हिट वेव्हने खरा घाम फुटलाय तो महाराष्ट्रातल्या पोल्ट्री व्यावसायिकांना

भोंगा, अयोध्या दौरा, नवनीत राणा प्रकरण, आरक्षण हे राजकीय मुद्दे जरा बाजूला ठेवूया आणि आपल्या साध्या माणसांच्या जीवनावर परिणाम करणारे मुद्दे जरा बघूया…

यात पेप्ट्रोल, डिझेल, सिएनजी, एलपीजी गॅस, खाद्यतेल अशा गोष्टींमध्ये झालेली भाववाढ सगळ्यात पहिले दिसून येईल. म्हणजेच काय तर महागाई. पैशांचा मुद्दा आला आहे तर आता येत्या काळात कर्जाचा व्याजदर वाढू शकतो, हा मुद्दा देखील डोक्यात येतोच. या सगळ्या गोष्टींकडे बघता घाम फुटतो आणि तो पुसता पुसता सहज एक मुद्दा लक्षात येतो ‘वाढत्या उष्णतेचा’.

या सगळ्या गोष्टी काय कमी होत्या का, की हे ऊन पण इतकं चटकाय लागलंय! असं आपण बोलून जातो.

या वाढत्या उन्हाचा शहरातील सर्वसामान्य लोकांना असा थेट काही फटका बसत नाहीये, मात्र याचवेळी दुसऱ्या एका सर्वसामान्य घटकाला याचा खूप मार बसतोय. तो म्हणजे…

पोल्ट्री शेतकरी आणि व्यावसायिक!

का?

कारण वाढत्या उन्हामुळे कोंबड्यांच्या संख्येत घट होतीये. 

अनेक शेतकरी हे शेतीला जोडव्यवसाय म्हणून कोणतातरी व्यवसाय करतात. त्यात पोल्ट्री व्यवसायाचं प्रमाण जास्त दिसतं. मात्र त्याच्यावर यंदा संकट कोसळलं आहे. कोंबड्यांच्या सभोवतालचं तापमान ३८ ते ४० अंश से.पर्यंत पोहोचल्याने त्यांना वाढलेल्या तापमानाचा त्रास जाणवू लागला आहे. परिणामी मांसल आणि अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या उत्पादनात घट होतीये.

गेल्या २ वर्षांत कोरोनामुळे जी परिस्थिती उद्भवली होती, त्यात सगळ्यात जास्त परिणाम झालेल्या व्यवसायामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय म्हणजेच पोल्ट्री उद्योगाचा समावेश होता. खूप नुकसान झालं होतं. तशा परिस्थितीनंतर आता कुठे हा व्यवसाय स्थिर स्थावर होऊ लागला होता. मात्र त्यात एंट्री झाली ‘हिटव्हेवची’.

यंदा काही नाही म्हणून वाढत्या उन्हाचा परिणाम पोल्ट्रीफार्मवर होऊ लागला आहे. अहमदनगरच्या एका वृत्तानुसार, उन्हाचा पारा असा काय वाढला आहे की, दिवसाकाठी ४० ते ५० कोंबड्याचा मृत्यू होतोय. गेल्यावर्षी हेच प्रमाण १५ ते २० कोंबड्या होतं.

 तसं तर दरवर्षी उन्हाळ्यात ही समस्या उद्भवतेच. पण यंदा याचे प्रमाण दुपटीने वाढलं आहे. 

म्हणूनच नक्की कोणत्या परिस्थितीला पोल्ट्री शेतकरी आणि व्यावसायिक सामोरं जातायेत, ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासाठी काही संबंधित व्यक्तिमत्वांशी आम्ही संपर्क साधला. 

 निफाडचे शेतकरी दीपक निचित हे द्राक्ष बागायतदार आहेत आणि त्यांचा घरगुती कोंबड्यांचा व्यवसाय आहे. जवळपास २५ गावरान कोंबड्या त्यांच्याकडे आहेत. सगळ्या लेयर आहे म्हणजे अंडी देणाऱ्या आहेत. कमी संख्येत हा जोडव्यवसाय करत असूनही त्यांना तो परवडेनासा झाला आहे. 

