कपिल देवच्या १७५ आणि हरमनप्रीतच्या १७१ रन्सनं काय केलं, तर ‘भारताचं क्रिकेट बदललं’

स्कोअरबोर्ड वरचे आकडे होते, ४ आऊट ९ रन्स. भारत हरला आणि आता वर्ल्डकपच्या बाहेर गेला, असं जवळपास सगळ्यांनीच गृहीत धरलं होतं. पण एक माणूस मैदानात उतरला आणि त्यानं फक्त स्कोअरबोर्ड नाही, तर भारतीय क्रिकेटची दुनियाच बदलून टाकली. त्याच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक रन भारताचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न आणखी अधोरेखित करत होता. सोबतच, भारतीय माणसं काय करु शकतात… हे जगाला दाखवूनही देत होता. तो माणूस म्हणजे पंजाब दा पुत्तर, हरियाणा हरिकेन कपिल देव. तुमचा, माझा आणि आपला लाडका कपिल पाजी!

कपिलच्या नॉटआऊट १७५ रन्सवाल्या इनिंगनं एक गोष्ट केली, लोकांना क्रिकेट बघण्याचं येड लावलं. कारण त्याच्या इनिंगमुळं मैदानावर चमत्कार घडला होता, असं चमत्कार जो फक्त पिक्चरमध्ये पाहायला मिळायचा. कपिलनं आपल्याला मॅच बघायला बसवलं… ते कायमचंच.

आपण भारतीय लोकं पोरांची टीम आर्यलँडशी खेळणार असेल, तरीही टीव्हीसमोर बसतो. पण पोरींच्या टीमबाबत मात्र अशी परिस्थिती नव्हती. पोरी काय खेळणार? मोठे शॉट्स मारणार का? रडतखडत पन्नास शंभर रन्स करतील. असं लय भिडू बोलायचे, भारताचं वुमन्स क्रिकेट घौडदौड तर करत होतं, मात्र त्याला ती ‘मॅजिक मोमेन्ट’ मिळत नव्हती… जी लोकांना मॅच बघायला भाग पाडेल.

मग दिवस आला, २० जुलै २०१७. मुलींच्या वर्ल्डकपमधली सेमीफायनल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. पावसामुळे मॅच फक्त प्रत्येकी ४२ ओव्हर्सची होणार होती. भारताला फायनलमध्ये जाण्याची संधी होती आणि बोर्डावर आकडे होते, २ आऊट ३५ रन्स. भारताला गरज होती एका हिरोची, अशी हिरो जी मैदानावर नुसती उभी नाही राहणार, तर रन्सचा पाऊस पाडेल. एका बाजूला कॅप्टन मिताली राज होती, पण तिच्या बॅटवर बॉल तितका भारी बसत नव्हता.

दुसऱ्या बाजूला आली हरमनप्रीत कौर, भारताची वाईस कॅप्टन. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी बॉलर्सचा हरमननं त्यादिवशी किस पाडला. हरमननं वयाच्या १९ व्या वर्षीच भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं. तिचा खेळ बघणारा प्रत्येक क्रिकेट शौकीन म्हणायचा, ”ही सेम सेहवागसारखी खेळते राव.” संधी मिळाली की बॉलरवर तुटून पडायचं. बॉल बघायचा आणि मारायचा, आपली बॅटिंग पहिली असो किंवा दुसरी… आपण फक्त झोडायचं. हा हरमनचा मंत्र त्या मॅचमध्ये अगदी परफेक्ट कामी आला.

मिताली आऊट झाली, पण हिच्या बॅटमधून रन्सचा ओघ काही थांबेना. पोरीनं पहिले ६० बॉल्स निवांत खेळले, मग एक सिक्स आणि एक फोर मारुन थाटात फिफ्टी पूर्ण केली आणि गिअर बदलला. प्रत्येक ओव्हरला निदान एकतरी फोर तिच्या बॅटमधून यायचीच. फिफ्टी पूर्ण झाल्यानंतर तिनं पुढच्या ३० बॉल्समध्ये आपलं शतक पूर्ण केलं. इंग्लिश भूमीवर एक भारतीय महिला, क्रीझवर नांगर ठोकून उभी होती आणि रन्सचा पाऊस ग्राउंडच्या सगळ्या दिशांना पडत होता.

शतकाचा माईलस्टोन गाठल्यानंतर हरमन अक्षरश: सुटली. ॲशले गार्डनरनं मॅचमधली, ३७ वी ओव्हर टाकली. हरमन दुसऱ्या बॉलला स्ट्राईकवर आली, आल्या आल्या सलग दोन सिक्स, गार्डनरच्या चेहऱ्यावर निराशा. पुढचे दोन्ही बॉल्स कडकडीत बाऊंड्रीज आणि शेवटच्या बॉलवर २ रन्स. एकाच ओव्हरमध्ये २३ रन्स. एलिसी विलानीनं पण फटके खाल्ले, जेव्हा ४० ओव्हर्स संपल्या तेव्हा भारताचा स्कोअर होता ४ आऊट २४९. यातले १५१ रन्स एकट्या हरमनच्या बॅटमधून आले होते.

शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये तिनं २ सिक्स आणि १ फोर मारली आणि भारताचा स्कोअर झाला, २८१. जिथं टीमनं १५० केले तरी लई झालं असं वाटत होतं, तिथं भारतानं २८१ रन्स बोर्डावर लावले. वर ऑस्ट्रेलियाला २४५ रन्सवर रोखत मॅचही मारली. सरळसाधं गणित होतं, हरमनमुळं भारत जिंकला.

ज्या प्रकारची इनिंग कपिल पाजी झिम्बाब्वे विरुद्ध खेळले, अगदी तसंच हरमनही खेळली. लोकांना महिला क्रिकेटचं येड लावण्याचं काम तिनं अगदी परफेक्ट केलं. पण आपणच कमी पडलो. स्मृती मानधना म्हणलं की, ‘नॅशनल क्रश’ एवढंच म्हणून आपण तिला लिमिटेड करतो. हरमनला लेडी सेहवाग आणि मितालीला लेडी तेंडुलकर… इतक्यावरच आपलं क्रिकेट प्रेम आटतं.

जशी विराट कोहलीची कव्हर ड्राईव्ह आपण डोळ्यांत प्राण आणून बघतो, अगदी तितकाच वाढीव असणारा हरमनचा स्वीप बघत नाय. आता शफाली वर्मा, पहिल्या बॉलपासून सिक्स-फोर मारायला सुरुवात करते, ते बघून आपल्याला आश्चर्य वाटतं… कारण हरमनच्या १७१ बद्दल आपण फारसं बोललेलो नसतो. महिलांचं क्रिकेटही सुपरफास्ट होऊ शकतं, तिथंही एखादी पोरगी इनिंगमध्ये २० फोर आणि ७ सिक्स हाणू शकते, ऑस्ट्रेलियन बॉलर्सला घाम फोडू शकते आणि हातातली सगळी कामं सोडून आपल्याला टीव्हीसमोर बसायला लाऊ शकते… ही मॅजिक मोमेंट हरमनमुळं बघायला मिळाली.

भारताच्या मेन्स टीमच्या शांतीत क्रांती बॅटिंगला जहाल रुप कपिल पाजींमुळं मिळालं आणि कितीही अवघड परिस्थिती असली तरी ‘आपण जिंकू’ हे भारताच्या वुमन्स टीमला हरमनच्या नॉटआऊट १७१ रन्सनं दाखवून दिलं. आपल्याला आयुष्यात कधी कपिल होऊन तर कधी हरमन होऊन लढायला जमलं पाहिजे इतकंच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.