१५ ऑगस्ट १९४७, भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन कसा साजरा झाला माहित करुन घ्या…

आज सगळ्या देशात भारताच्या स्वातंत्र्य दिन साजरा होतोय. हर घर तिरंगा मोहिमेमुळे कित्येक घरांवर भारताचा तिरंगा फडकताना दिसतोय. देशातल्या वेगवेगळ्या वास्तू तिरंगी रोषणाईमध्ये रंगलेल्या आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

फक्त आजच नाही, तर मागच्या काही दिवसांपासूनच देश स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात रंगलेला आहे.

आज सगळेच भारतीय आपापल्या परीनं स्वातंत्र्यदिन साजरा करतील, कुणाच्या घरी जिलेबी असेल तर कुणाच्या घरी राष्ट्रीय सणानिमित्त पूजा. साहजिकच ७६ वर्षांनंतर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या प्रथाही बदलल्या आहेत.

त्यामुळे याचीही आठवण ठेवायला हवी की भारतानं पहिला स्वातंत्र्यदिन कसा साजरा केला होता ?

भारताच्या स्वातंत्र्याच्या तारीख ब्रिटिशांनी खरंतर ३० जून १९४८ अशी ठरली होती. तर १९२९ मध्ये लाहोरला झालेल्या काँग्रेस अधिवेशनामध्ये २६ जानेवारी १९३० लाच ‘पूर्ण स्वराज्य’ घोषित करण्यात यावं असा निर्णय झाला होता. मात्र ब्रिटिश काही तेव्हा भारतातून हलले नाहीत. अखेर १९४७ मध्ये स्वातंत्र्यसंग्राम शिगेला पोहोचला.

४ जून १९४७ ला भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यामुळं प्रत्येक भारतीयाचे डोळे १५ ऑगस्टकडे लागलेले होते.

देशासाठी प्राण अर्पणाऱ्या अनेक क्रांतिकारांच्या बलिदानाचं सार्थक या दिवशी होणार होतं, भारत स्वतंत्र होणार होता.

आदल्या दिवशी म्हणजे १४ ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं होतं, त्यामुळं लॉर्ड माऊंटबॅटन पाकिस्तानला गेले होते. ते १५ तारखेला संध्याकाळी भारतात परतणार होते, मात्र त्यांनी भारतात यायच्या आधीच भारतातल्या रस्त्यांवर प्रचंड गर्दी होती. विशेषत: राजधानी दिल्लीत वेगळाच उत्साह संचारला होता.

संसदेजवळ रायसोनी हिल्स परिसरात लोकांनी खच्चून गर्दी केली होती. प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात रात्री ११ वाजता होणार होती, मात्र संध्याकाळी ७ वाजल्यापासूनच बड्या नेत्यांचं तिथं आगमन होऊ लागलं.

अखेर ११ वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रमाला सुरुवात झाली. पहिलं काय झालं असेल तर, स्वातंत्र्यसैनिक सुचेता कृपलानी यांनी ‘वंदे मातरम’ गायलं. उपस्थित लोकांच्या अंगावर काटा येणार तो क्षण.

पण संसदेबाहेरही लोकांच्या उत्साहाला भरतं आलं होतं, स्वतः पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना बाहेर येऊन लोकांना शांत राहण्याचं आवाहन करावं लागलं होतं.

वंदे मातरम झाल्यानंतर, डॉ. राजेंद्रप्रसाद भाषणाला उभे राहिले. त्यांनीही अत्यंत प्रभावी असं भाषण केलं. त्याच्यानंतर भाषणाला उभे राहिले, सर्वपल्ली राधाकृष्णन. खरंतर राधाकृष्णन यांना नेहरूंनी अगदी ऐनवेळी भाषणाला उभं राहण्याची विनंती केली आणि सांगितलं की, १२ च्या ठोक्यापर्यंत खिंड लढवा. काहीच तयारी नसतानाही राधाकृष्णन यांनी सुंदर भाषण केलं आणि अगदी ११.५९ ला नेहरूंकडे माईक सोपवला आणि १२ च्या ठोक्याला नेहरूंनी आपलं जगप्रसिद्ध ‘Tryst with destiny’ भाषण केलं. स्वतंत्र भारताचा सुवर्णक्षण आला, भारत देश स्वतंत्र झाला. 

त्यानंतर मुस्लिम लीगच्या चौधरी खलिककझमान यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ठरावाला पाठिंबा दिला. त्यानंतर मुंबईच्या स्वातंत्र्यसैनिका हंसा मेहता यांनी भारतीय महिलांचं प्रतिनिधित्व करत भारताचा तिरंगा देशाला सादर केला. राजेंद्रप्रसाद यांनी या ध्वजाचा स्वीकार केला. त्यानंतर सुचेता कृपलानी यांनी सारे जहाँ से अच्छा आणि जन गण मन गायलं आणि संसदेचं कामकाज संपलं. 

मग झाला स्वातंत्र्याचा सूर्योदय…

सकाळी ८ वाजताच गव्हर्नमेंट हाऊसवर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शपथ देण्यात आली. त्यानंतर गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भाषण दिलं आणि ३१ तोफांच्या सलामीत भारताचा तिरंगा गव्हर्नमेंट हाऊसवर फडकला. माऊंटबॅटन यांनी तिरंग्याला सॅल्यूट केला आणि भारतीयांमध्ये एकच आनंदाची लाट उसळली.

मात्र त्या दिवशी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण झालं नाही. इंडिया गेट जवळच्या प्रिन्सेस पार्कमध्ये जावहरलाल नेहरूंनी संध्याकाळी सहाच्या सुमारास ध्वजारोहण केलं. भारतीय जनता आनंदानं बेभान झाली होती. या कार्यक्रमाला अनेक मोठे नेते आणि अधिकारी येणार होते, मात्र लोकांची इतकी गर्दी पाहून ते माघारी फिरले.

नेहरूंनी ६ वाजता ध्वजारोहण केलं आणि पावसाला सुरुवात झाली, तरीही भारतीयांचा उत्साह काही कमी झाला नाही. 

तत्कालीन संदर्भानुसार पावसामुळे आकाशात इंद्रधनुष्य तयार झालं होतं, मात्र त्या सात रंगांपेक्षा भारताचा तिरंगा जास्त उठून दिसत होता.

यानंतर पावणेआठ वाजता दिल्लीत आतषबाजी करण्यात आली, रात्री गव्हर्नमेंट हाऊसमध्ये शाही भोजनाचा आणि स्वागत समारंभाचा कार्यक्रम झाला, सगळी दिल्ली दिवसभर गर्दीनं आणि उत्साहानं भारावून गेली होती.

देशातही वेगळी परिस्थिती नव्हती, मुलांना मोफत चित्रपट दाखवण्यात यावे अशी घोषणा काँग्रेसनं केली होती, दिल्लीतल्या शाळकरी मुलांना स्वतंत्रता पदकही मिळालं होतं. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रभात रॅली निघाली, गोडधोड बनलं. क्रांतीकारकांना आदरांजली वाहण्याचे कार्यक्रम झाले.

स्वतंत्र भारताचा पहिला अध्याय त्यादिवशी लिहिला गेला, जो आजही आपल्यासाठी एक ऐतिहासिक ठेवा आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.