UPSC क्रॅक केलेल्या अमय खुरासियामुळं, रजत पाटीदार क्रिकेटर बनू शकला

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं आयपीएलची फायनल गाठण्याकडे आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या मॅचमध्ये ‘करो या मरो’ स्थिती होती. त्यात कॅप्टन फाफ डू प्लेसिस शून्यावर आऊट झाला. विराट कोहलीनंही २५ रन्सच केले, मोठं नाव असणारा ग्लेन मॅक्सवेल फक्त ९ रन्सवर गेला. तरीही आरसीबीचा स्कोअर २०० पार गेला,

त्याच्यामागं मेन कारण होतं तो म्हणजे रजत पाटीदार.

पाटीदारनं पहिल्याच ओव्हरमध्ये क्रीझवर येत, डोळ्यांचं पारणं फेडणारी बॅटिंग केली. त्यानं फक्त ५४ बॉल्समध्ये नॉटआऊट ११२ रन्स केले. त्याच्या शतकामुळं आरसीबी तरली. विराट कोहलीही मॅचनंतर पाटीदारचं कौतुक करताना थांबला नाही. या एका इनिंगमुळे पाटीदार पुढचे काही सिझन सहज आयपीएलमध्ये मोठी रक्कम घेत असतोय हे तर फिक्स.

खरंतर आपल्या या लेखाचा हिरो, रजत पाटीदार नाहीये, तर तो आहे… अमय खुरासिया.

आता खुरासिया का भारी आहे, हे जाणून घ्यायला पाटीदारचा एक किस्सा जाणून घ्यायला हवाच. पाटीदारला २०२१ च्या आयपीएलमध्ये आरसीबीनंच संधी दिली होती. पण चार मॅचेसमध्ये त्याला फक्त ७१ रन्सच करता आले.

२०२२ च्या ऑक्शनमध्ये मात्र पाटीदार अनसोल्ड गेला, मोठी अपेक्षा असतानाही रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं त्याच्यावर बोली लावली नाही.

ऑक्शन झाल्यावर पाटीदारचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात तो रंग खेळत होता आणि अंगावर आरसीबीचा टीशर्ट होता. लोकांनी त्यावरुन त्याची मापं काढली.

पुढं आयपीएलला सुरुवात झाली आणि आरसीबीचा लुवनिथ सिसोदिया इंज्युर्ड झाला. त्याला बदली खेळाडू म्हणून रजत पाटीदार आरसीबीमध्ये आला. खरंतर ही नशिबानं मिळालेली संधी होती. त्याच्या बॅटमधून रन्सही यायला लागले, पण तो चर्चेचं कारण ठरेल… अशी एकही इनिंग बसत नव्हती.

पण लखनौ सुपर जायन्ट्स विरुद्धच्या मॅचमध्ये संधी मिळाली आणि नॉटआऊट ११२ मारत त्यानं संधीचं सोनंही केलं.

आज पाटीदार सगळ्या बँगलोरसाठी आणि क्रिकेट आवडणाऱ्या प्रत्येकासाठी हिरो आहे, पण रजत पाटीदारचा हिरो आहे

अमय खुरासिया.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना खुरासिया आठवतो आणि बऱ्याच जणांना आठवत नाही. खरंतर भारताकडून फक्त १२ मॅचेस खेळलेला प्लेअर कुणाच्या फारसा लक्षात राहण्याचं तसं कारण नाही. पण खुरासिया होता एकदम विशेष.

मूळचा मध्य प्रदेशचा असलेला खुरासिया डोमेस्टिक क्रिकेटमध्येही त्यांच्याकडूनच खेळायचा, वयाच्या १७ व्या वर्षीच त्यानं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याच्या बॅटिंगमध्ये जादू होती, पण तरीही त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करायला १९९९ पर्यंत, म्हणजेच जवळपास ८ ते ९ वर्ष वाट पाहावी लागली.

या ८-९ वर्षांच्या काळात एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे खुरासियानं युपीएससीची परीक्षा क्रॅक केली आणि आयएएस अधिकारी झाला.

कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईज डिपार्टमेंटमध्ये त्याची नियुक्तीही झाली, पण त्यानं करिअर क्रिकेटमध्येच करायचं ठरवलं. युपीएससी झालेला पोरगा भारताकडून क्रिकेट खेळतोय म्हणल्यावर त्याची प्रचंड चर्चा झाली.

