क्रिकेटचा बॅड बॉय ते आयपीएल विनिंग कॅप्टन, हार्दिक पंड्या म्हणू शकतोय ‘आज मै जीत के आया’

आयपीएलची फायनल थाटामाटात पार पडली. राजस्थान रॉयल्सनं अपेक्षा वाढवल्या होत्या खऱ्या, पण मॅच तशी वन साईडेडच झाली. शुभमन गिलनं छकडा मारत गुजरात टायटन्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि ग्राऊंडवर असलेलं लाखभर पब्लिक आनंदानं उसळलं. 

प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये गुजरातच्या कॅप्टनला ट्रॉफी घेण्यासाठी बोलावलं आणि आपल्या चेहऱ्यावर नेहमीचं हसू ठेऊन हार्दिक पंड्यानं ट्रॉफी उंचावली. हार्दिकच्या आयुष्यातल्या सगळ्यात भारी क्षणांपैकी हा एक क्षण, आयपीएल जिंकण्याचा.

ही झाली फायनलची गोष्ट, फ्लॅशबॅकमध्ये आपण जाऊयात ‘कॉफी विथ करण’ या शो ला. आपण मित्रांच्या कट्ट्यांवर ज्या मोकळेपणानं गप्पा हाणतो, त्याच्या डबल मनमोकळ्या गप्पा हार्दिकनं या कट्ट्यावर हाणल्या. 

त्याचे अफेअर्स, वागणं यामुळं लय गलका झाला आणि हार्दिकची मापं निघाली. बरं इतकी निघाली की लोकांनी त्याच्याकडे क्रिकेटर म्हणून पाहणंच सोडून दिलं.

मग बॅन लागला, लग्न झालं, टिम इंडियात कमबॅकही झालं, सगळं तसं एका लाईनवर आलं होतं. पण तेवढ्यात त्याला झाली इंज्युरी. क्रिकेटर्सला दुखापती नव्या नाहीत, पण हार्दिकच्या इंज्युरीमुळं त्याची बॉलिंग थांबणार होती. आता टीम इंडिया बॅट्समन्सचं वाटप करु शकते, इतका स्टॉक आपल्याकडे आधीच आहे, त्यामुळे हार्दिकला फक्त बॅट्समन म्हणून संघात स्थान मिळणं कठीण होतं.

तरीही वर्ल्डकप टीममध्ये त्याची निवड झालेली, तिथं त्यानं बॉलिंगही टाकली पण विकेट काय मिळाली नाही. त्याचं करिअर लय लवकर संपत असतंय असं वाटू लागलं.

आता दुसरा फ्लॅशबॅक, जरासा जवळचा. आयपीएलचं रिटेन्शन.

मेगा ऑक्शनच्या आधी मुंबई इंडियन्स हार्दिकला आपल्याकडे ठेवेल असा अनेकांचा अंदाज होता. मात्र त्यांनी हार्दिकला रिलीझ केलं. ऑक्शनमध्ये अनसोल्ड जाण्याची भीती नसली, तरीही हार्दिकसाठी तो मोठा धक्का होताच. गुजरात टायटन्स या नव्या टीमनं हार्दिकला आपल्या टीममध्ये घेतलं आणि जबाबदारी दिली कॅप्टन्सीची.

इथं सुरू होतो, दुसरा अंक.

हार्दिकनं याआधी कधीच सिनिअर लेव्हलला कुठल्या टीमचा कॅप्टन म्हणून काम पाहिलं नव्हतं. आधीच त्याच्या फॉर्मबद्दल, बॉलिंग करु शकणार की नाही याबद्दल बरेच डाऊट्स होते. तिथं त्याला एका नव्या टीमला लीड करायचं होतं, अशा पोरांचा ग्रुप जो याआधी कधीच एकत्र खेळलेला नाही, अशी टीम ज्याच्यात फारसे अनुभवी किंवा सुपर सिनिअर म्हणावेत असे प्लेअर्स नाहीयेत.

पण मग हार्दिकनं हे कसं जमवलं..?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, स्वतःमध्ये केलेले बदल. हार्दिकच्या बॉलिंग टाकण्यावर शंका असताना त्यानं १४० पेक्षा जास्त स्पीडनं बॉलिंग केली. विकेट्स काढल्या आणि रन्सही रोखले. बॉलिंगचा विषय निघाला आहेच, तर थेट फायनलला येऊ. गुजरातच्या बॉलिंगचे दोन हुकमी एक्के होते, राशिद खान आणि मोहम्मद शमी.

