कुवेतचा व्हिसा मिळवण्यासाठी या कार्यकर्त्यांनी जे केलंय ते इमॅजिन करणं पण अवघड आहे…

लहानपणी एक थेअरी ऐकलेली, आपल्यासारखी दिसणारी सात माणसं या जगात असतात. लय जणांना सातमधलं एक पण घावत नाही. पण ऍक्टर लोकांसारखे दिसणारे भिडू पाहिले की या थेअरीवर विश्वास बसू शकतो. पण तेव्हा एक प्रश्न पडला होता, दोन माणसं सारखं दिसत असतील, तर खरा कोण कसा ओळखायचा…

खरा तेजा कौन ? मार्क किधर है ?

पण या प्रश्नाचं उत्तर पुढे जाऊन मिळालंच. नाक, डोळे, रंग, रुप या सगळ्या गोष्टी सारख्या असल्या, तरी एक गोष्ट फिक्स वेगळी असते ती म्हणजे फिंगरप्रिंट्स. अर्थात बोटांचे ठसे. शास्त्रज्ञांनी याच बोटांच्या ठशांचा वापर अनेक गोष्टी केला आणि याच आधारे लोकांना स्वतःची वेगळी ओळख मिळाली.

मग हे बोटांचे ठसे पुढं जाऊन आपली कायदेशीर ओळखही बनले. अंगठा देऊन जमिनीचे व्यवहार होऊ लागले, ते अगदी पासपोर्टसाठीही अंगठ्याला शाई लागू लागली. रेशन घेण्यासाठी असेल किंवा दुसऱ्या देशात जाण्यासाठी बोटांचा ठसा हा महत्त्वाचा विषय होता.

हे एवढं पुराण तुम्हाला सांगितलं याच कारण म्हणजे, नुकतंच समोर आलेलं एक कांड…

आपण पिक्चरमध्ये बघतो की, एखादा व्हिलन किंवा हिरो प्लॅस्टिक सर्जरी करुन डायरेक्ट चेहराच बदलून टाकतो आणि थेट नवं आयुष्य जगतो. तसलंच एक कांड सापडलं हैदराबादमध्ये.

हैदराबादमधल्या रचाकोंडा पोलिसांनी एका ओयो रुमवर रेड मारली, तिथं त्यांना चार जण ऑपरेशन करताना सापडले. हे ऑपरेशन कसलं होतं, तर बोटांचे ठसे बदलण्याचं. एक रेडिओलॉजिस्ट आणि एक अनस्थेशिया टेक्निशियन एकत्र येऊन लोकांच्या बोटांचे ठसे बदलत होते. एखाद्या ऑपरेशनला  जेवढं सामान लागतं ते सगळं सामान या दोघांकडे होतं. साहजिकच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

गज्जालाकोंडुगरी नागा मुनेश्वर रेड्डी, सगाबाला वेंकट रमणा, बोविल्ला शिवा शंकर रेड्डी आणि रेंडला रामा कृष्णा रेड्डी या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले आणि पोलिस चौकशीत स्पष्ट झालं की हे फक्त दोन जणांच्या ऑपरेशन पुरतं मर्यादित नाहीये, तर पद्धतशीर सुरू असलेलं रॅकेट आहे.

मॅटर जरा विस्कटून सांगतो…

साधारण २००७ ची गोष्ट नागा मुनेश्वर रेड्डी हा गडी रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करत होता. त्याचवेळी त्याची ओळख झाली सगाबाला वेंकट रमणासोबत. रमणा पेशंटला भूल देण्याचं काम करायचा. या दोघांची चांगली मैत्री जमली होती. तेवढ्यात रेड्डीला एक माणूस भेटला, जो कुवेतमध्ये नोकरी करायचा. मात्र त्याचा व्हिसा संपला आणि तरीही राहणं कायम ठेवलं म्हणून त्याला कुवेतमधून बाहेर काढण्यात आलं. तिकडून तो थेट भारतात आला नाही, तर श्रीलंकेला गेला. 

तिथं त्यानं ‘फिंगर टीप’ सर्जरी केली, ज्यामुळं त्याच्या बोटांचे ठसे बदलले आणि तो पुन्हा कुवेतला जाऊ शकला.

