बिपरजॉय चक्रीवादळाचं बारसं बांगलादेशने केलंय. काय असतो चक्रीवादळांच्या नावाचा प्रोटोकॉल ?

नावं ठेवणं एक कला आहे. नाव ठेवण्यात गावचे म्हातारे मातब्बर असतात. त्याहून वरचढ क्रमांक लागतो तो शेजारच्या काकूंचा. शेजारच्या काकूंना शेजारच्या पोरांना नावं ठेवायची लय खुमखुमी असते.

आत्ता आपल्यासारख्या गरिबांचा विचार करायचा झाला तर एक पोरगं झालं तरी त्याचं नाव ठेवताना आपली फाटते.

आपण आत्या, मामा, काका, शहरात असणारी पाव्हण्या रावळ्यातली पोरं सगळ्यांना विचारतो. लेटेस्ट नाव सुचवण्यापासून अमुक अक्षरापासून नावाची सुरवात असावी अशा विविध मागण्या समोरच्या व्यक्तीकडे करतो.

आत्ता हे झालं लेखात पाणी ओतण्याचं काम. आपण आत्ता मुळ मुद्यावर येवूया. तर मुद्दा असाय की या चक्रीवादळांना नाव देण्याचं काम कोण महाभाग करत? 

१९५३ पासून अमेरिकेतल्या मायामी येथे असणाऱ्या नॅशनल हरिकेन सेंटर ॲण्ड वर्ल्ड मेटिरिओलाॅटिकल ॲार्गनायझेशन हे वादळ आणि उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची नावे देण्याचं काम करत आलेली होती. ही संघटना संयुक्त राष्ट्रांची एजेन्सी आहे.

आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे इंग्रज (आपल्यासाठी सगळे गोरे इंग्रजच असतात) भारतात येणाऱ्या चक्रीवादळांना नावं ठेवण्याच काम का करतात असतील?

आमच्या वादळांना आम्हीच नावं दिली पाहीजेत.

तर भावांनो, तुमचा मुद्दा व्हॅलिड आहे. आत्ता गंम्मत म्हणजे हिंदी महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांच प्रमाण कमी आहे. त्यात हे इंग्रज आपल्या वादळांना देखील कमी समजायचे. त्यामुळं पूर्वी तर ते अशा वादळांना नावं ठेवायचीच नाहीत.

म्हणून तर आत्ता आपण सांगतो, १८९१ साली असच चक्रीवादळ आलेलं. पण त्याचं नावचं ठेवायचं कष्ट कोणी घेतलं नव्हतं.

त्यामुळं काय झालं तर २००४ साली WMO अंतर्गत नाव ठेवण्याची ही प्रक्रिया मोडीत काढण्यात आली.

आणि ज्या देशात चक्रीवादळ येणार आहे त्या त्या देशांचे आपलं आपण बारश्याचं हे पुण्यकर्म करण्याची सूचना करण्यात आली.

त्यानंतर हिंदी महासागराशी संबंधित असणारे भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, म्यानमार, मालदीव, ओमान आणि थायलँड हे देश एकत्र आले.

या सर्व देशांनी मिळून ६४ नावांची एक यादी तयार केली. यातील नावे टप्याटप्याने येणाऱ्या चक्रीवादळांना ठेवण्यात येतील अस ठरवण्यात आलं.

शिवाय ही नाव दरवर्षी वाढवत जावून लिस्ट अपडेट करायचं काम देखील घेण्यात आलं. म्हणजे कसं तर अचानक ६५ वादळं आलीच तर घोळ नको.

आत्ता ही नावे ठरवताना काय प्रोटोकाॅल आहे का ते पाहूया.

कस असतय वादळांची नावे सोप्पय असावीत हा एक निकष असतोय. म्हणजे समजा भारतानं “झुंझारराव” नाव सुचवलं तर ते म्यानमारच्या माणसाला म्हणतां येणार आहे का? तर नाही. म्हणून सोप्पी, स्पष्ट उच्चार असणारी नावे सुचवली जातात.

आत्ता फानी हे बंगालच्या समुद्रातून आलेले चक्रीवादळ आठवत असेल. तर याला बांग्लादेशनं नाव दिलेलं. बांग्लामध्ये फानीचा उच्चार फोनी होतो आणि याचा अर्थ आहे साप.

आत्ता दूसरा मुद्दा असा असतोय की साप हा बांग्लादेशात वाईट असेल वो पण इकडं तो पूजली जात असेल तर राडा होवू शकतो. म्हणून इतर देशांच्या भावनांचा पण विचार नाव देताना करायला लागतो.

कधीकधी त्याचं देशात सुद्धा असा वाद-विवाद होवू शकतो.

जसं की श्रीलंकेने २००३ साली आलेल्या चक्रीवादळाच नाव महासेन ठेवलं होतं. आत्ता या नावाला विरोध श्रीलंकेतीलच एका गटाने केला. त्यांच्या मते राजा महासेन यांच्यामुळे श्रीलंकेत शांती आणि समृद्धी आली अशा राजाचं नाव चक्रीवादळाला ठेवणं चुकीचं आहे. त्यानंतर महासेन हे नाव बदलून वियारू हे नाव ठेवण्यात आलं.

तर कळलं का चक्रीवादळांची नाव ठेवणं किती अवघड आहे. आली आत्या आणि बाळांचं नाव कुर्रर्र केल म्हणजे झालं अस नसतय इथं.

याच प्रोटोकॉल प्रमाणे या वर्षीच्या चक्रीवादळाचं नाव ठेवायची संधी बांगलादेशला आली होती. आणि त्यांनी चक्रीवादळाचं नाव बिपरजॉय असं ठेवलं. हेच चक्रीवादळ सध्या महाराष्ट्रासह भारताच्या डोक्याला ताप ठरलंय.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.