पण फायनलला हार्दिक आऊट ऑफ सिलॅबस आला. राजस्थानची खरी ताकद आहे बॉलिंगमध्ये, त्यामुळं बॅटिंगबाबत त्यांची टीम बटलर, सॅमसन आणि हेटमायर या तिघांवरच जास्त अवलंबून होती.

हार्दिकनं त्यांची हीच कमकुवत बाजू उघडी पाडली. त्यानं आधी सॅमसनला आऊट केलं, मग एकहाती मॅच फिरवू शकणाऱ्या बटलरला आणि आपल्या स्पेलच्या शेवटच्या बॉलवर हेटमायरला. राजस्थानची बॅटिंग इथंच कोसळली होती.

बरं हे सगळं करताना हार्दिकनं रन्स किती दिले, तर फक्त १७. फायनलचं प्रेशर, टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन समोर आणि

तरीही हार्दिक ‘करके आया.’

या आयपीएलमध्ये त्यानं जास्त विकेट्स काढल्या नसतील, पण फार रन्सही दिले नाहीत. समोरच्या टीमवर कायम प्रेशर तयार केलं. तो आपला चार ओव्हर्सचा कोटा पूर्ण करत असल्यानं गुजरात एक जास्तीचा बॅट्समन घेऊन मैदानात उतरू शकलं.

बॅटिंगबाबत बोलायचं झालं, तर तोडफोड मित्रमंडळातला हार्दिक काय यंदा दिसला नाही. म्हणजे त्यानं छकडे हाणले, पण फार रिस्क न घेता. एकतर तो बॅटिंगला यायचा चौथ्या नंबरला, त्यामुळं त्याच्याकडे सेट व्हायला वेळ असायचा.

एक बाजू लाऊन धरत, बॉलर्सला चुका करायला भाग पाडायचा मग एकदा बॉल पट्ट्यात घालवला की व्हिंटेज पंड्याचं दर्शन व्हायचं. आपण चौथ्या नम्बरलाही बॅटिंग करू शकतो, हा मेसेज त्यानं इंडिया सिलेक्टर्सपर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचवलाय.

हार्दिकची कॅप्टन्सीही कुठंच गंडली नाही.

त्यानं प्लेअर्सवर विश्वास दाखवला. यंगस्टर असला किंवा अनुभवी प्लेअर, प्लेअर्सला कायम बॅक केलं. याचंच फळ गुजरातला मिळालं डेव्हिड मिलरच्या रुपानं, राहुल तेवातीयाच्या रुपानं. सगळंच सरळसोट झालं असं पण नाही, एकदा दोनदा हार्दिकचा पारा चढलाही होता, पण त्यानं वेळीच सावरुन घेतलं.

 यंगस्टर्सचा भरणा असलेली, फारसा अनुभव नसलेली टीम त्यानं आयपीएलच्या ट्रॉफीपर्यंत नेली आणि ट्रॉफी प्लेअर्सकडे देऊन स्वतः कोपऱ्यात थांबला…

आपल्या गुरुची म्हणजेच धोनीची परंपरा जपत.

हार्दिकच्या या प्रवासात आणखी एक माणूस महत्त्वाचा होता, तो म्हणजे गुजरातचा हेडकोच आशिष नेहरा.

जिथं निम्मी जनता लॅपटॉप, एनर्जी ड्रिंक असलं मटेरियल घेऊन कोचिंग करते, तिथं नेहराजी हातात शहाळं आणि कागद घेऊन निवांत असायचे. या जोडीनं फारसे प्रयोग केले नाहीत आणि प्लेअर्सवर लोड दिला नाही.

मॅच जिंकल्यावर लेक्चर द्यायच्या ऐवजी नेहराचं भाषण होतं, ‘कुछ नही, नहालो, अच्छे से खाओ और सो जाओ.’ असा कोच आणि हार्दिकसारखा निवांत कॅप्टन असला की कुठली टीम जिंकणार नाही..?

हार्दिक गुजरातचाच, टीमही गुजरातचीच आणि मॅचही झाली गुजरातलाच. कॉफीवालं कांड झाल्यावर याच गुजराती लोकांनी हार्दिकला खच्चून शिव्या दिल्या असतील, याच गुजरातमध्ये कधीकाळी फक्त मॅगी खाऊन हार्दिक मॅचेस खेळलाय, इथल्याच मातीत घाम गाळून त्यानं नाव कमवायचं स्वप्न बघितलं होतं आणि आज त्याच मातीत ते पूर्ण झालंय.

हार्दिक आयपीएल विनिंग कॅप्टन बनलाय, नशीब, प्लेअर्सची साथ आणि मेहनतीच्या जोरावर… आता तो ताठ मानेनं म्हणू शकतोय…

“आज मै जितके आया.”

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.