फायनल न खेळताच भारताने जिंकला होता पहिला ‘आशिया चषक’

दुबईतील ‘दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम’वर खेळवल्या  जात असलेल्या बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या मॅचने आजपासून ‘आशिया चषक’ क्रिकेट स्पर्धेस सुरुवात झालीये. साधारणतः पुढचे १५ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी ‘दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम’वरच खेळविण्यात येणार आहे.

भारत, पाकिस्तान,श्रीलंका, बांगलादेश या आशिया खंडातील क्रिकेट खेळणाऱ्या प्रमुख देशांसह अफगाणिस्तान आणि हॉगकाँग या देशांचा या स्पर्धेत समावेश आहे. अफगाणिस्तान आणि हॉगकाँग हे तुलनेने दुबळे संघ समजले जात असले तरी बांगलादेश मात्र कठल्याही मोठ्या संघाला अपसेट करण्याची क्षमता बाळगतो.

१९८४ सालापासून खेळविण्यात येत असलेल्या या स्पर्धेच्या आजपर्यंतच्या इतिहासात भारतानेच स्पर्धेवर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. आतापर्यंत झालेल्या १३ आशिया चषक स्पर्धेत भारताने सर्वाधिक म्हणजे ६ वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय.

2016 asia cup winner
२०१६ सालचा विजेता भारतीय संघ

२०१६ साली झालेल्या या स्पर्धेच्या मागच्या सिझनमध्ये भारताने बांगलादेशचा ८ विकेट्सने पराभव करत ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत उतरलेल्या ‘टीम इंडिया’ समोर आपलं विजेतेपद टिकवण्याचं आव्हान असणार आहे.

१९८४ सालापासून सुरु झालेली ही स्पर्धा प्रत्येक २ वर्षानंतर भरविण्यात येते. वन-डे क्रिकेटच्या फॉरमॅटमधील ही स्पर्धा फक्त एकाच वेळी म्हणजे २०१६ साली  टी-२० च्या स्वरुपात खेळविण्यात आली होती.

१९८४ साली खेळविण्यात आलेल्या पहिल्या आशिया चषक स्पर्धेविषयीचा एक रंजक किस्सा असा की त्यावेळी भारतीय संघाने अंतिम सामना न खेळताच स्पर्धेच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं.

या स्पर्धेत असं घडून शकलं कारण त्यावेळी या स्पर्धेत फक्त ३ संघांनी सहभाग घेतला होता. हे ३ संघ म्हणजे भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका. या संघांदरम्यान आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा राउंड रॉबिन प्रकारात खेळविण्यात आली होती.

asia cup winner
वितेतेपदाच्या चषकासह दिलीप वेंगसरकर

भारताने पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही देशांविरूद्धचे आपले सामने जिंकले होते. आपल्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा १० विकेट्सने दारूण पराभव केला होता, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला ५४ धावांनी धूळ चारली होती. भारताकडून पराभूत झालेल्या श्रीलंकेने आपल्या दुसऱ्या मॅचमध्ये पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला होता.

तिन्ही संघांनी एकमेकांविरोधात प्रत्येकी १ मॅच खेळल्यानंतर भारताच्या खात्यात २ विजयांसह ८ गुण, श्रीलंकेच्या खात्यात एका विजयासह ४ गुण जमा झाले होते. पाकिस्तानला दोन्हीही मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागल्याने त्यांना आपल्या गुणांचं खातं देखील उघडता आलं नव्हतं. त्यामुळे गुणतालिकेत सर्वाधिक गुणांसह आघाडीवर असलेल्या भारताला या स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आलं होतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.