गुजरात, हिमाचल प्रदेशचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत, पण हा एक्झिट पोल कसा काढतात ?

गुजरातच्या आणि दिल्ली एमसीडीसाठी मतदानाचा शेवटचा टप्पा आज पूर्ण झालाय. मतदानाची प्रक्रिया झाल्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता गुजरात, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली एमसीडी निवडणुकीचे  एक्झिट पोल्स घोषित केले जाणार आहेत.

वेगवगेळ्या माध्यमांनी आणि संस्थांनी हजारो लोकांचा सर्व्हे करून लोकांचा कल कोणत्या पार्टीकडे आहे याचे आकडे गोळा केलेत. या आकडेवारीनुसार गुजरात आणि हिमाचल प्रदेशामध्ये सत्ताधारी भाजपला सत्ता गमवावी लागेल की हीच सत्ता कायम राहील याचा कल कळणार आहे.

पण जेव्हा निवडणुकीनंतर एक्झिट येतात तेव्हा बहुतांश लोकांचं एकच म्हणणं असतं.

एक्झिट पोल खरे नसतात. ते चुकतात. एक्झिट पोल काढणारे कधीच आमच्यापर्यंत पोहचले नाहीत. मग हे सर्व्हे कुठून आणतात. 

सर्वसामान्य मतदार आणि कार्यकर्त्यांना पडणारा हा नेहमीचा प्रश्न. निवडणूका होतात आणि दरवेळी एक्झिट पोलमुळे निकालाच्या दिवसापर्यंत लोकांमधला उत्साह टिकून राहतो.

एक्झिट पोलचं इतकच काय ते महत्व. 

आपल्या बाजूचे असतील तर एक्झिट पोल खरे आणि नसतील तर खोटे अस सर्वसामान्य मत व्यक्त केल जात पण हे एक्झिट पोल कसे काढले जातात? ते शास्त्रीय असतात का? त्यासाठी कोणते गृहितक असतात याबद्दल सहसा चर्चा होत नाही. 

आत्ता बोलभिडूने पुढाकार घेतला आहे सगळं विस्कटून सांगायचा म्हणून या पोलच गणित आपणापुढे मांडण्याचा निर्णय आम्ही घेतला. 

तर इलेक्शन दरम्यान दोन पोल घेतले जातात. पहिला पोल म्हणजे ओपिनियन पोल आणि दूसरा एक्झिट पोल. 

ओपिनियन पोल म्हणजे काय? 

ओपिनियन पोल म्हणजे लोकांचा कल कुठल्या पक्षाकडे आहे याचा अंदाज घेणं. हा पोल शास्त्रीय नसतो. संख्याशास्त्र, कुठलेही नियम हा सर्व्हे करताना वापरले जात नाहीत. म्हणून या पोलवर टिका होते. त्यातही इलेक्शन पुर्वी ओपिनियन पोल होत असल्यामुळे असे पोल सत्ताधारी पक्षाच्या बाजूने असतात असा सर्वसामान्य समज असतो. हा पोल कसा काढतात तर पत्रकार लोकांना भेटतात त्यांना प्रश्न विचारतात आणि प्रश्नातून लोकांचा कल समजून घेतात. 

एक्झिट पोल म्हणजे काय? 

एक्झिट पोल निवडणुकीनंतर येतात. निवडणुकांचा शेवटचा टप्पा आला की हे पोल बाहेर पडतात. त्यात संख्याशास्त्र असतं. एक्झिट पोल काढण्याचे नियम असतात. त्यामुळे याच पोलबद्दल एक विश्वासार्ह वातावरण असत. अचूक जागांचे अंदाज दाखवता येत नसले तरी देशाचा एकंदरीत कल कोणत्या बाजूने आहे हे सांगण्यासाठी एक्झिट पोल महत्वाचे ठरतात. 

एक्झिट पोल काढतात कसे? 

एक्झिट पोल काढण्याचे स्वतंत्र नियम आहेत. राज्याच्या किंवा देशाच्या एकूण मतदारांमधून काही हजारो लोकांची मते घेवून असे पोल ठरवले जातात हे खरं असल्याने यावर टिका होते. साधारणपणे प्रत्येक मतदारसंघातून काही बुथ ठरवले जातात. या बुथमधून १० व्या १२ व्या १४ व्या अशा क्रमांकाने (दरवेळी असाच क्रम असेल अस नसतं रॅण्डमली हा क्रम ठरवला जातो. जस ५ व्या १० व्या किंवा १ ल्या ३ ऱ्या प्रमाणे) मतदारांना गाठण्यात येते.

