करीम लालानं बहीण मानलं अन् मग गंगूची गंगुबाई काठेवाली झाली
गंगू ‘ कामाठीपुऱ्यातील बदनाम गल्ल्यांत आजही तिचा फोटो लागतो. कामाठीपुऱ्याच्या लोक तिच्या पुतळ्याची पूजा करतात. एकेकाळी गंगुबाई ही कामाठीपुऱ्याची राणी म्ह्णून देखील ओळखली जायची. पण गुजराथमधील काठियावाडमधून फसवून आणून वेश्याव्यसायायात ढकललेल्या गेलेल्या गंगुबाईसाठी हा प्रवास सोपा नव्हता.
काठियावाड, रमणिक, भूतकाळाशी संबंधित सर्वच गोष्टींना तिने आपल्या मनातून कायमचं हद्दपार केलं.
धंद्यात लवकरच कामाठीपुऱ्यातील ‘खूप मागणी असलेली आणि खूप पैसे मिळवणारी ‘वेश्या’ म्हणून गंगू नावारूपाला आली. गंगू अतिशय सुंदर नसली, तरी पुरुषाला अंथरुणात खुश करायच्या तिच्या कौशल्याची चर्चा सर्वत्र होती.
गंगू २८ वर्षांची असताना असा एक प्रसंग घडला कि त्यानं गंगूला पार हादरवून सोडलं.
एक भला दांडगा पठाण कोठ्यावर धडकला.गंगूबद्दल इतर पुरुषांकडून बरंचकाही ऐकून असल्यामुळे त्याने गंगूची फर्माईश केली. त्याची ती आडदांड शरीरयष्टी पाहून कोठेवाली त्याला गंगूकडे पाठवणारच नव्हती पण त्याचा तो आविर्भाव पाहून त्याला विरोध करायची तिला हिमत होईना. पण शेवटी नाइलाजानेच तिने त्याला गंगूच्या खोलीत पाठवलं. गंगू आपलं कौशल्य पणाला लावून ह्या रानटी माणसाला हँडेल करेल असं तिला वाटत होतं. मात्र दुर्दैवाने तसं झालं नाही.
तो पठाण गंगूबरोबर जनावरासारखाच वागला. गंगूशी हिंस्रपणे वागून,तिचे हाल करून, एक पैसाही न देता तो निघून गेला
ह्या घटनेमुळे कोठ्यावरील सगळ्याच बायका घाबरल्या होत्या, पण कोणीही चकार शब्द काढायची हिंमत करत नव्हती. कामठीपुराच्या आजूबाजूच्या भागात पठाणांची खतरनाक टोळी होती. हा पठाण त्याच टोळीचा असेल असा विचार करून सगळे शांत बसले. त्या पठाणाने केलेल्या अनन्वित अत्याचारांमुळे गंगूची हालत अत्यंत वाईट झाली होती. चार दिवस ती तशीच विकलांगपणे पडून राहिली.
हा प्रकार आता इथंच थांबेल असं वाटत असताना एक महिन्याने तो पठाण पुन्हा कोठ्यावर आला.
त्याला पाहिल्याबरोबर कोठेवालीनं दोन माणसं बोलावली; पण त्या एकट्याने दोघांना चिलटासारखं बाजूला केलं. आपल्यावर माणसं घातली म्हणून तो अजून चिडला आणि तसाच गंगूच्या खोलीत घुसला. गंगूबरोबर गिन्हाईक होतं. पठाणाने त्याला तसंच, कपड्यांविनाच बाहेर फेकलं आणि दाराला कडी घातली. कोठ्याची मालकीण भेभान होऊन गंगूच्या खोलीचा दरवाजा बाहेरून ठोठावत होती. मात्र त्याचा काय फायदा नव्हता आणि त्यात कोठ्यावर पोलिसांना पण बोलावणं शक्य नव्हतं.
तो पठाण यावेळी गंगूची अवस्था मागच्यापेक्षाही अनेक पटीने वाईट करूनच तो बाहेर पडला.
गंगूच्या सर्वांगावर मारल्याचे , चावल्याचे वण आणि जखमा झाल्या होत्या.ह्या वेळच्या भयानक अत्याचारांनंतर गंगूला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं. कैक आठवडे गंगू अर्धमेल्यासारखी पडून होती.
मात्र एवढ्यानं खचून मागे हटणाऱ्यातली गंगू नव्हती. आपल्या गिऱ्हाईकाकरवी तिनं त्या पठणाचा शोध घ्यायला सुरवात केली.सरतेशेवटी तिच्या एका गि-हाइकाकडूनच तिला त्या पठाणाची माहिती समजली. त्याचं नाव शौकत खान असून, तो करीम लालाच्या टोळीतला आहे.
