आज प्रत्येक चौकात वाजणाऱ्या ‘गोविंदा आला रे आला’ गाण्याचं शूटिंग गिरगावच्या चाळीत झालं होतं
आज जन्माष्टमीच्या निमित्तानं मुंबईमध्ये गोविंदांचा मोठा जल्लोष असतो. दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम मोठा उत्साहानं मुंबईमध्ये दिवसभर सुरू असतो. हजारो गोविंदा दहीहंडी फोडायला सज्ज असतात. थरावर थर लावले जातात आणि हा चित्त थरारक दहीहंडीचा खेळ जन्माष्टमीचा मोठा ‘इव्हेंट’ बनून जातो.
अलीकडच्या काळात राजकीय मंडळींनी यात लक्ष घातल्यामुळे या उत्सवाला राजकीय स्वरूप जरी आले असले, तरी या दहीहंडीची परंपरा फार जुनी आहे. आपल्या हिंदी सिनेमातही या दहीहंडीचा आणि त्यावरील गाण्याचा अनेकदा उल्लेख येतो.
मुंबई म्हटलं की गणपती आणि दहीहंडी या दोन गोष्टी स्वाभाविकपणे या शहराचे वैशिष्ट्य म्हणून सांगितल्या जातात.
दहीहंडीवर बॉलीवूडमध्ये अनेक गाणी आली असली तरी एका गाण्याची सर मात्र अजूनही कुठल्याच गाण्याला येत नाही, असे माझे प्रामाणिक मत आहे. हे गाणं होतं १९६३ साली आलेल्या ‘ब्लफ मास्टर’ या चित्रपटातील!
मनमोहन देसाई दिग्दर्शित या चित्रपटातील ‘गोविंदा आला रे आला…’ हे धमाल गाणे पडद्यावर शम्मी कपूरने सादर केले होते. शम्मी कपूर हा रिबेल स्टार होता. त्याच्या डान्सिंग स्टेपवर आख्खं पब्लिक जाम खूष असायचे!
‘गोविंदा आला रे आला…’ या गाण्याची जन्म कथा आणि त्याच्या चित्रीकरणाची कथा मुळातूनच खूप इंटरेस्टिंग आहे.
हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायलं होतं. मोहम्मद रफी आणि शम्मी कपूर हे कॉम्बिनेशन प्रचंड लोकप्रिय होतं. शम्मी कपूर नेहमी गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला स्टुडिओमध्ये जात असे. मोहम्मद रफी यांना आपल्याला या गाण्यातून कोणता भाव व्यक्त करायचा आहे आणि कसा व्यक्त करायचा आहे हे सांगत असे.
रफी आणि शम्मी कपूर यांचे ट्युनिंग इतकं जबरदस्त होतं की, या दोघांची एकत्रित गाणी आज देखील हिंदी सिनेमातील ‘कल्ट क्लासिक’ अशी गाणी बनली आहेत. ‘गोविंदा आला रे आला’ हे गाणं राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलं होतं तर त्याला संगीत कल्याणजी आनंदजी यांनी दिले होते. कल्याणजी आनंदजी हे मूळचे गिरगावकर! गिरगावातच ते राहत होते. त्यांच्या वडिलांचे तिथे किराणाचे दुकान होते.
गिरगाव हे एकेकाळी मुंबईतलं सांस्कृतिक केंद्र झाल होतं. मुंबईच्या साऱ्या घडामोडींचे प्रतिबिंब या गिरगावात पडत असे. ठाकूरद्वार इथे कल्याणजी आनंदजी यांच्या वडिलांचं दुकान होतं. ते स्वतः गिरगावातील मंगल वाडी येथील धुम्मा हाऊस येथे राहत होते. त्यांनी लहानपणापासूनच गिरगावातील दहीहंडी पाहिली होती. त्यांच्या दारातच मोठी दहीहंडी होत असे.
या सिनेमाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई हे देखील गिरगावकरच.
ते व्ही. पी. रोडच्या खेतवाडी येथे राहत होते. त्यांनी देखील लहानपणापासून दहीहंडीचा उत्सव डोळ्यात साठवला होता. या सर्वांच्या लहानपणापासूनच्या आठवणीचे संदर्भ त्यांना या सिनेमाच्या वेळी आठवत होते.
या गाण्याचे रेकॉर्डिंग मोठ्या जल्लोषात स्टुडिओत पार पडले. यासाठी कल्याणजी आनंदजी यांनी मराठीतील पारंपारिक चाल वापरली. राजेंद्र कृष्ण यांनी देखील ‘गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला…’ ह्या मराठी ओळी वापरल्या.
