मुंबईच्या दंगलीत स्वतः विरोधी पक्षनेता हिंसाचार थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरला…

६ डिसेंबर १९९२. भारताच्या इतिहासातला महत्त्वाचा दिवस. अयोध्येमध्ये वादग्रस्त बाबरी मस्जिद पाडली गेली आणि सगळ्या देशातलं वातावरण ढवळून निघालं. देशभरात उसळलेल्या दंगलीचा सगळ्यात मोठा फटका कुठल्या शहराला बसला असेल, तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईला. वेगवेगळ्या जाती धर्माची, भाषांची, संस्कृतीची माणसं एकत्र राहतात त्या मुंबई शहराच्या शांततेला या दंगलीमुळं तडा गेला.

डोंगरी आणि राधाबाई चाळ या भागांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळं वातावरण आणखी तापलं. हिंसाचार करण्यासाठी अंडरवर्ल्डला फंडिंग होत असल्याची चर्चा होऊ लागली, त्यातच या हिंसाचाराचं समर्थन करण्याचं धाडस दाखवलं ते एका राजकीय पक्षानं, तो म्हणजे शिवसेना.

शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामना या वृत्तपत्रातून जहाल लेख प्रसिद्ध होऊ लागले. हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मियांची लोकं या दंगलीत होरपळत होती. कित्येक लोकांनी मुंबई सोडायचा निर्णय घेतला. कित्येकांना आपल्या घरी पोहोचण्यासाठीही कसरत करावी लागली. अनेकांनी नातेवाईकांकडे, अनोळखी लोकांकडे आसरा घेत आपला जीव वाचवला. परिस्थिती हाताबाहेर चालली होती.

मुंबईतली निष्पाप जनता भीतीच्या सावटाखाली वावरत होती.

त्यावेळी राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. सुधाकरराव नाईक हे राज्याचे मुख्यमंत्री होते. तर विरोधी पक्षनेते होते गोपीनाथ मुंडे. दंगलीत अडकलेल्या लोकांची सुरक्षित जागी पोहोचण्यासाठी धावपळ आणि प्रयत्न सुरू होते. काही लोक अडकले होते, मुंबईच्या गोल देऊळ भागात.

गोल देऊळ हे मुंबईच्या मुस्लिमबहुल भागात आहे. तिथं काही हिंदू धर्मीय लोक अडकले होते. त्यातच अशी अफवा उठली की, बाबरीचा बदला म्हणून मुस्लिम लोक गोल देऊळ पाडणार आहेत. तिथं अडकलेल्या लोकांनी सुटकेचा मार्ग म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना फोन लावला.

गोल देऊळ परिसरातलं वातावरण इतकं तंग होतं की, सामान्य कार्यकर्तेच नाही, तर पोलिसांनाही इथं प्रवेश करणं अवघड झालं होतं. अडकलेल्या माणसांच्या सुटकेसाठी काहीतरी करणं गरजेचं होतं. अशावेळी बाळासाहेबांना एक गोष्ट आठवली. ती म्हणजे… इतक्या कठीण प्रसंगात गोल देऊळ प्रसंगात एकाच पद्धतीनं प्रवेश करता येऊ शकणार होता. ते म्हणजे लाल दिव्याची गाडी.

आता लाल दिव्याची गाडी सरकारमधल्या नेत्याकडे असणार.पण बाळासाहेब पडले विरोधी पक्षात. त्यांननी एक शक्कल लढवली, त्यांनी तत्काळ विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं, ‘तुम्ही गोल देऊळ भागात जा आणि तिथं अडकलेल्या माणसांना सुखरूपपणे सोडवा.’

मुंडे विरोधी पक्षनेते असले, तरी अशा कठीण प्रसंगात बाहेर पडणं आणि गोल देऊळ परिसरात जाणं जोखमीचं होतं. मात्र मुंडे यांनी जोखीम पत्करली आणि ते दंगलग्रस्त भागात गेले, तिथल्या लोकांना सुखरूपपणे सोडवलंही. 

भर दंगलीत लोकांच्या सुटकेसाठी राज्याचा विरोधी पक्षनेता रस्त्यावर उतरला होता.

पुढे मुंबईत कर्फ्यू लावण्यात आला, तेव्हा शिवसेनेनं गोल देवळात महाआरती करण्यासाठी कर्फ्यू शिथिल करण्यात यावा अशी मागणी केली होती. सरकारकडून ती मागणी मान्य झाली आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता ही महाआरती पार पडली.

आजही दंगलीच्या अनेक कटू आठवणी लोकांच्या स्मरणात आहेत आणि सोबतच गोपीनाथ मुंडे यांनी दाखवलेलं धाडसही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.