या मतदारांना एक चिठ्ठी देण्यात येते व त्यांनी कोणाला मतदान केले त्या पक्षाच्या चिन्हासमोर खूण करुन ती बॉक्समध्ये टाकण्यास सांगण्यात येते. सध्याच्या काळात ही पद्धत मोबाईल व टॅबवर होते. टॅबवर ज्या पक्षाला मत दिले त्या पक्षाच्या समोर खूण करण्यास सांगितले जाते. 

एक्झिट पोल काढण्याच्या या प्रकारात मतदाराने कोणाला मतदान केले हे जाणून घेण्याचा अधिकार एक्झिट पोल घेणाऱ्याला देखील नसतो. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणावरून मतदान पार पडल्यानंतर अंदाज घेतला जातो पण कोट्यावधी मतदारांच्या यादीत ही संख्या अगदी नगण्य असते. पण ती व्यापक असण्यावर भर दिला जातो. संपुर्ण भारतभरातून सर्व्हे घेण्यावर भर दिला जातो.  

अशा प्रकारे आकडे गोळा करण्यात आल्यानंतर पुढची पद्धत असते ती मतांची टक्केवारी ठरवण्याची. कोणत्या पक्षाला किती टक्के मते आहेत यावरून एकूण जागांचा अंदाज संख्याशास्त्रज्ञ काढतात. हि पद्धत शास्त्रीय असते. व त्यासाठी ठराविक नियम ठरलेले असतात. 

एक्झिट पोल चुकतात का? 

एक्झिट पोल चुकतात याबद्दल सर्वाधिक वेळा २००४ चा संदर्भ दिला जातो. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार २००४ साली पुन्हा देशात वाजपेयी सरकार येणार होते मात्र प्रत्यक्ष निकाल लागला तेव्हा कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली.

या व्यतिरिक्त जागांच्या आकडेवारीमध्ये अनेकदा तफावत असलेली दिसून येते मात्र एक्झिट पोलमध्ये एखाद्या पक्षाकडे असणारा कल हा निकाल लागल्यानंतर सिद्ध झालेला दिसतो. प्रणब रॉय यांनी लिहलेल्या  the verdict decoding indias election या पुस्तकात एक्झिट पोलबाबत अभ्यास केला असून त्यांच्या मते आजपर्यंत ८४ टक्के वेळा एक्झिट पोलचे अंदाज बरोबर आले आहेत. 

एक्झिट पोलमध्ये सर्वात विश्वासार्ह कोण आहे? 

सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसायटी (CSDS), सी व्होटर आणि चाणक्य यांचे एक्झिट पोल आत्तापर्यंत सर्वात विश्वासार्ह समजले गेले आहेत.

दिल्ली मध्ये जेव्हा आप हा पक्ष पहिल्यांदा निवडणुक लढवत होता तेव्हा सर्व एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना कमी जागा दाखवण्यात आल्या होत्या पण चाणक्य द्वारे करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये आप पक्षाला सर्वाधिक जागा दाखवण्यात आल्या होत्या. चाणक्य मार्फत मात्र गेल्या काही वर्षात घेण्यात आलेले एक्झिट पोल खरे ठरले नाहीत. चाणक्य प्रमाणेच CSDC व सी व्होटर चे पोल विश्वासार्ह म्हणून गणले जातात. 

तरिही एक्झिट पोलबद्दल शंका घेण्यास जागा मिळते कारण इथे घेण्यात आलेले सर्व्हेक्षण हे काही हजार मतांवर अवलंबून असते. कधीकधी ते संपुर्ण मतदारसंघात देखील घेतले जात नाही. सर्व्हे घेण्यात आलेल्या लोकांची संख्या कधी ३००० हजार कधी पाच हजार देखील असते त्यामुळे बऱ्याचदा असे सर्व्हे चुकतात. 

त्यामुळे आता थोड्याच वेळात येणारे हे एक्झिट पोल्स भाजप, काँग्रेस आणि आप या तीन पक्षांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळत असल्याचे दाखवतात. ते किती खरे आहेत हे प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच कळेल. 

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.