छोटा एसी, थंडा थंडा कूल कूल. हि जाहिरात होती नवरत्न पावडरची.

आता भले ही फक्त साधी पावडर असली, तरी याच्या जाहिरातीत झळकणारे कार्यकर्ते कधीच साधे नव्हते. शाहरुख खान, सलमान खान, साऊथ इंडस्ट्रीमधला वस्ताद ज्युनिअर एनटीआर असे लय पैसे घेणारे सुपरस्टार या पावडरच्या जाहिरातीत कधी डान्स, तर कधी डायलॉगबाजी करताना दिसले.

या सुपरस्टार लोकांना कोटीत पैसे द्यायचे म्हणल्यावर, कंपनीकडंही तेवढे पैसे पाहिजेतच की. जगात लय कमी कंपन्या अशा असतात ज्या सुरुवातीलाच खुंखारमध्ये भांडवल घेऊन मार्केटमध्ये येतात. कुणाची सुरुवात गॅरेजमध्ये कंपनी उभी करण्यापासून होते, तर कुणाची आपल्या घरातून. कंपनी उभी करणं असेल किंवा ती चालवणं हजार संकटं येतात आणि त्यातून बाहेर पडायला लाख लडतरी कराव्या लागतात.

जे कार्यकर्ते या लडतरी करण्यात पुढं-मागं पाहत नाहीत ते टिकतात, बाकीच्यांचा पद्धतशीर बल्ल्या होतो…

हे सगळं पुराण तुम्हाला सांगत बसण्यामागचं कारण म्हणजे शाहरुख, सलमान, एनटीआरला खपाखप पैसे देणाऱ्या नवरत्न पावडरची कंपनी अस्सल भारतीय आहे. ती सुरू केलीये कोलकातामधल्या दोन मित्रांनी.

राधेशाम गोएंका आणि राधेशाम अगरवाल हे दोघे तसे बालपणीपासूनचे मित्र. वेगवेगळ्या कॉलेजला असले तरी या दोघांची मैत्री आणि कॉलेजबाहेरचा अभ्यास सुरूच होता. कॉलेज जवळच्या जुन्या पुस्तकांच्या दुकानात तासनतास घालवत ते कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स कसे बनवायचे याचा अभ्यास करायचे.

त्यांचं बिझनेस सुरू करण्याचं ध्येय तर पक्कं होतंच. त्यांनी सुरुवातीला टूथब्रश वैगेरे किरकोळ गोष्टी पॅकिंग करण्यापासून कामाला सुरुवात केली. त्यांनी ल्युडो बोर्ड्सही बनवले आणि हातगाडीवरून हा माल नेत तो स्वतः बाजारात विकला.

पोरांची मेहनत पाहून राधेशाम गोएंका यांच्या वडिलांनी याजोडीला २० हजार रुपयांचं भांडवल दिलं. या पैशातून त्यांनी केमको केमिकल्स नावाची कंपनी सुरू केली. मात्र त्यांना उधारीचा आणि लोकांनी गंडवल्याचा फटका बसला आणि त्यांचे पैसे डुबले. ते पुन्हा गोएंकाच्या वडिलांकडे गेले आणि त्यांना सांगितलं आम्हाला हे सगळं बंद करायचंय. त्यांनी मात्र या गोष्टीला विरोध केला आणि पुन्हा एक लाख रुपयांचं भांडवल देत पोरांना टिकून राहण्यात मदत केली.

जवळपास दहा वर्ष कमी प्रॉफिट घेत या दोघांनी बिझनेस सुरू ठेवला. पण त्यांनाही माहीत होतं, बडा नाम करने के लिए बडा डेरिंग करना पडेगा…

त्याकाळी अनेक ब्रॅण्ड्स पावडर किंवा इतर कॉस्मेटिक्स विकत होते. त्यामुळं मोठं होण्यासाठी काहीतरी वेगळं करणं अत्यंत आवश्यक होतं. त्यांनी मार्केटचा अभ्यास केला, मध्यमवर्गीय माणसांची गरज ओळखली आणि मार्केटमध्ये नवा ब्रँड आणला ‘Emami.’ याचाच उच्चार पुढे जाऊन ‘हिमानी’ असा होऊ लागला.

हा ब्रँड उभा करताना त्यांनी मार्केटमध्ये आणली टाल्कम पावडर. पण सगळ्यात वेगळी ट्रिक होती ते म्हणजे आकर्षक पॅकिंग, पावडरच्या डब्यावर दिसणाऱ्या मॉडेल्स आणि परदेशी वाटावं असं नाव. त्याकाळी सरकारनं उत्पादनांवर एमआरपी असलीच पाहिजे असा कोणताही कायदा केला नव्हता. त्यामुळं, या पावडर परदेशी आहेत असं वाटत असल्यानं खुल्या बाजारात त्याची चढ्या भावानं विक्री होऊ शकत होती. त्यामुळं व्यावसायिकांनी दणादण ऑर्डर्स दिल्या आणि इमामी ब्रँड घरोघरी पोहोचला.

या राधेशाम जोडीची घौडदौड अशीच सुरू राहिली आणि त्यांनी पाच हजारहुन अधिक कोटींचं साम्राज्य उभं केलं. आजच्या घडीला नवरत्न, बोरो प्लस, झंडू बाम, केश किंग, फेअर अँड हँडसम असे अनेक ब्रॅण्ड्स या कंपनीनं उभे केले.

जुन्या पुस्तकांमधून केलेला अभ्यास असेल, हातगाडीवरून विकलेला माल असेल किंवा धंदा डुबल्यावरही पुन्हा उभं राहण्याची इच्छाशक्ती, या जोडीनं प्रचंड मेहनत घेतली आणि कष्टाला पर्याय नाही हे आपल्या कृतीतून सिद्ध केलं.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.