वेटलिफ्टिंगसाठी आयुष्य देऊनही, ती फक्त २ मार्कांच्या प्रश्नापुरती लक्षात राहिली आहे

सचिन तेंडुलकरनं वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पुढची कित्येक वर्ष क्रिकेट गाजवलं. त्याच्यामुळं कित्येकांना क्रिकेट बघण्याचं वेड लागलं, स्कोअर काय झाला ? याच्यापुढचा प्रश्न ‘सचिन खेळतोय ना?’ असाच असायचा. सचिनला अफाट प्रेम मिळालं, पुरस्कार मिळाले आणि त्याच्या खेळामुळं तो कायम लोकांच्या लक्षात राहिला.

सचिनचं सगळ्यात मोठं यश म्हणजे, त्याला बघून कित्येकांनी क्रिकेट खेळायचं ठरवलं. साहजिकच तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला, मात्र आपल्याच भारतात अशीही एक खेळाडू आहे जिनं अनेक अडथळे पार करुन यश मिळवलं, एका खेळात देशाची पहिली सुपरस्टार बनली…

पण दुर्दैवानं आज तिची आठवण फक्त १-२ मार्कांच्या प्रश्नाएवढीच मर्यादित राहिली आहे.

साल होतं १९८९, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदाच महिलांना खेळायची संधी मिळत होती. एका प्रकारे क्रीडा विश्वात क्रांती घडत होती. भारताकडून उतरलेल्या संघात वेटलिफ्टर्समध्ये एक नाव होतं, कुंजरानी देवी. तेव्हा भारतात क्रिकेट सोडून फार फार तर हॉकी आणि काही प्रमाणात टेनिस लोकप्रिय होतं. तिथं कुणी अगदी आवर्जून वेटलिफ्टिंग वैगरे बघेल याचा प्रश्नच नव्हता.

पण जी काही थोडी लोकं आवर्जून पाहत होती, त्यांना कुंजरानीकडून भरपूर अपेक्षा होत्या. कारण इंफाळच्या महाराज बोध चंद्र कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिनं सगळं लक्ष वेट लिफ्टिंगकडे वळवलं होतं. खरंतर ती पॉवरलिफ्टिंग करायची, मात्र भविष्यातल्या संधी बघून तिनं वेटलिफ्टिंगकडं वळण्याचा अवघड निर्णय घेतला आणि तो यशस्वीही करुन दाखवला.

१९८५ च्या नॅशनल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये तिनं ३ गोल्ड मेडल्स जिंकले. १९८७ मध्ये २ नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

मग साल आलं १९८९, मँचेस्टरमधल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा. कुंजरानी देवीनं त्या स्पर्धेत ३ सिल्व्हर मेडल्स जिंकले. अनेकांसाठी हा सुखद धक्का होता. कारण फक्त चारच वर्षांपूर्वी तिनं आपला खेळ बदलला होता आणि एवढ्या कमी वेळात एवढं मोठं यशही मिळवलं होतं.

सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे, मॅचेस्टरच्या स्पर्धांवेळी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा ती भारताबाहेर गेली, पहिल्यांदाच इंटरनॅशनल स्पर्धेत उतरली आणि ३ सिल्व्हर मेडल्सही नावावर केली. त्या विजयामुळं तिचं नाव भारतात सगळीकडे पोहोचलं.

मात्र कुंजरानी देवी या एकाच विजयावर थांबली नाही, १९८९ पासून फक्त १९९३ चा अपवाद सोडला तर १९९७ पर्यंतच्या प्रत्येक वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये तिनं सिल्व्हर मेडल जिंकलं. सलग ८ वर्ष तिनं या अवघड खेळात जिंकण्याचं सातत्य राखलं. १९९३ मध्येही तिनं मेडल जिंकलं असतंच, पण अगदी शेवटच्या क्षणाला तिच्या दुखापतीनं डोकं वर काढलं आणि पदकाची संधी हुकली.

फक्त वर्ल्ड चॅम्पियनशिपच नाही, तर १९९० आणि १९९४ च्या एशियन गेम्समध्येही तिनं ब्रॉंझ मेडलवर आपलं नाव कोरलं.

१९९७ ला तिच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यामुळं फॉर्म ढासळला आणि मेडल्स जिंकणं अवघड झालं.

