पाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्याचा खरा हिरो पुण्याच्या कानिटकरचा चौकार होता

भारत पाकिस्तान क्रिकेट सामने हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतात हे आपण खूपवेळा अनुभवलं आहे. पण भारत पाक क्रिकेटच महायुद्ध कधी खेळल गेलं होत माहित आहे?

जानेवारी १९९८, बांगलादेश मधल्या ढाक्याच्या वंगबंधू स्टेडियम वर भारत पाकिस्तान बांगलादेश अशी त्रिकोणीय शृंखला खेळवण्यात आली होती. तिचं नाव होत “सिल्वर ज्युबली इंडिपेंडस कप.” हे फक्त क्रिकेट सामने नव्हते तर या सिरीजच्या मागे राजकीय इतिहास होता.

पंचवीस वर्षांपूर्वी १९७१ साली भारतीय सैन्याने पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेश नावाचा स्वतंत्र देश निर्माण केला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानला सर्वात मानहानिकारक पराभव करून धडा शिकवला होता. याचं घटनेच्या म्हणजेच बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या पंचविशी निम्मित्त हे सामने आयोजित करण्यात आले होते. भारताने केलेल्या अपमानाचा बदला घेण्याची संधी म्हणूनच पाकिस्तान या सिरीज साठी ढाक्यामध्ये दाखल झाला होता.

भारतीय क्रिकेट संघासाठी सुद्धा हा इज्जतीचा प्रश्न होता. यामुळेच ही सिरीज अटीतटीची झाली. बांगलादेशला सहज हरवून भारत आणि पाकिस्तान फायनल मध्ये पोहचले. फायनल सुद्धा तीन सामन्यांची होती. पहिली फायनल भारताने तर दुसरी फायनल पाकिस्तानने जिंकली. आता निकाल शेवटच्या फायनल वर ठरणार होता.

वर्ल्डकप पेक्षाही हाय व्होल्टेज असं या सामन्याचं वर्णन करण्यात आलं होत.

भारत आणि पाकिस्तान मधून लाखो क्रिकेट रसिक ढाक्यामध्ये दाखल झाले होते.पाकिस्तानविरुद्धच्या या फायनलसाठी बांगलादेशचे क्रिकेटफॅन सुद्धा भारताच्या बाजूने होते. कोट्यावधी रुपयांचा सट्टा या सामन्यावर लावण्यात आला होता. मॅचफिक्सिंगबद्दलच्या चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्या होत्या. प्रसिद्धीमाध्यमासोबतच तपासयंत्रणा आणि गुप्तचर संघटना या सामन्यावर लक्ष ठेवून होत्या.

खराब वातावरणामुळे सामना ४८ षटकांचा करण्यात आला . कप्तान अझरूद्दीनने नाणेफेक जिंकून  प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तेव्हा फोर्म मध्ये असणाऱ्या सईद अन्वरने नेहमी प्रमाणे भारताविरुद्ध शतक झळकावलं. त्याच्यासोबत इजाज अहमदने सुद्धा शतक केलं आणि या दोघांनी तिसऱ्या विकेट साठी २३० रन्स बनवून हायेस्ट पार्टनरशिपचा विश्वविक्रम बनवला. सर्व भारतीय गोलंदाजांची पिटाई त्यांनी केली होती. ४८ ओव्हर पूर्ण झाल्या तेव्हा पाकिस्तानच्या ३१४ धावा धावफलकावर लागल्या होत्या.

मोठी मैदाने, गोलंदाजांना मदत होणारे खेळपट्टी यामुळे ३००च्या वर धावा तेव्हा खूपच विरळ बघायला मिळत. त्या काळाच्या मानाने ३१५ धावा हे टार्गेट केवळ अशक्य होते आणि तेही ४८ ओव्हर मध्ये बनवायचे होते. तोपर्यंतचा सगळ्यात यशस्वी ३१२ धावांचा रनचेस श्रीलंकेने १९९२ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध केला होता. त्यानंतर हा विक्रम अबाधित होता. पाकिस्तानी बॉलिंग अटॅक बघता भारतीय रसिकांनी मॅच जिंकण्याची आशाच सोडली होती.

भारताची इनिंग सुरु झाली. सौरव सचिनच्या फेमस सलामी जोडीने जबरदस्त सुरवात केली. सचिनचा नूर आज वेगळाच होता. आल्यापासून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी त्याने सुरु केली. एवढा मोठा रनचेस करण्यासाठी धावगती सुद्धा तितकीच ठेवणे आवश्यक होते. अवघ्या २६ बॉल मध्ये त्याने ४१ धावा बनवल्या पण शहीद आफ्रिदीने त्याला चकवले.

