फूड डिलिव्हरी, ९ ते ५ नोकरी करणारी पोरं एकत्र येऊन काय बनतं, तर भारताला भिडणारी हाँगकाँगची टीम

समजा तुम्ही स्विगी, झोमॅटो असल्या ॲपवरुन काहीतरी ऑर्डर केलंय, त्यांचा डिलिव्हरी पार्टनर तुमची ऑर्डर घेऊन दारापाशी आलाय. दार उघडल्यावर समजलं की, हा कार्यकर्ता आपल्या देशाकडून क्रिकेट खेळतो. भिडू आपण इमॅजिनही करु शकत नाही. कारण आपल्याकडे क्रिकेटर लोकं म्हणजे सेलिब्रेटी असतात. एखादा आयपीएल सिझन खेळला तरी इथं प्लेअर करोडपती होतोय, आयपीएलही लांब नुसतं डोमेस्टिक क्रिकेट खेळत राहिलं तरी एखाद-दोन पिढ्यांची सोय तर लागूच शकते. आपल्या भारतात क्रिकेटमध्ये पैसाच तेवढा आहे.

मात्र वर सांगितलेली गोष्ट हाँगकाँगमध्ये घडू शकते. तिथं देशाकडून क्रिकेट खेळणारा प्लेअर तुम्हाला फूड डिलिव्हरी बॉय, एखाद्या ऑफिसात काम करणारा पोरग किंवा अगदी ज्वेलर्सच्या दुकानातही दिसू शकतो.

कारण हाँगकाँगच्या या खेळाडूंसाठी क्रिकेट ही आवड असली, तरी पोट भरण्यासाठी मात्र त्यांना अशा नोकऱ्या करणं भाग आहे.

हाँगकाँगच्या क्रिकेटर्सची स्टोरी सांगण्याचं कारण म्हणजे, बुधवारी एशिया कपमध्ये भारत विरुद्ध हाँगकाँग मॅच झाली. भारतानं मॅच मारली खरी, पण हाँगकाँगनंही टफ फाईट दिली. जेवढी भारत पाकिस्तान मॅचची चर्चा झाली त्याच्या एक टक्काही चर्चा हाँगकाँग विरुद्धच्या मॅचची झाली नाही. सूर्यकुमार यादवनं केलेली फटकेबाजी, केएल राहुलची स्लो बॅटिंग, हाँगकाँगच्या टीमनं विराट कोहलीला गिफ्ट दिलेली जर्सी याची चर्चा झाली, पण दुर्लक्षित राहिलेली गोष्ट म्हणजे हाँगकाँगच्या टीमचा इथवरच प्रवास.

क्षेत्रफळाच्या दृष्टीनं आपल्या दिल्लीपेक्षाही छोटा असलेला हाँगकाँग देश, राजकीय अस्थिरता, गरिबी अशा अनेक गोष्टींचा सामना करत वाटचाल करतोय.

पण या सगळ्यात तिकडच्या लोकांना जगासमोर आपली ताकद दाखवण्याची संधी मिळते ती क्रिकेटमधून.

हाँगकाँगमध्ये पार १८४१ पासून क्रिकेट खेळलं जातं, त्यांनी पहिली अधिकृत क्रिकेट मॅच पार १८६६ मध्ये शांघाय विरुद्ध खेळली होती. मात्र तिथं क्रिकेट झटकन लोकप्रिय झालं नाही, आयसीसीचा असोसिएट मेंबर दर्जा मिळवण्यासाठी त्यांना १९६९ पर्यंत वाट पाहावी लागली. वेगवेगळ्या पात्रता फेरी खेळून हाँगकाँगनं २०१४ च्या टी२० वर्ल्डकप पर्यंत झेप घेतली आणि बांगलादेशला त्यांच्याच मैदानावर हरवत सगळ्या जगाला आपली दाखल घ्यायला भाग पाडलं.

फक्त यंदाच्याच नाही, तर हाँगकाँगच्या टीमनं २०१८ च्या एशिया कपमध्येही स्थान मिळवलं होतं. तेव्हा भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी जवळपास विजय खेचून आणलाच असता. भारतानं २८५ रन्स केले तेव्हा अनेकांना भारताच्या विजयाची खात्री वाटत होती. मात्र निझाकत खान आणि अंशुमन रथ या जोडीनं ३४ ओव्हर्समध्ये १७४ रन्सची सलामी दिली होती. भारताच्या तगड्या बॉलिंगला यांच्या विकेट्स काढण्यासाठी झगडावं लागत होतं. या दोघांच्या विकेट्स पडल्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये कुणाला मोठी खेळी करता आली नाही, नाहीतर हाँगकाँगनं भारताला हरवत क्रिकेट जगतालाच मोठा हादरा दिला असता.

मात्र चार वर्षांपूर्वीची त्यांची ही टीम आता पूर्णपणे विखुरलेली आहे, भारताविरुद्ध खतरनाक बॅटिंग करणारा अंशुमन रथ आता भारतातल्याच नागालँडच्या टीमकडून खेळतो. मार्क चॅपमननं न्यूझीलंडमध्ये नाव कमावलंय, तर ख्रिस्तोफर कार्टर आता पायलट म्हणून काम करतोय.

पण भट्टी जमून आलेली टीम विखुरणं ही हाँगकाँगसाठी काही नवीन गोष्ट नाही, कारण त्यांच्याकडे क्रिकेटमधून मिळणार पैसा इतका कमी आहे की, खेळाडूंना आपलं आर्थिक चक्र सुरळीत ठेवण्यासाठी क्रिकेट सोडून इतर कामंही करावीच लागतात.

सध्याच्या टीमबद्दल सांगायचं झालं, तर भारताचा कॅप्टन रोहित शर्माची विकेट घेणारा आयुष शुक्ला अजूनही शिकतोय, वाईस कॅप्टन किंचित शहा ज्वेलरीच्या दुकानात काम करतो तर इतर बरेच खेळाडू फूड डिलिव्हरीचं किंवा प्रायव्हेट कोचिंगचं काम करतात. क्रिकेटमधनं जे काही पैसे मिळतात ते अर्थातच पुरेसे नसतात, त्यामुळं त्यांना इतर कामं करावी लागतात, पण तरीही या खेळाडूंची हाँगकाँग क्रिकेट असोसिएशन विषयी काहीच तक्रार नसते.

क्रिकेटमध्ये आपले शंभर टक्के देऊनही हे प्लेअर्स आपल्यासारख्याच पगार मिळतील अशा नोकऱ्या करतात, कारण त्यांना आवड तर जपायची असतेच पण सोबतच कुटुंबाची जबाबदारीही पेलवायची असते. हाँगकाँगच्या टीममधले बरेच खेळाडू मूळ भारतीय किंवा पाकिस्तानी वंशाचे आहेत, बरेच स्थालंतरीतही आहेत, त्यातल्या अनेक जणांना आपला खर्च भागवून घरीही पैसे पाठवायचे असतात. त्यासाठीच या पगारी नोकऱ्या त्यांना आधार ठरतात.

आजच्या घडीला भले हाँगकाँग भारतासमोर पराभव स्वीकारावा लागला असेल, गुणवत्तेच्या बाबतीत त्यांना अजूनही मोठी मजल मारायची असेल, पण खेळासाठी, देशाच्या टीमसाठी सर्वस्व झोकून देण्यात हॉंगकॉंगचे खेळाडू भारतीयांच्या तोडीस तोड आहेत किंवा काहीसे सरसच…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.