‘चोली के पीछे’ गाण्यात माधुरीसोबत डान्स करायला नकार दिल्याचा पश्चाताप तिला कायम झाला..

कधी कधी कळत नकळतपणे झालेल्या चुकीने अनेक अनपेक्षित गोष्टी घडून जातात. या गोष्टी चांगल्या असतात तर कधी वाईट. पण दोन्ही सिच्युएशनवेळी त्याचा पुढे कायम पश्चाताप होत राहतो. गायिका इला अरुण हिला देखील असाच पश्चाताप झाला होता. तिला माधुरी दीक्षितसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाली असती पण तिने नकार दिला आणि ही संधी तिच्या हातातून निसटून गेली.

हा किस्सा आहे १९९३ सालच्या सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यानचा.

‘खलनायक’ हा चित्रपट अनेक अर्थाने वादग्रस्त ठरला. एकतर या चित्रपटानंतर संजय दत्तला मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी म्हणून टाडाखाली अटक झाली. त्याच्या सिनेमावर बहिष्काराची भाषा बोलून दाखवली गेली. मोठा आगडोंब या निमित्ताने देशाने पहिला.

पण त्यापूर्वी आणखी एक वादळ या सिनेमाच्या निमित्ताने निर्माण झालं होतं. 

या चित्रपटात एक गाणं होतं ज्या गाण्यावर देशभरातून मोठी टिकेची झोड उठली. अनेक राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संस्थांनी या गाण्यावर प्रचंड टीका केली. या गाण्याच्या विरुध्द निदर्शने झाली, मोर्चे निघाले. गायिका इला अरुण हिच्या विरुद्ध अनेक पोलीस ठाण्यात केस दाखल करण्यात आल्या.

हे गाणं होतं ‘चोली के पीछे क्या है…’

आनंद बक्षी यांनी लिहिलेलं हे गाणं उत्तर प्रदेशातील एका लोकगीतावर आधारित होतं. गाण्याच्या पहिल्याच ओळीमध्ये बऱ्यापैकी अश्लीलता लोकांना दिसली. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी इला अरुणची सहगायिका अलका याज्ञिक हिला देखील हे गाणे अश्लील वाटले.

परंतु इला अरुणने अशी गाणी उत्तर भारतामध्ये होळी, नौटंकी आणि विवाह प्रसंगात कायम वाजवली जातात. गीतकार आनंद बक्षी यांनी देखील या गाण्यात काहीही अश्लील नाही, असे सांगितले. हे गाणे रेकॉर्ड झाले. 

या गाण्यच्या रेकॉर्ड्स जेव्हा बाहेर आल्या त्यावेळी सुरुवातीला या गाण्याच्या ऱ्हिदमने तरुणांना चांगलेच वेड लावले. या गाण्यामुळे तब्बल १० मिलियन (एक कोटी) कॅसेटची विक्री झाली! 

परंतु जस जसे गाणे लोकप्रिय होत गेले त्याच्यावर टीकेची झोड उठू लागली. या गाण्यातून प्रचंड अश्लीलता दिसते असे सांगितले गेले. देशातील अनेक संस्कृती रक्षकांनी इला अरुण हिच्या विरुद्ध अनेक ठिकाणी खटले दाखल केले. कोर्टाचे समन्स तिला बजावण्यात आले.

या गाण्याचे चित्रीकरण करण्यासाठी सुभाष घई यांनी माधुरी दीक्षित सोबत इला अरुण हिलाच साइन केले होते. परंतु इला अरुणने चित्रीकरणात भाग घ्यायला नकार दिला. कारण तिचे करियर नुकतेच बहरत होते आणि या काळात कुठलीही ‘रिस्क’ घ्यायला ती तयार नव्हती. आधीच कोर्टाकडून येणाऱ्या समन्सने ती वैतागली होती.

सुभाष घई यांनी तिला हर तऱ्हेने सांगून पाहिले परंतु तिचा नकार कायम होता.

शेवटी तिच्या ऐवजी या चित्रपटात नीना गुप्ता या अभिनेत्रीला घेण्यात आले आणि नीना गुप्ता आणि माधुरी दीक्षित यांच्यावर हे गाणे चित्रित झाले. या गाण्याच्या विरुद्ध उठलेले वादळ काही काळानंतर शांत झाले. या गाण्यामुळे चित्रपट सुपर हिट ठरला.

या सिनेमाची कोरिओग्राफी सरोज खान हिने केली होती. सरोज खान यांना कोरिओग्राफीसाठी आणि इला अरुण व अलका याज्ञिक यांना या गाण्यासाठी त्यावर्षीचे फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाले. पण पडद्यावर माधुरी सोबत आपण हे गाणे साकार करू शकलो नाही ही खंत इला अरुणला कायम वाटत राहिली.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.