आजही कॅन्सर म्हणल्यावर युवराज सिंग आठवतो आणि आपले डोळे ओले होतात…
अहमदाबादचं मैदान. २०११ च्या वर्ल्डकपची क्वार्टर फायनल. समोर ऑस्ट्रेलियाचा तगडा संघ. करो या मरो मॅच होती आणि सगल्या जगाला माहितीये की, नॉकआऊट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया वेगळ्याच रागात खेळते. त्यात रिकी पॉन्टिंगनं सेंच्युरी मारली, ऑस्ट्रेलियानं स्कोअर केला २६०. भारताकडून तोडीस तोड उत्तर येणं गरजेचं होतं.
तेंडुलकर आणि गंभीरनं पन्नास पन्नास रन्स करत चांगली सुरुवात करुन दिली, मात्र कोहली आणि धोनी तसे लवकर गेले आणि भारताचं टेन्शन जरा वाढलं. पण रैनाला हाताशी घेत एक कार्यकर्ता मैदानावर उभा राहिला आणि त्यानं कांगारूंचा बाजार उठवला. ६५ बॉल्समध्ये ८ फोर मारुन नॉटआऊट ५७ रन्स. सगळे बॉलर्स कुटले आणि कव्हर्समधून फोर मारत भारताला मॅच जिंकवून दिली. क्रीझवर गुडघ्यावर बसून दोन्ही हातांनी जल्लोष करत आभाळाकडे पाहणारा त्याचा चेहरा सगळ्या जगानं आपल्या डोळ्यांमध्ये साठवला… त्याचं नाव.. युवराज सिंग. भारताचा फायटर.
युवी भारतीय संघात आला तेव्हा, त्याच्या बॅटिंगपेक्षा जास्त चर्चा त्याच्या स्टाईलची होती. संघात सचिन, द्रविड सारखी पहिल्या बाकावरची पोरं होती, त्यात युवराज म्हणजे आगाऊ आणि मागच्या बाकावरचं पोरगं. डोळ्यांवर गॉगल, कायम वरती असलेली कॉलर असल्या अवतारात युवीनं संघात एंट्री मारली.
२०११ च्या वर्ल्डकपमध्ये मात्र युवराजनं अक्षरश: तांडव केलं. कुठलाच बॉलर त्याच्या तडाख्यातून सुटला नाही. जेव्हा जेव्हा कॅप्टन धोनीनं त्याच्याकडे विश्वासानं बॉल सोपवला, तेव्हा तेव्हा त्यानं विकेटचा बोनस दिला. ऑस्ट्रेलिया विरुद्धची त्याची बॅटिंग आपण आयुष्यात विसरु शकणार नाही. पुढं फायनलला धोनीनं कुलसेकराला छकडा मारला तेव्हा युवीच नॉन स्ट्राईकला होता. फायनल झाल्यावर त्यानं क्लाईव्ह लॉयडच्या हातानं प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला. देशाला वर्ल्डकप जिंकवून दिलेला युवराज आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर होता. त्याला त्रास होत होता, पण कसला ते माहीत नव्हतं.
मग आला टर्निंग पॉईंट…
प्रसिद्धीच्या, यशाच्या झोतात असलेल्या युवराजला कॅन्सर झाल्याचं समजलं. युवीनं त्रास अंगावर काढला होता, कारण त्याला वर्ल्डकप खेळायचा होता. त्याच्या काही टेस्ट झाल्या होत्या, आपल्या पोराला बरं वाटावं म्हणून युवीची आई गुरुद्वाऱ्यात चालली होती. तेवढ्यात त्यांना समजलं की युवीला कॅन्सर झालाय. युवीची धिप्पाड तब्येत, हँडसम चेहरा आणि खतरनाक जिगर पुन्हा पाहता येणार का हा प्रश्न सगळ्या जगाला पडला होता…
युवीची आई एका मुलाखतीत सांगते, ‘युवीपुढे दोनच पर्याय होते, रडत बसायचं किंवा फाईट बॅक करायचं. युवी दुसरा पर्याय निवडणार याची आम्हाला खात्री होती आणि त्यानं तेच केलं. कॅन्सर सोबत लढणं हीच फार कठीण गोष्ट होती, पण त्यानं क्रिकेटच्या मैदानावर कमबॅकही केलं.’
युवराजनं फक्त कमबॅकच केलं नाही, तर कॅन्सरचा सामना करण्याऱ्या लोकांच्या मदतीसाठी ‘youWEcan’ नावाची संस्था सुरू केली. कॅन्सरची ट्रीटमेंट घेत असतानाच युवीला ही कल्पना सुचली आणि त्यानं ती सत्यात उतरवूनही दाखवली. आज कित्येक कॅन्सरशी लढणारे लोकं युवराजच्या फाऊंडेशनमुळं किंवा युवराजच्या प्रवासाकडून बघून हिंमत जागवत असतील. कारण युवराजनं लढायला शिकवलं.
युवी त्याच्या आयुष्यात लई क्रिकेट खेळला. इंग्लंड, पाकिस्तान आणि कांगारूंचा तर त्यानं कित्येकदा कचरा केला. पण कॅन्सरशी लढून पुन्हा मैदानात आला तेव्हा थोडसं सुटलेलं पोट, वाढलेले केस आणि दाढी या अवतारात इंग्लंडच्या बॉलर्सवर युवी तुटून पडला आणि १२७ बॉल्समध्ये १५० रन्स चोपलेले. त्याची ती इनिंग म्हणजे कळस होता, माणूस ठरवलं की काय करुन दाखवू शकतो, याचं ते सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण.
आजही कॅन्सरचं नाव ऐकल्यावर आपल्या अंगावर काटा येतो आणि केस गेलेला, चेहऱ्यावरचं तेज गेलेला युवराज आठवला की डोळे पाणावतात.
हे ही वाच भिडू:
- युवराज सिंग २०११ चा वर्ल्डकप खेळला, तो सचिनचा फोटो बघून…
- …नाही तर धोनीऐवजी युवराज सिंग भारताचा कॅप्टन झाला असता
- सचिन, गांगुलीनंतर ज्याचं पोस्टर घराच्या भिंतीवर लावावसं वाटलं, तो म्हणजे युवराज सिंग