इंदौरचे पोहे जगभर फेमस होण्यामागे एका मराठी माणसाचा हात आहे…

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश मध्ये नाष्ट्याला पोहे खाण्याची परंपराच आहे असं म्हणायला हरकत नाही. अधिकारी व्हायचं असेल, तर पुण्यातल्या पेठांमध्ये पोहे खाणं अनिवार्य समजलं जातं. पोह्यांचं महत्व सांगायला गेलो तर लय वेळ लागेल. मुद्यावर येतो. 

सध्या इंदोरी पोह्यांबद्दल लय बोललं जातं. नाव जरी इंदोरी पोहे असले तरीही त्याची ओळख केवळ एका शहरापुरती मर्यादित राहिली नाही. 

संपूर्ण देशात इंदोरी पोहे चवीने खाल्ले जातात. असं सांगण्यात येत की, सुरुवातीला केवळ महाराष्ट्र आणि मारवाडी लोकांमध्ये पोहे फेमस होते. मात्र, इंदोरी पोह्यांना जगभर ओळख मिळवून दिली ती एका मराठी माणसाने. 

स्वातंत्र्याच्या दोन वर्षानंतर एक मराठी तरुण रोजगारासाठी इंदोरला गेला आणि त्याने हे पोहे जगभर फेमस केले त्यांचं नाव आहे, पुरूषोत्तम जोशी. 

पुरूषोत्तम जोशी यांचा जन्म १९२३ मध्ये रायगड जिल्ह्यातल्या निजामपूर येथे झाला. कामाच्या शोधात त्यांनी गाव सोडले आणि ते इंदोरला मावशीकडे राहू लागले. काही दिवसानंतर त्यांना गोदरेज कंपनीत सेल्समन म्हणून नोकरी मिळाली. काही दिवसानंतर पुरुषोत्तम जोशी सेल्समनच्या जॉबला कंटाळले. स्वतःचा व्यवसाय करायचा विचार ते करू लागले होते.

नोकरीचा राजीनामा देत त्यांनी इंदोरच्या टिळकपथावर त्यांनी एक हॉटेल सुरु केले. त्याला प्रशांत असे नाव दिले.

हॉटेल मध्ये वेटर,आचारी आणि कॅशियर असे सगळ्यांचे काम ते एकटे करत. त्यांनी या हॉटेल मध्ये जिलेबी, शेव बरोबर पोहे द्यायला सुरुवात केली. तिथल्या दुकानदारांच्या आणि व्यापारी संघाच्या मते जोशी यांच्या पूर्वी इंदोरमध्ये कुठल्याच हॉटेलमध्ये पोहे मिळत नव्हते.

पुरूषोत्तम जोशी यांच्या हॉटेल मध्ये मिळणाऱ्या पोह्यांची चव सगळ्यांना आवडू लागली होती. इंदोरकरांची सकाळ जोशी यांच्या हॉटेलमधले पोहे खाऊनच होऊ लागली होती. दिवसेंदिवस हॉटेल मध्ये पोहे खाण्यासाठी गर्दी होऊ लागली होती. पोह्यांसाठी होणारी गर्दी पाहून इंदोर मध्ये इतर हॉटेल चालकांनी पोहे बनवायला सुरुवात केली. 

तुम्ही सकाळी इंदोर शहरात कुठेही फेरफटका मारला तरी तुमच्या लक्षात येईल की इथल्या हॉटेल मध्ये, खाद्यांच्या गाडीवर पोहे मिळतातच. आजचा विचार केला तर इंदोरमध्ये लहान मोठे असे २ हजार ६०० पेक्षा जास्त ठिकाणी पोहे मिळतात. एका अहवालानुसार इंदोरमध्ये दिवसाला ६५ टन पोह्यांची विक्री होते. इंदोर मधील ९० टक्के लोक सकाळी नाश्ताला पोहेच खात असल्याचं सांगण्यात येते.

जवाहरलाल नेहरूंपासून ते अमिताभ बच्चनपर्यंत सगळेच जण इंदोरी पोह्यांचे चाहते… 

सर्वसामान्यांपासून ते नेते, अभिनेते हे इंदोरच्या पोह्यांची चाहते आहेत. नेहरूंनी तर देशाचा नाश्ता पोहे असल्याचा उल्लेख केला होता. झालं असं की, १९५० मध्ये काँग्रेस पक्षाचे एक अधिवेशन इंदोरला आयोजित करण्यात आले होते.

या अधिवेशनात तत्कालीन पंतप्रधान नेहरू सामील झाले होते. तेव्हा त्यांना नाश्त्याला पोहे देण्यात आले होते. तेव्हा त्यांनी पुरुषोत्तम जोशी यांना बोलवून पोहे आवडल्याचे सांगितले. तसेच “ये आवाम का नाश्ता है” असा सुद्धा उल्लेख केला होता. 

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सुद्धा वेळोवेळी इंदोरला मिळणाऱ्या पोहांची तारीफ केली आहे. त्यांनी कौन बनेगा करोडपती मध्ये इंदोरी पोह्यांसंदर्भांत प्रश्न विचारले होते. 

इंदोरला येणाऱ्या क्रिकेटपटुंना सुद्धा इथले पोहे आवडतात

२०१९ मध्ये इंदोरच्या होळकर स्टेडियम मध्ये भारताची बांग्लादेश विरोधात मॅच होती. या मॅच मध्ये विराट कोहली शून्यावर बाद झाला होता. तेव्हा इंदोरच्या लोकांनी मैदानात पोस्टर दाखवत म्हणाले होते, जर तू इंदोरचे पोहे खाऊन खेळला असता तर शतक ठोकलं असतं.

याच सिरीजदरम्यान कॉमेंट्री करणारे गौतम गंभीर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि जतीन सप्रू यांनी इंदोरचे पोहे जिलेबी खातानाचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. भारताची माजी क्रिकेटर राहुल द्रविड सुद्धा अनेकवेळा इंदोरी पोहे खाताना दिसलाय. 

GI टॅगसाठी शिफारस

इंदोरच्या पोह्यासह ४ गोष्टींसाठी  GI टॅगची शिफारस केली आहे. लवंगशेव, खट्टा मिठा नमकीन आणि दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या शिकंजीचा समावेश आहे. तसेच मध्यप्रदेश सरकारने पोहे, जिलेबी आणि नामकिनच्या ब्रॅंडिंगसाठी बजेट मध्ये तरतूद करण्यात येईल अशी घोषणा केली होती. 

पोह्यांमुळे जगभरात इंदोरची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्याचे सगळे श्रेय जाते मराठमोळ्या पुरूषोत्तम जोशी यांना.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.