मुंबईला बटर चिकनची ओळख करुन देणारा माणूस शिवसेनेमुळं मुंबईचा शेरीफ बनला

मुंबई. स्वप्नांचं शहर, मायानगरी. इथं गर्दी असते, लोकांना राहायला जागा मिळत नाही, मुंबई घड्याळाच्या काट्यावर चालते, अशा कित्येक गोष्टी असल्या… तरी मुंबईच्या हवेत एक वेगळीच जादू आहे. तुमची कष्ट करण्याची ताकद असेल, तर हे शहर तुम्हाला उपाशी झोपू देत नाही हे तितकंच खरं.

ही गोष्ट अशाच एका माणसाची आहे, जो भारत-पाकिस्तान फाळणीवेळी मुंबईत आला. त्याच्यामध्ये कष्ट करण्याची ताकद होती, त्यामुळं त्यानं कष्ट केले, लोकांच्या मनात आपलं स्थान बनवलं. हा माणूस पक्का मुंबईकर झाला आणि पुढं जाऊन मुंबईचा शेरीफही बनला. ही गोष्ट आहे, हॉटेल प्रीतमचे चालक आणि मुंबईचे माजी शेरीफ कुलवंतसिंग कोहली यांची.

आता शेरीफ म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे अगदी १८४६ पासून मुंबईला शेरीफ म्हणजेच नगरपाल नेमण्याची पद्धत होती. आधी या शेरीफकडे मुंबईकर आणि न्यायालय यांच्यातला दुवा साधण्याचं काम असायचं. मुंबई आणि कोलकाता या दोनच शहरांमध्ये ही परंपरा पाळी जात होती. शहराच्या महापौराखालोखाल शेरीफला महत्त्व असायचं.

शहरात येणारे विदेशी नागरिक किंवा अधिकारी यांना रिसिव्ह करणं, महत्त्वाच्या मिटिंग बोलावणं अशी कामं शेरीफ करायचे. मात्र त्यांच्याकडे काही विशेषाधिकार नव्हते, त्यामुळं त्यांचं पद नामधारीच होतं. या पदावर शहरातल्या प्रतिथयश माणसांची नेमणूक व्हायची. शेरीफचे मुंबईच्या म्युनिसिपल कमिशनर आणि मुख्यमंत्र्यांसोबत चांगले संबंध असायचे.

आता पुन्हा बोलूयात कुलवंतसिंग कोहली यांच्याबद्दल-

हॉटेल प्रीतममुळे कुलवंतसिंग यांचे बॉलिवूड अभिनेते, राजकीय नेते यांच्यासोबत चांगले संबंध होते. कुलवंतसिंग आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही चांगली ओळख होती. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली, तेव्हा शिखांविरुद्ध देशभरात दंगल उसळली. मात्र त्यावेळी मुंबई शांत ठेवण्यात बाळासाहेब, प्रमोद महाजन आणि कुलवंतसिंग यांनी दाखवलेल्या मुत्सद्देगिरीचा मोठा वाटा होता.

कुलवंतसिंग यांनी वेळोवेळी मुंबईच्या भल्यासाठी महत्त्वाची भूमिका घेतली आणि सोबतच सर्व धर्मीयांशी घनिष्ठ संबंधही ठेवले. त्यामुळंच बाळासाहेबांचा त्यांच्यावर विश्वास होता. त्यांच्या प्रीतम हॉटेलवर बॉम्ब हल्ला झाला, तेव्हा खुद्द बाळासाहेब तिथं पोहोचले होते.

पुढं राज्यात सेना भाजप युतीचं सरकार आलं. एका दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कुलवंतसिंग यांना फोन लावला आणि बाळासाहेबांचा फोन आला होता का? याबद्दल विचारलं. कुलवंतसिंग यांनी फोन न आल्याचं सांगितलं आणि मनोहर जोशी चटकन बोलून गेले, ‘‘तुम्हाला साहेबांचा फोन येईलच. पण मला राहवत नाही म्हणून सांगतो, आमच्या सरकारनं मुंबईचे शेरीफ म्हणून तुम्हाला नियुक्त करायचं ठरवलंय. मी फोन केला हे साहेबांना सांगू नका.”

जोशी म्हणाले होते त्याप्रमाणं कुलवंतसिंग यांना बाळासाहेबांचा फोन आलाच. बाळासाहेबांनी कुलवंत यांना तातडीनं मातोश्रीला या असं सांगितलं. बाळासाहेबांनी बोलावलंय म्हणल्यावर न जाण्याचा प्रश्नच नव्हता.

कुलवंतसिंग मातोश्रीवर गेले तेव्हा बाळासाहेब त्यांच्या नेहमीच्या रुममध्ये होते. ते त्यांना म्हणाले, ‘‘कुलवंत, तुला एक बातमी द्यायची आहे. काल रात्री आमची मिटिंग झाली. जोशी सरांनी मुंबईचे शेरीफ म्हणून अल्पसंख्याक समाजातली व्यक्ती हवी आहे, असं सांगितलं. मी तुझं नाव सुचवलं ज्याला सर्वांनी मान्यताही दिली. पण माझं ठरलं होतं की ही बातमी मी स्वत: तुला देणार. त्यामुळं कुलवंत मला सांग, तु मुंबईचा शेरीफ व्हायला तयार आहेस ना?’’

आता स्वतः बाळासाहेब असा प्रश्न विचारतायत म्हणल्यावर नाही म्हण्याचा प्रश्नच नव्हता. कुलवंतसिंग लगेच हो म्हणाले, त्यांनी बाळासाहेबांचा आशिर्वादही घेतला आणि त्यांच्यासमोर एक अडचण मांडली. ती अडचण फार मजेशीर होती.

ते बाळासाहेबांना म्हणाले, ”साहेब ही बातमी आनंदाची असली, तरी माझी बायको याच्यावर विश्वास ठेवणार नाही.” पण बाळासाहेबांनी स्वतःच ही अडचण सोडवली, त्यांनी कुलवंत यांच्या पत्नीला स्वतः फोन केला आणि ही आनंदाची बातमी दिली. अशाप्रकारे १९९८ मध्ये मुंबईतला हॉटेल व्यावसायिक मुंबईचा नगरपाल झाला.

बाळासाहेबांचा कुलवंतसिंग यांच्यावर असलेला विश्वास आणि त्यांनी अनेकदा मुंबईकरांसाठी, शीख बांधवांसाठी घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरली होती.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.