त्यांनी सांगितलं की…

“उन्हाचा कोंबड्यांवर परिणाम म्हणजे एकतर त्या अंडेच देत नाहीये. दिले तरी खूप कमी प्रमाणात. दुसरं म्हणजे त्यांची मर होत आहे. त्यांना टेम्परेचेर सहन होत नाहीये, त्या कुपोषित होत आहेत. परिणामी हिट सहन न झाल्याने मरण पावत आहेत.

मी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना अँटिबायोटिक दिलं आहे. याने मारण्याचं प्रमाण तरी कमी आहे मात्र अंड्यांवर परिणाम झाला आहे. कोंबड्यांच्या राहायच्या ठिकाणी पाण्याचे स्प्रे दिले आहेत मात्र त्याचा काहीच फायदा होत नाहीये. यावर्षी माझा काहीच नफा झालेला नाहीये.  

“हिटने ७ कोंबड्या मेल्या असून गेल्या २ महिन्यांत माझं ७-८ हजारांचं नुकसान झालं आहे.”

यानंतर रवींद्र मेटकर यांच्याशी संपर्क साधला. अमरावतीला त्यांचं लेयर पोल्ट्री फार्म आहे. शिवाय  मेटकर १९८४ पासून जेव्हा ते १६ वर्षाचे होते तेव्हापासून या व्यवसायात आहेत. १०० कोंबड्यांपासून सुरुवात केल्यानंतर आज त्यांच्याकडील कोंबड्यांची संख्या दीड लाखाच्या वर गेली आहे.  

त्यांच्या माहितीनुसार…

“उन्हाळ्यात कोंबड्यांची फीड खाण्याची क्षमता कमी होते. यामुळे ब्रॉयलर कोंबड्यांचं वजन वाढत नाही. तर अंडी देणाऱ्या कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता कमी होते. पूर्ण फीड न खाल्याने त्यांना प्रोटिन्स मिळत नाही आणि मग त्यांच्यात डिफिशिअन्सी येतात. 

विदर्भात सध्या ४२- ४५ डिग्री तापमान झालं आहे. अशात ज्यांच्याकडे पाणी देण्याची, शेड थंड करण्याची सुविधा नाहीये, जसं की, त्यांच्याकडे मर जास्त होतीये. मी फॉगर लावेल आहे, ज्यूटच्या बारदाण्यांवर पाणी मारणं सुरु आहे, ज्यामुळे मर कमी आहे मात्र अंडी देण्याचं प्रमाण जे आधी ९०% होतं ते आता ७० टक्क्यांवर आलं आहे. १०० पैकी ७० कोंबड्याचं अंडी देतात तेही कमी प्रमाणात. 

ज्या कोंबड्या १२० ग्राम दिवसाला फीड खायच्या त्या ८० ग्रामच खात आहेत. म्हणून प्रोडक्शनवर परिणाम झाला आहे. 

त्यात यावर्षी रॉ पदार्थांचे भाव वाढले आहेत. 

दिवाळीनंतर मका १६ रुपये किलो मिळत होता तो आता २४ वर गेला आहे. तर डीओसी सोयाबीन ढेप ४० रुपये किलोपर्यंत मिळत होती ती आता ७० रुपयांवर गेली आहे. त्यावर ५% GST असल्याने. म्हणजे २५ टनांची गाडी जर घेतली तर त्यावर ७५ हजार GST द्यावा लागतोय. 

अंड्यांचा रेट जानेवारीपासून प्रति नग ३ रुपये झाला आहे तर त्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे साडेचार रुपये प्रति नग. तर ब्रॉयलर कोंबड्यांचे रेट आहेत प्रोडक्शन कॉस्ट १०० रुपये किलो आहे. त्याचे देखील कधीतरी ९० तर कधी ११० रुपये असे रेट आहेत. अशाप्रकारे रॉ मटेरियलचे रेट वाढल्याने देखील पोल्ट्री व्यवसाय लॉसमध्ये आहे.” 