करीम लाला त्या वेळी छोटा-मोठा गँगस्टर होता. स्त्रियांना तो सन्मानपूर्वक वागवायचा.
तेव्हा करीम लाला ‘पख्तून जिरगाई हिंद’ नावाच्या एका पठाण संघटनेचा अध्यक्ष होता. करीम लालाच आपल्याला मदत करू शकेल, असं गंगूला वाटत होतं. त्याच्या कारनाम्यांमुळे तो बदनाम झाला असल्यानं आगीतून बाहेर पडून फुफाट्यात पडल्यागत होईल असं गंगूच्या मैत्रिणी तिला सांगत होत्या. मात्र गंगू आपल्या निर्णयावर ठाम होती.
“लाला, सलाम. मला तुमची मदत हवी आहे,” तडक दुसऱ्याच दिवशी गंगूनं लाला ला रस्त्यावर गाठलं होतं. तिच्या स्वरूपावरून ती धंदेवाली आहे, हे लालानं ओळखलं. “कसली मदत हवीय?” त्याने दरडावून विचारलं. “तुमच्या टोळीतल्या एका माणसाविषयी बोलायचंय.” गंगूचं बोलणं ऐकून लालानं तिला घरी येयला सांगितलं. घरी आल्यावर लालनं तिला चहापाण्याबद्दल विचारलं. त्यावर आपण तुझ्याकडं चहा पाण्यासाठी नाहीतर कामासाठी आल्याचं गंगूने ठणकावून सांगितलं.
“लाला तुझ्या माणसांमधील दोष तुला कधी दिसतात की नाही, कोणास ठाऊक! माझ्यासारख्या बाईशी कोणी वाईट वागलं, तर तु त्या व्यक्तीला शिक्ष करशील का? अन् केली तर मी जन्मभर तुमची रखेल बनून, तुमची सेवा करायला मी तयार आहे.” गंगू म्हणाली.
गंगूच्या या बोलण्यानं लालबुंद झालेला लाला रागावर काबू ठेवून म्हणाला, मला बायका-पोरं आहेत त्यामुळं ह्यानंतर कधीही अशी गोष्ट माझ्यासमोर करू नकोस. माझ् माणसांपैकी कोणी तुझी आगळीक केली असेल, तर त्याला शिक्षा द्यायला मी तयार आहे. कोणी तुला त्रास दिलाय? त्याचं नाव सांग.’
“शौकत खान. तो तुमच्याच टोळीत आहे, असं ऐकलंय.” गंगूने पटकन नाव सांगून टाकलं.
लालनं मग त्या पठाणाची चूक विचारली. गंगूबाईनं तिच्यावरील झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्यांनतर एक पठाण असला पाशवी अत्याचार करू शकते हे ऐकून लालची मान शरमेनं खाली गेली. ”तो पुन्हा आला तर मला कळवं मी स्वतः त्याच्याकडे बघतो. तू आता नीघ.”
हे ऐकून गंगू आनंदाने हसली. आपल्या पर्समधून एक छोटासा धागा काढून ती म्हणाली, “लाला गेल्या कैक वर्षांपासून मी कोणालाही राखी बांधली नाही. इथे आल्यापासून कोणाही पुरुषापासून कधी सुरक्षित वाटलंच नाही. आज माझं रक्षण करायचं वचन देऊन तुम्ही भावाच्या नात्याची लाज राखलीत.”
पुन्हा जेव्हा तो पठाण गंगूच्या कोठयावर आला तेव्हा लालानं त्याचा परफेक्ट कार्यक्रम केला. अख्या कामठीपुऱ्यासमोर त्यानं त्याला ढगात पाठवलं होतं.
जमलेल्या जमावाला गंगू माझी बहीण आहे एव्हडीच तंबी लालानं दिली. मात्र त्याचा इम्पॅक्ट बरोबर झाला होता.
त्या दिवसापासून गंगूचे दिवस पालटले. गंगूने पुढे जाऊन कोठयाची निवडणूक जिंकून तिथली ती मालकीण झाली. गंगूला आता लोक ‘गंगूबाई काठेवाली’ ह्या नावाने ओळखू लागले. तिच्या फार पूर्वीच्या परिवाराच्या ‘काठियावाडी’ ह्या नावाशी साधर्म्य असल्याने तिने ‘काठेवाली’ हे नाव घेतलं.