साधे बदल वाटत असले तरी नवी युद्धनौका आणि नव्या ध्वजातून, भारतानं मोठी मजल मारली आहे

छत्रपती शिवाजी महाराजांना ‘father of Indian navy’ म्हणून ओळखलं जातं. इंग्रज, डच, पोर्तुगीज अशा तगड्या शत्रूंसमोर झुंजण्यासाठी महाराजांनी स्वतःचं नौदल उभं केलं. ‘ज्याच्या हाती आरमार, त्याची समुद्रावर सत्ता’ हे महाराजांनी फार आधीच ओळखलं होतं. याच आरमाराच्या जोरावर महाराजांनी पारतंत्र्य झुगारलं, स्वराज्याला बळ दिलं.

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आठवण येण्याचं कारण म्हणजे, भारताच्या नौदलात झालेले दोन आमूलाग्र बदल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोचीमध्ये झालेल्या कार्यक्रमात भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रांत ही पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका दाखल झाली, सोबतच भारताच्या नव्या नौदल ध्वजाचंही अनावरण करण्यात आलं.

या दोन गोष्टी वरकरणी साध्या वाटत असल्या, तरी भारतानं याद्वारे मोठी मजल मारली आहे. कशी तेच पाहुयात.

आधी माहिती घेऊयात आयएनएस विक्रांत या युद्धनौकेबद्दल…

भारताकडे आलेली ही चौथी विमानवाहू युद्धनौका. याआधी आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विराट या युद्धनौका सेवेतून निवृत्त झाल्या, त्यानंतर आतापर्यंत नौदलाच्या ताफ्यात फक्त आयएनएस विक्रमादित्य ही एकमेव विमानवाहू युद्धनौका होती, आता आयएनएस विक्रांतमुळे भारतीय नौदलाची क्षमता काही पटींनी वाढेल.

विक्रांतची लांबी २६२ मीटर आहे, तर ही युद्धनौका १४ मजले उंच आहे. पूर्ण क्षमतेनं ही युद्धनौका समुद्रात उतरली, तर तिचं वजन ४५ हजार टनपर्यंत जाऊ शकतं. ३० लढाऊ विमानं, कामोव्ह-३१, मिग-२९ ही रशियन बनावटीची हेलिकॉप्टर्स सध्या आयएनएस विक्रांतवर तैनात आहेत. पण ताकद वाढवणारी आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विक्रांतवर बराक-८ ही जमिनीवरून हवेत मारा करु शकणारी क्षेपणास्त्र आहेत.

२००५ पासून विक्रांतच्या बांधणीचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि अनेक अडचणींवर मात करुन भारतानं स्वदेशी बनावटीची ७६ टक्के साधनसामुग्री वापरत १७ वर्षांनंतर ही युद्धनौका समुद्रात उतरवली आहे.

 १९७१ च्या युद्धात जबरदस्त कामगिरी करणाऱ्या आयएनएस विक्रांतवरुनच या युद्धनौकेचं नाव ठेवण्यात आलं आहे.

नव्या आयएनएस विक्रांतमध्ये शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवा देण्याची क्षमता, जहाजांवरच्या क्षेपणास्त्रांपासून रक्षण करण्याची ताकद आणि कमी वेळात व अंतरात विमानं उड्डाण करु शकतील अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. एकाच प्रवासात मोठा टप्पा गाठण्याची क्षमता असल्यानं, इंधन भरण्यासाठी पुन्हा बंदरावर जाण्याची गरज विक्रांतला लागणार नाही. त्यामुळं समुद्रात खोलवर जाऊन मारा करण्याची संधी नौदलाला प्राप्त होईल.

आयएनएस विक्रमादित्यमुळं भारताच्या सागरी किनाऱ्याची एक बाजू सुरक्षित होतीच, पण आता ताफ्यात दुसरी विमानवाहू युद्धनौका दाखल झाल्यामुळं भारताला सागरी सीमा आणखी सुरक्षित करता येतील. त्यामुळेच क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर्स, पाणबुड्या यांनी सुसज्ज असलेली आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या इतिहासातलं क्रांतिकारक पाऊल ठरणार आहे.

दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे नौदलाच्या ध्वजाचा…

२ ऑक्टोबर १९३४ ला भारतीय नौदलाचं नामकरण करुन रॉयल इंडियन नेव्ही असं करण्यात आलं होतं. देश पारतंत्र्यात असल्यानं साहजिकच नौदलही ब्रिटिशांच्याच अधिपत्याखाली होतं. 

WhatsApp Image 2022 09 02 at 20804 PM
1947-1950

तेव्हा भारताच्या नौदलाच्या ध्वजात ब्रिटिश साम्राज्याची ओळख सांगणारा सेंट जॉर्जचा रेड क्रॉस आणि डाव्या कोपऱ्यात ब्रिटिशांचा युनियन जॅक होता.

WhatsApp Image 2022 09 02 at 20821 PM
1950-2001

१९५० मध्ये भारत प्रजासत्ताक झाला तेव्हा नौदलाचं नाव बदलण्यात आलं. ‘रॉयल’ हा शब्द काढून टाकत फक्त इंडियन नेव्ही या नावानं भारतीय नौदलाला ओळखलं जाऊ लागलं. याचवेळी नौदलाचा ध्वजही बदलण्यात आला, त्यातला युनियन जॅक हद्दपार झाला आणि त्याजागी भारताचा तिरंगा दिसू लागला. २००१ पर्यंत हाच नौदलाचा ध्वज कायम होता.

WhatsApp Image 2022 09 02 at 20835 PM
2001-2004

मात्र २००१ मध्ये ब्रिटिश साम्राज्याची ओळख सांगणारा रेड क्रॉस काढून टाकण्यात आला आणि त्याच्या जागी निळ्या रंगात ‘अँकर आणि भारताची राजमुद्रा’ हे बोधचिन्ह लावलं गेलं. पुढचे ३ वर्ष हाच ध्वज कायम होता, मात्र निळ्या रंगाचं हे बोधचिन्ह आणि पांढऱ्या रंगाच्या झेंड्यामुळं आकाश आणि समुद्राच्या रंगांचाच भास व्हायचा, त्यामुळं या ध्वजाची दृश्यमानता कमी आहे, अशा तक्रारी येऊ लागल्या.

WhatsApp Image 2022 09 02 at 20908 PM
2004-2014

त्यामुळं २००४ मध्ये नौदलाचा ध्वज पुन्हा एकदा बदलण्यात आला. याबदलात सेंट जॉर्ज क्रॉसचा पुन्हा समावेश करण्यात आला. डाव्या कोपऱ्यात तिरंगा, बाकीच्या ध्वजावर रेड क्रॉस आणि अगदी मधोमध भारताची राजमुद्रा अशी रचना करण्यात आली. 

WhatsApp Image 2022 09 02 at 20913 PM
2014-2022

२०१४ मध्ये या ध्वजात हलकासा बदल करुन राजमुद्रेखाली ‘सत्यमेव जयते’ हे शब्द देवनागरीमध्ये लिहिण्यात आले. तेव्हापासून हाच ध्वज कायम होता.

आता पुन्हा एकदा यात बदल करण्यात आला आहे, नव्या ध्वजातनं ब्रिटिशांचा रेड क्रॉस तर गेला आहेच, पण सोबतच भारताची राजमुद्रा आणि नौदलाच्या बोधचिन्हाचा पुन्हा एकदा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गडद निळ्या रंगावर सोनेरी रंगात हे नवं बोधचिन्ह साकारण्यात आलं आहे. सोबतच नौदलाचं ‘शं नो वरुण:’ घोषवाक्यही या नव्या ध्वजावर आहे. 

WhatsApp Image 2022 09 02 at 20917 PM
नवा नौदल ध्वज

बोधचिन्हाच्या बाजूची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेप्रमाणं अष्टकोनी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शिवरायांपासून प्रेरणा घेत हा नवा ध्वज बनवला असल्याचं आणि हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांनाच अर्पण करत असल्याचं आपल्या भाषणात सांगितलं.

स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेमुळं भारताची ताकद तर वाढलीच आहे, पण सोबतच भारत युद्धसामुग्रीसाठी इतर देशांवर अवलंबून नाही, हे देखील स्पष्ट झालं आहे. ब्रिटिश साम्राज्याची खूण दाखवणारा रेड क्रॉसही नौदलाच्या ध्वजावरुन हटवण्यात आल्यानं भारतीय नौदलाचा स्वाभिमानही दुणावला असेल यात शंका नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.