या गाण्यात शम्मी कपूर धमाल नाचला आहे. त्याच्या सोबत मोहन चोटी , टूनटून हे कलाकार दिसतात. बाकी सर्व गिरगावकर आहेत.
आता या गाण्याच्या चित्रीकरणाची जेव्हा वेळ आली, त्यावेळी शम्मी कपूर आणि इतरांनी ठरवले की या गाण्याचे चित्रीकरण स्टुडिओत न करता थेट गिरगावातच करूयात!
त्या पद्धतीने हे गाणं मंगलवाडी गिरगाव येथे चित्रीत करण्यात आलं. यासाठी मंगलवाडी, फणसवाडी, मुगभाट लेन येथे जय्यत तयारी करण्यात आली. गिरगावातील पोरं जाम खुशीत होती. या गाण्यात शम्मी कपूर सोबत नाचणारी जी मुले आहेत ती सर्व गिरगावातली मुले आहेत. तब्बल पाच दिवस या गाण्याचे चित्रीकरण गिरगावात चालले.
या गाण्याच्या वेळी जी दहीहंडी बांधली होती ती तोटे चाळ इथे अशोक स्टोअर्सवर बांधली होती. त्यावेळी गिरगावात राहत असलेले जेष्ठ चित्रपट अभ्यासक अरुण पुराणिक यांनी या गाण्याच्या आठवणी सांगितल्या आहेत.
ते सांगतात, “त्या वेळी मी शाळकरी विद्यार्थी होतो. या शूटिंगच्या काळात गिरगावातली पोरं शाळेत गेलीच नाहीत. सर्वजण धमाल उत्सवात सामील झाली. हे गाणं साधारणत: मार्च महिन्यामध्ये चित्रीत झाले होते. चाळीतील वरच्या मजल्यावरून रहिवासी चित्रीकरणाच्या वेळी पाणी टाकत होते. सर्वत्र धमाल उत्साह होता. शम्मी कपूर त्याचा सारा स्टारडम विसरून गिरगावातील पोरांसोबत बेफाम नाचला होता. त्यामुळे या गाण्याला एक लाईव्हनेस आला आहे. बॉलीवूडमधील दहीहंडीच्या गाण्याचा ज्या वेळेला उल्लेख होतो त्या वेळेला आपण या गाण्याला टाळून पुढे जाऊच शकत नाही.”
यानंतर आपण ज्यावेळेला बॉलीवूडमधील दहीहंडी गाण्याचा शोध घेऊ लागतो त्यावेळेला सत्तरच्या दशकातील शत्रुघन सिन्हा यांच्यावर चित्रीत ‘बदला’ या चित्रपटातील ‘शोर मच गया शोर देखो आया माखन चोर’ हे गाणं आपल्याला लगेच आठवतं.
यानंतर आपण जेव्हा ऐंशीच्या दशकामध्ये येतो, त्यावेळेला अमिताभ बच्चन परवीन बाबी यांच्यावर चित्रित ‘खुद्दार’ या चित्रपटातील ‘मच गया शोर सारी बस्ती मे, आया बिरज का बाका संभाल तेरी डगरी रे…’ हे गाणं आठवतं. अमिताभनेही या गाण्यात धमाल डान्स केला होता.
अलीकडच्या काळात बरीच दहीहंडीची गाणी आपल्याला पाहायला मिळतात. तीन बत्ती वाला गोविंदा आला (मुकाबला), हर तराफ है ये शोर (वास्तव), गो गो गोविंदा (ओह माय गॉड), आला रे आला गोविंदा (काला बाजार), धाक्कुमाकुम धाक्कुमाकुम (हमाल दे धमाल), चांदी की डाल पर सोने का मोर (हॅलो ब्रदर) अशी अनेक गाणी..
पण गिरगावात चित्रित झालेल्या ‘गोविंदा आला रे आला’ ची मजा काही औरच आहे!
- भिडू धनंजय कुलकर्णी
हे ही वाच भिडू:
- दादांच्या भितीने राज कपूरने आपल्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलली होती..
- चिखलकाल्याची झिंग पाहीजे असेल, तर गोव्याची गाडी पकडा !
- ‘बंडखोरीच्या’ संस्थानाचा अनभिषिक्त सम्राट होता तो म्हणजे “शम्मी कपूर”