कुंजरानीनं वयाच्या १४-१५ व्या वर्षी पीटी उषाला मेडल जिंकताना पाहिलं होतं, तेव्हापासून तिनंही ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं. २००० साली पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या वेटलिफ्टिंगचा समावेश करण्यात आला. फॉर्म नसला, तरी अनुभव आणि कमबॅक करायची ताकद असल्यामुळं कुंजरानी देवीला ऑलिम्पिकमध्ये संधी मिळेल असं सांगितलं जात होतं, मात्र तसं झालं नाही.

भारताची सर्वात यशस्वी महिला वेटलिफ्टर भारताच्या ऑलिम्पिक संघाचा भागच नव्हती.

त्याच ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीनं वेटलिफ्टिंगमध्ये ब्रॉंझ जिंकलं आणि मल्लेश्वरी सुपरस्टार झाली. प्रत्येक ठिकाणी तिच्या बातम्या झळकू लागल्या आणि तिच्या वाट्याला तिच्या हक्काचं प्रचंड कौतुकही आलं.

दुसऱ्या बाजूला कुंजरानी देवीवर सहा महिन्यांचा बॅन बसला, असं सांगण्यात आलं की ती डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळली आहे. या विरोधात कुंजरानी कोर्टातही गेली, प्रकरण चांगलंच गाजलं. जो खेळ आपलं सर्वस्व आहे, त्यापासून तिला सहा महिने लांब राहावं लागलं.

यातून कमबॅक करणं कठीण होतं, पण तिनं करुन दाखवलं…

२००२ च्या कॉमनवेल्थ गेम्स, ठिकाण पुन्हा एकदा मँचेस्टर. यावेळी कुंजरानीनं स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि ओव्हरऑल अशा तिन्ही प्रकारात गोल्ड मेडलवर नाव कोरलं. १९९७ पासून तिच्या क्षमतांवर ज्या ज्या शंका घेतल्या जात होत्या, त्या सगळ्यांना तिनं चोख उत्तर दिलं होतं.

२००४ मध्ये पुन्हा एकदा ऑलिंपिक्स आलं, २००० मध्ये हुलकावणी दिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा खरा चान्स तिला होता. यावेळी तिची निवड झाली, तिनं प्रयत्नांची शर्थही केली पण तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. या स्पर्धेवेळी कुंजरानीचं वय होतं ३६ वर्ष. ऑलिम्पिकमध्ये तिला फक्त १९० किलो वजन उचलता आलं, निवृत्तीच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या.

पण कुंजरानी देवी कित्येक अडथळे पार करुन इथवर पोहोचली होती, हा चर्चांचा अडथळा त्यामानानं छोटा होता.

२००६ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ती उतरली, यावेळी लोकांना पदकाच्या फारशा आशा नव्हत्या, पण कुंजरानीनं गोल्ड मेडल जिंकलं. पीटी उषाला पळताना बघून सुरू झालेला तिचा प्रवास वयाच्या ३८ व्या वर्षी सलग दुसऱ्यांदा कॉमनवेल्थ गोल्ड जिंकण्यापर्यंत पोहोचला.

आपल्या १७ वर्षांच्या वेटलिफ्टिंग करिअरमध्ये तिनं भारताला ५० पेक्षा जास्त इंटरनॅशनल मेडल्स जिंकून दिले. तिला अर्जुन अवॉर्ड, राजीव गांधी खेलरत्न, पद्मश्री असे अनेक पुरस्कार मिळाले. पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे, तिच्यामुळं ईशान्य भारतात क्रीडा सुविधा उभ्या करण्यासाठी पावलं उचलली गेली. ज्याचे फायदे आपल्याला आज दिसत आहेत.

मेरी कोम, मीराबाई चानू आणि बिंद्रायनी देवी यांनी अनेकदा आम्ही कुंजरानी देवीमुळं खेळाकडं वळल्याचं सांगितलं, यापेक्षा यशाची मोठी पावती काय असणार ?

भारतातल्या कित्येक मुलींना तिनं खेळाकडं वळवलं, नवी स्वप्न बघायला शिकवली. मात्र आज तिचं नाव फारसं कुणाच्या लक्षात नाही, तिचे रेकॉर्ड्स तोंडपाठ असणारा माणूस दुर्मिळ आहे. ती कधी कुठल्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये दिसत नाही तर सीआरपीएफमध्ये काम करत आपलं कर्तव्य बजावते, नवे खेळाडू घडवते.

इतकी मोठी खेळाडू आपल्याकडे आहे तरीही तिचं नाव फक्त केबीसीतल्या प्रश्नासाठी किंवा स्पर्धा परीक्षांमधल्या एक-दोन मार्कांच्या उत्तरासाठीच सर्च केलं जातं… हेच भारताचं दुर्दैव आहे इतकंच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.