खुरासियाच्या बॅटिंगमध्येही दम होता, एकतर तो होता लेफ्टी, त्यात ताकद आणि टायमिंगचं कडक कॉम्बिनेशन असल्यानं, त्याची बॅटिंग बघायला भारी वाटायची. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं श्रीलंकेविरुद्ध, तेही पुण्यात. विशेष म्हणजे आपल्या इनिंगचा दुसराच बॉल त्यानं उचलला आणि चव्वा हाणला. त्या मॅचमध्ये भावानं कडकडीत फिफ्टी मारली. त्याच्यात अनेकांना भविष्य दिसायला लागलं होतं.

मात्र खुरासिया फॉर्मात असताना त्याला फारशी संधी मिळाली नाही, पुढं सचिनला दुखापत झाल्यावर चान्स मिळाला तेव्हा त्याला संधी गाजवता आली नाही. १९९९ च्या वर्ल्डकपमध्ये त्याची भारतीय संघातही निवड झाली, पण त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही.

२००१ मध्ये तो आपल्या करिअरमधली १२ वी आणि शेवटची वनडे खेळला. त्यानंतरही त्यानं मध्य प्रदेशकडून डोमेस्टिक क्रिकेट खेळणं २००६ पर्यंत सुरूच ठेवलं. १०० पेक्षा जास्त मॅचेस खेळत ७ हजारच्या घरात रन्स केले. पण जेव्हा त्याला संघातून बाहेर ठेवण्यात आलं, तेव्हा अनुभव आणि इगो बाजूला ठेऊन खुरासिया रिटायर झाला.

त्यानं नवी इनिंग सुरू केली, ती कोच म्हणून…

इथंच तो भेटला रजत पाटीदारला. त्याचाही विषय भारी आहे. पाटीदारला बनायचं होतं फास्ट बॉलर, पण तिथं डाळ शिजेना म्हणून तो ऑफ स्पिनर बनायला गेला, तिथं यश मिळायच्या आधीच त्याला दुखापत झाली. थोडक्यात आता करिअरवरच प्रश्नचिन्ह आलं होतं…

याचवेळी पाटीदारची भेट झाली कुरासियासोबत. त्यानं पाटीदारला आपल्या अकादमीमध्ये घडवलं आणि कधीकाळी ११ नंबरवर बॅटिंग करणाऱ्या पोराला, ‘तू स्पेशालिस्ट बॅट्समन बनू शकतो,’ हा विश्वास मिळवून दिला. पाटीदारनं मध्यप्रदेशकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच सिझनला रणजी ट्रॉफी स्पर्धेत तीन खणखणीत सेंच्युरीज लावल्या.

विजय हजारे आणि सईद मुश्ताक अली स्पर्धेतही खोऱ्यानं रन्स काढल्या. त्याच्या गुणवत्तेला खरा लाईमलाईट मिळवून दिला तो आयपीएलनं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून त्यानं महत्त्वाच्या तीन नंबरवर कडक बॅटिंग केलीये.

खुरासिया नसता तर? कदाचित ऑफ स्पिनर बनायचं का फास्ट बॉलर या नादात पाटीदारच्या करिअरला फुलस्टॉप बसला असता आणि घरच्यांच्या इच्छेनुसार तो बिझनेस सांभाळत असता.

खुरासियानं फक्त रजत पाटीदारलाच घडवलं असं नाही, २०२१ ची आयपीएल गाजवणारा व्यंकटेश अय्यरही त्याचाच सावलीत घडला, तर आपल्या स्पीड आणि अचूकतेमुळं थेट इंडिया कॉल-अप मिळवलेला अवेश खानही खुरासियाचाच विद्यार्थी आहे.

अवेशची जेव्हा भारतीय संघात निवड झाली, तेव्हा तो सगळ्यात आधी खुरासियाच्या घरी गेला, ‘आपल्या गुरूच्या पाया पडायला.’

आजच्या घडीला व्यंकटेश अय्यर भारताकडून खेळतोय, अवेश खानचीही भारतीय संघात निवड झालीये आणि रजत पाटीदारकडेही भविष्यातला तीन नंबर बॅट्समन म्हणून पाहिलं जाऊ शकतं… खुरासिया भले स्वतः १२ च वनडे मॅचेस खेळला असेल, पण त्यानं चेले असे घडवले जे भारताचं भविष्य ठरु शकतात. म्हणून खुरासियाला विसरुन चालत नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.