 या अनुभवानंतर आम्ही नाशिकच्या अवनीश ऍग्रोचे दिपक पाटील यांच्याशी बोललो. त्यांची नाशिकमध्ये स्वतःची पोल्ट्री आहे. त्यांच्या माहितीनुसार…

“कोंबड्यांना हिट सहन होत नाही आणि त्या जास्त खात नाहीत. शिवाय त्या ज्याठिकाणी राहतात तिथे सारखी हिट जनरेट करत असतात. त्यामुळे त्यांची स्वतःची हिट आणि बाहेरील हिटने परिणाम होऊन त्यांचा मृत्यू होतो आहे. आताशी तर पिरियड सुरु झाला आहे. मे मध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होत असतो.

मात्र यावर्षी एप्रिललाच सुरुवात झाली. मे महिन्यात होणारा लॉस एप्रिलमध्येच सुरु झाला आहे. म्हणून कोंबड्यांचं मारण्याचं प्रमाण वाढलं आहे. लेयरला त्यात खूप इशू होत आहेत. त्यात रॉ मटेरियल कॉस्ट तर नॉर्मल पेक्षा जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे नुकसान बाजूला राहिलं शेतकऱ्यांना जास्त टेन्शन त्याचंच येतंय.

“कोंबड्यांचं मरण आणि त्यात वाढलेले फिडींग मटेरियल दर असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने गंभीर स्थिती झाली आहे.”

मग यातून शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे?

हा प्रश्न उपस्थित होतो. ज्याबद्दल वरील व्यक्तिमत्वांनी सांगितलं…

यातून शासनाने काही तरी दिलासा देणं गरजेचं आहे. पोल्ट्री उद्योगातील शेतकरी, व्यावसायिक वेळोवेळी शासनातील अधिकाऱ्यांना अर्ज देत असतात. काही योजना, अनुदान मिळालं तर हा वाढलेला खर्च जो त्यांना स्वतःच्या खिशातून द्यावा लागतोय, त्यातून दिलासा मिळण्याची अपेक्षा असते. 

कारण एक तर रॉ मटेरियलचे भाव वाढवले गेले आहेत, म्हणून तिकडे पैसे जातोय त्यात अशा हिटव्हेवच्या समस्यांनी खूप तडजोड करून उभारलेल्या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या जगत नाहीत. त्यांना जगवण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात, जसं की, फॅन लावणं, बारदाना लावणं, फिडींग टाइम मॉडिफाइड करणं, औषधी बघणं ज्याने हिटचा त्रास कमी होईल, हे सर्व बघावं लागतं.

हे खूप खर्चिक असतं. म्हणून शासनाकडून काही मदत मिळवण्याचा प्रयत्न होतो, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आलं आहे. 

तेव्हा शासनाने या सर्व ग्राउंड समस्यांकडे लक्ष देऊन पोल्ट्री व्यावसायिकांना साथ देण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, शासकीय गोदाम जे आहेत त्यातील असे धान्य जे मानवाला खाण्यालायक राहत नाही. जसं की, तांदूळ, मका, गहू हे शासनाने कुक्कुटपालन करणाऱ्यांना अनुदानावर द्यावं, अशी साधी मागणी आहे. 

नाहीतर असाच खर्च आणि नुकसान वाढत गेलं तर शेतकऱ्यांचं अशा व्यवसायांकडे वाळण्याचं प्रमाण कमी होईल. 

असा सर्व प्रकार आहे.

एकीकडे उन्हामुळे फळबागांवर परिणाम झाला आहे. अखेरच्या टप्प्यात असलेले सोयाबीन कोमेजून गेले आहे. त्यामुळे आता जोड व्यवसायाकडे शेतकरी वाळल्यानंतर त्यावरही प्रतिकूल परिणाम होऊ लागल्याने व्यवसायिक अडचणीत आले आहेत. 

यातून काही तरी मदत शासन पुरवेल हीच त्यांची माफक अपेक्षा आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.