स्पर्धा परीक्षा देणाऱ्या पोरांनी डॉक्युमेंट्स गहाण ठेऊन फुटलेला पेपर विकत घेतला.

भिडूंनो आठवतंय का ऑक्टोबर महिन्यात आरोग्य भरतीचा पेपर फुटला होता ते ..? हम्म्म्म…ज्यानं पेपर फोडला होता ना, त्याच्या म्हुस्क्या आवळण्यात आल्यात. 

त्यानं पेपर फोडण्याचा करेक्ट कार्यक्रम कसा केला होता. आणि त्याचा भुर्दंड माझ्यासारख्या (ओंक्या ) सर्वसामान्य एमपीएसीचा अभ्यास करणाऱ्या कार्यकर्त्याला कसा बसला त्याची ही स्टोरी…इत्यंभूतपणे

तर आरोग्य विभागाच्या  गट ‘ड’ साठी परीक्षेसाठी एकसष्ट हजार चारशे जणांनी फॉर्म भरला होता. परीक्षा केंद्रातून बाहेर आल्यानंतर ओंक्यानं घरी फोन लावला. मागच्या चार वर्षांपासून पुण्यात राहून अभ्यास करणारा ओंक्या  ‘ह्यावेळेला नक्की होतंय’ असं  घरी सांगत होता. पण फोन ठेवल्यावर मात्र जे ऐकलं त्यांन ओंक्याचं डोकं सुन्न पडलं. २ वाजता असणारा पेपर सकाळी १० वाजताच फुटला होता. ओंक्यासारख्याच अजून चार लाख जणांचं सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न भंगलं होतं.

कसा फुटला पेपर?

पेपर थेट आरोग्य विभागातूनच लीक झाला होता. महेश बोटले हे आरोग्य विभागातच कार्यरत होते. भरतीसाठी जो पेपर सेट करणारी जी समिती होती त्या समितीतही महेश बोटले होते. प्रश्नांनाबरोबरच उत्तरंपण लिहून समितीनं पेपर कॉप्युटरवरमध्ये सेव्ह करून ठेवला होता. 

महेश बोटलेंकडे या कॉप्युटरचा ऍक्सेस होता मग त्यांनी हा पेपर आपल्या कॉप्युटरमध्ये कॉपी करून घेतला. 

बास्स! आता पेपर  सिस्टिमच्या बाहेर आला होता. इथून पुढं मग पेपर पसरवण्याचं काम काय अवघड नव्हतं.

आता आरोग्य विभागातून पेपर पोहचला थेट लातूरला. लातूरच्या आरोग्य विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत बडगिरे यांनी आपला ड्राइवर थेट बोटलेकडे पाठवला. मेल, व्हाटसऍप वरपण पेपर पाठवता आला असता मात्र आरोपींना कुठलाही सुराग सोडायचा नव्हता. बडगिरेचा ड्राइवर मग पेनड्राईव्हमध्ये पेपर घेऊन लातूरला आला. बडगिरे आता पेपरच्या डिस्ट्रिब्युशनचं काम पाहणार होता.  बडगिरेला पुढील एजंट मिळाले क्लासवाले. स्पर्धा परीक्षेच्या पोरांना इतक्या दिवस सरकारी नोकरीचं  स्वप्न दाखवणाऱ्या क्लासवाल्यांना आता स्वप्न विकायचं होतं.  सहा ते सात लाख रुपयांना हे पेपर विकल्याचं समोर आलंय. 

पण पोलिसांना सापडू नये म्हणून या बेट्यांनी शक्कल लढवली ती म्हणजे, 

 पेपरची प्रिंट नाही घ्यायची नुसता पाठ करायचा.

पेपर पसरवण्यासाठी हा पॅटर्न वापरला गेला होता.  कोणतीही डिजिटल फूटप्रिंट ठेवायची नाही हे आरोपींनी पहिल्यापासूनच ठरवलं होतं. चाकणमध्ये ज्या क्लास चालकांना पकडलयं त्यांनीपण हाच पॅटर्न वापरला होता. परीक्षार्थींकडून अख्या पेपरचं  पाठ करून घेण्यात येत होता.

पण हि ट्रिक जास्त वेळ टिकणारी नव्हती.

पेपर घ्यायचा -पाठ करायचा- मग परत करायचा असा नियम होता. मात्र अनैतिक कामात कसला नियम आणि कसलं काय. बीड जिल्ह्यात एकानं पेपर लिहूणच घेतला. पैसे दिल्यात म्हटल्यावर पाठ तरी कशाला करायचं ! भाऊंनी मग पेपर टाकला व्हाटसऍपवर.

आता व्हाटसऍपवर एकादी गोष्ट आली म्हणजे ती किती पसरते हे तुम्हाला वेगळं सांगायला नको.

सहा ते सात लाख रुपयांमध्ये ५० हजार कमिशन घ्यायचं आणि बाकीचे वर पाठवायचे.

पेपर परीक्षार्थ्यांना सहा ते सात लाख रुपयांना विकला जात होता. विकणारा ५० हजार रुपये कमिशन घेऊन बाकीवर पाठवत असे. आता हे वर जाणारे पैसे थेट आरोग्य संचालयानातच पोहचल्याचे पुढे आलायं.

पेपरच्या विश्वासार्हतेवर जेव्हा प्रश्न उपस्थित केले गेले तेव्हा पेपर झाल्यावर पैसे द्या असं सांगण्यात आलं. मात्र तोपर्यंत एक गोष्ट परीक्षार्थ्यांना गहाण ठेवावी लागत असे ते म्हणजे त्याचे डॉक्युमेंट्स. 

परीक्षा पास झाल्यावर डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी डॉक्युमेंट लागतातच त्यामुळे त्याआधी विद्यार्थी आपले डॉक्युमेंट सोडवून घेणारचं असं आरोपींनी बरोबर ओळखलं होतं.

आता हे पद्धतशीरपणे चालणारं रॅकेट उघडं पडलंय. आरोग्य विभागाचे सह संचालक महेश बोटले यांच्याबरोबरच ११ जणांना अटक झालीयं.  आता आरोग्य महासंचलनायापर्यंत रॅकेटची लिंक गेल्याने विरोधक आता थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतायत. रॅकेट बाहेर आल्यापसुनाच परीक्षार्थी परीक्षा रद्द करण्याची मागणी करतायेत. त्यामुळं आता तरी राज्य सरकारला जाग येणार का हे  पाहायचं आहे.  

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.