आणि गॅरेजमध्ये काम करणाऱ्या गुलजारांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला…

आज १८ ऑगस्ट! ख्यातनाम कवी, गीतकार, पटकथा, संवाद लेखक, दिग्दर्शक, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, ऑस्कर विजेते गुलजार यांचा वाढदिवस. १८ ऑगस्ट १९३४ रोजी आज पाकिस्तानात असलेल्या दिना येथे त्यांचा जन्म झाला. आपल्या अप्रतिम रचनात भावरम्य शब्दांच्या छटांमधून सुरीली गाणी देणारे गीतकार म्हणजे गुलजार!

गुलजार यांना आजवर दादासाहेब फाळके अवार्ड, पद्मभूषण सहित २२ वेळा फिल्मफेअर, ५ वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांच्या उर्दू साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कार लाभला आहे. 

गुलजार हे त्यांचे चित्रपटातील नाव, त्यांचे खरे नाव संपूर्णसिंग कालरा. इतर कलावंताप्रमाणेच त्यांनाही सुरुवातीला खूप स्ट्रगल करावा लागला. पण आज कित्येकांच्या ओठांवर असलेल्या गाण्यांमुळे अजरामर झालेल्या गुलजार यांना सिनेमासाठी पहिले गीत कसे मिळाले? त्याचा एक भन्नाट किस्सा आहे.

बिमल रॉय यांच्या ‘बंदीनी’ या सिनेमाकरीता त्यांनी पहिल्यांदा गीतलेखन केलं. त्यांच्या रूपेरी प्रवेशाची ही भावस्पर्शी आठवण. 

या सिनेमाच्या वेळी काही तरी क्षुल्लक कारणावरून गीतकार शैलेंद्र व संगीतकार सचिनदा यांच्यात मतभेद झाले होते. त्या दोघांमधील संवाद थांबला होता. आता बिमलदांची अडचण झाली होती; त्यांना ज्या सिच्युएशन करीता गाणं हव होतं ते काही मिळत नव्हतं. 

त्या काळी गुलजार मुंबईत स्ट्रगलर होते. एका गॅरेजमध्ये काम करीत असले तरी त्यांचं पहिलं प्रेम साहित्यावरच होतं. शैलेंद्रसोबत त्यांची मैत्री होती कारण ते दोघे बॉम्बे यूथ कॉयरचे सदस्य होते, ज्याची प्रमुख किशोर कुमारची प्रथम पत्नी रूमा देवी होती. शैलेंद्रने गुलजार यांना बिमलदा यांना भेटायला पाठवले.

गुलजार बिमलदाकडे गेले त्या वेळी ते त्यांचे सहायक देबू सेन सोबत बसले होते. जुजबी विचारपूस झाल्यावर बिमलदांनी देबूला बंगालीत विचारले ‘भद्रलोक वैष्णव कविता जानी?’ देबूने मग हसत हसत सांगितले ‘दादा गुलजार को बंगाली समझती है’ आता मात्र बिमलदा ओशाळल्यागत झाले.

मग त्यांनी गाण्याची सिच्युवेशन सांगितली व सचिनदाकडे पाठवले. गुलजार व सचिनदाची हि पहिलीच भेट. त्या वेळी तिथे पंचमदेखील होता. दादांची ट्यून तयार होतीच त्यावर शब्द लिहायचे होते. गुलजारांना शब्द लिहायला काहीच वेळ लागला नाही. गाणं तयार झालं. आता ते बिमलदांना ऐकवायचं होतं.

सचिनदांनी गुलजार यांना विचारले ‘आप गा सकते हो?, बिमलदा को सुनाना है.’ गुलजार उत्तरले, ‘नही, गाना मेरे बस की बात नही.’
त्यावर सचिनदा म्हणाले ‘उडीबाबा तुम कैसा भी गाके सुनायेगा, हमारा अच्छा ट्यून रिजेक्ट हो जायेगा!’

 गुलजार यांना थोडसं वाईट वाटलं, पण कलावंताचं आपल्या निर्मितीवर किती प्रेम असतं हे त्यांना ठावूक होतं. 

सचिनदा यांनी स्वत: बिमल रॉय यांना ही चाल ऐकवली. आणखी एक अडचण होती. बिमलदा म्हणाले ‘वो शरीफ घराने की लडकी घर के बाहर जाकर कैसा गायेगी और नाचेगी ?’ सचिनदांना ते गाणं आउट डोअरच शूट व्हावं असं वाटत होतं, कारण त्यांनी गाण्याच्या इंटरल्यूड मध्ये निसर्गातील आवाज वापरले होते.

त्यावर बरीच चर्चा झाली तेंव्हा बिमलदांचे सहाय्यक देबू सेन यांनी तोडगा सांगितला ते म्हणाले “दादा वो लडकी घर में अपने पिताजी का साथ रहती है. कौनसी जवान लडकी पिता के सामने नाचते हुये गायेगी?”

ही मात्रा मग लागू पडली. बिमलदा म्हणाले ‘अब तो लडकी घर के बाहर ही गायेगी.’ बिमलदांना गाणं आवडलं. विशेषत: त्या तील स्त्री सुलभ लज्जा, तिची भावनिक आंदोलने त्यांना आवडली आणि गुलजारचं  सिनेमातील पहिलं गाणं रसिकांपुढे आलं ‘मोरा गोरा अंग लई ले मोहे शाम रंग दै दे…’ एका गाण्यावर किती बारकाईने व सर्व बाजूने चर्चा होत असते पहा.

उगाच नाही पन्नास पन्नास आणि साठ साठ वर्ष गाणी रसिकाच्या मनात घर करतात!

अशा प्रकारे गुलजार यांचा सिनेमाच्या दुनियेत प्रवेश झाला त्याचं पाहिलंच गाणं सुपर हिट ठरलं! लताच्या स्वरातील गुलजार यांचं हे गीत…

 

  • भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.