सचिन आउट झाल्यावर वंगबंधू स्टेडियमच नाही तर भारतभरातले टीव्ही सेट शांत झाले.

सचिन नंतर अष्टपैलू रॉबिनसिंगला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. कप्तान अझरूद्दीनची ही खेळी यशस्वी ठरली.  रॉबिनसिंगने गांगुलीला जबरदस्त साथ दिली. गांगुलीने शतक पूर्ण केले. भारताच्या २५० धावा पूर्ण झाल्या. आता सामना टप्प्यात आला असे वाटत असताना रॉबिनसिंग ८२ धावा करून आउट झाला. त्याच्या पाठोपाठ अझरूद्दीन, सिद्धू, जडेजा, मोंगिया या सगळ्यांनी हजेरी लावून परत पॅव्हेलीयन गाठले. गांगुलीसुद्धा १२४धावावर बाद झाला.

बघता बघता सामना परत पाकिस्तानच्या बाजूने झुकला.

इतके सगळे फलंदाज एकेरी धावावर आउट झाल्यामुळे ही मॅच फिक्सिंग आहे असा दंगा प्रेक्षकांनी सुरु केला. पाकिस्तानी खतरनाक ऑफस्पिनर सकलेन मुश्ताकने भारतीय फलंदाजांची भंबेरी उडवली होती.

शेवटची ओव्हर टाकायला परत सकलेन मुश्ताक आला .आता एका ओव्हर मध्ये ९ धावा बनवण्याचे लक्ष्य होते.एक जरी चेंडू वाया गेला तरी सामना गेला आणि सोबत देशाला सुद्धा मान खाली घालायला लागणार होती. तेव्हा क्रीजवर अष्टपैलू हृषिकेश कानिटकर आणि फास्टर बॉलर श्रीनाथ हे दोघे होते. रणजी मध्ये महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या कानिटकरचा हा तिसरा आंतरराष्ट्रीय सामना होता. एव्हढ्या प्रेशर गेमचा त्याला अनुभवच नव्हता.

अनुभवी श्रीनाथ प्रत्येक बॉलनंतर जाऊन कानिटकरला धीर देत होता. कसेबसे एकेरी दुहेरी धावा काढत त्यांनी दोन बॉल मध्ये तीन धावा इथं पर्यंत मॅच नेली. हजारो रसिक स्टेडियम मध्ये असून पिन ड्रोप सायलेन्स म्हणजे काय याचा अनुभव येत होता.सकलेनला अंदाज होता या बॉल एक किंवा दोन धावा साठी कानिटकर प्रयत्न करेल.  त्या बॉलच्या वेळी श्रीनाथने कानिटकरच्या कानात काही तरी सांगितले.

सकलेनने सिंगलची अपेक्षा धरून त्याप्रमाणे आक्रमक फिल्ड सेट केली आणि फ्लाईटेड बॉल टाकला. डावखुऱ्या कानिटकरने अचानक पुढे येऊन बॉलला जोरदार फटका दिला. बॉल काही क्षण हवेत जाऊन सीमापार गेला. कानिटकरच्या बाउन्ड्रीने अशक्यप्राय वाटणारा ३१५ धावांचा जादुई आणि विश्वविक्रमी आकडा भारताने पार केला.

राजकीय दृष्ट्या मानाचा ईंडीपेंडस कप भारतीय टीमने आपल्या नावावर केला. वर्ल्ड कप जिंकल्यावर होणार नाही एवढा जल्लोष तेव्हा भारतात केला गेला. सामनावीर गांगुली तर मालिकावीर सचिन ला घोषित करण्यात आले. पण त्या दिवसाचा खरा हिरो हृषिकेश कानिटकर होता.

मॅचफिक्सिंगमुळे हातातून गेला असा वाटणारा सामना कानिटकरच्या एका चौकाराने भारताच्या बाजूने फिरला . अनेकांना आयुष्यभर खेळून जेव्हढी प्रसिद्धी मिळत नाही ती प्रसिद्धी पुणेरी हृषिकेश कानिटकरला या एका चौकारामुळे मिळाली.

पाकिस्तानची नांगी क्रिकेट मैदानात परत एकदा ठेचली होती. पुढे अनेकदा शेवटच्या बॉलपर्यंत गेलेले अटीतटीचे सामने झाले पण असा श्वास रोखायला लावणारा सामना अपवादानेच बघायला मिळाला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.