त्याची ही स्कीम ऐकून रेड्डीनं ओळखलं की याच्यात पैसा आहे. त्यानं रमणालाही आपल्या सोबत घेतलं आणि दोघं मिळून सावज शोधायला लागले.

एका मित्राच्या ओळखीतून त्यांना राजस्थानमधले दोन कार्यकर्ते भेटले. त्यांनाही कुवेतमध्ये पून्हा एंट्री हवी होती आणि त्यासाठी बोटांचे ठसे बदलायचे होते. यासाठी रेड्डी आणि रमणानं प्रत्येकाकडून २५ हजार रुपये घेतले आणि सर्जरी केली. जसं हे ऑपरेशन यशस्वी ठरलं, तसा या दोघांनी मोठा हात मारायचं ठरवलं आणि अशीच सहा जणांची सर्जरी केली. ज्याचे पैसे घेतले दीड लाख रुपये.

पण ही सर्जरी नेमकी व्हायची कशी ? 

हाताच्या दहाही बोटांची स्कीन हे गडी फाडायचे. त्यानंतर बोटांच्या त्वचेचा काही भाग (टिश्यूज) काढून टाकायचे आणि बोटं पुन्हा टाके घालून शिवायचे. त्वचेचा काही भागच नसल्यानं बोटांचे ठसे काहीसे बदलले जायचे. एक दोन महिन्यात टाकेही निघायचे आणि पुन्हा ही लोकं कुवेतला जायला मोकळी व्हायची.

या सगळ्याचं कुवेत कनेक्शन नेमकं काय होतं..?

कुवेतमध्ये जाताना इमिग्रेशनच्या प्रोसेसमध्ये अनेक कच्चे दुवे होते, आधुनिक तंत्रज्ञान नसल्यानं बोटांचे ठसे बदलून फसवणं फार अवघड नव्हतं. याचाच फायदा या लोकांनी घ्यायचा ठरवलं होता. यातल्या काही जणांना गुन्हेगारी कृत्यांमुळे तर काही जणांना व्हिसाची मुदत संपली तरीही कुवेतमध्येच राहिल्यानं कुवेतमधून बाहेर काढलं होतं. त्यामुळं पुन्हा कुवेतमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना नव्या कोऱ्या व्हिसाची गरज होती. यासाठीच त्यांनी बोटांचे ठसे बदलण्याचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

बोटांचे ठसे बदलल्यानंतर त्यांनी आधार कार्डवर पत्ता आणि फिंगर प्रिंट नव्यानं अपडेट केल्या. नव्या पत्त्याच्या आधारावर व्हिसासाठी अर्ज केला आणि हाच व्हिसा वापरुन कुवेतमध्ये पुन्हा प्रवेश केला. पोलिसांच्या हाती सध्या तरी मुख्य सूत्रधार आणि इतर २ आरोपी सापडले असले, तरी हे रॅकेट नेमकं किती मोठं आहे, याचा शोध घेणं महत्त्वाचं असणार आहे.

नोकरीचे एवढे पर्याय असताना या कार्यकर्त्यांनी कुवेतच का निवडलं असेल, याचं कारण सापडतं आकडेवारीमध्ये

भारत सरकारनं जाहीर केलेल्या २०१९ च्या आकडेवारीनुसार कुवेतमध्ये १० लाख पेक्षा जात भारतीय नागरिक आहेत. इजिप्तच्या नागरिकांनंतर सर्वाधिक भारतीय स्थलांतरित लोक तिकडे आहेत आणि दरवर्षी हा आकडा ५ ते ६ टक्क्यांनी वाढतोय. भारतीय लोकांपैकी तब्बल ५.२३ लाख लोक कन्स्ट्रक्शन, आयटी, इंजीनिअरींग, मेडिसिन फिल्डमध्ये काम करतात.

तर ३ लाखांपेक्षा अधिक लोक कुवेतमध्ये ड्रायव्हर, कुक, माळीकाम, घरकाम अशा व्यवसायांमध्ये आहेत. त्यामुळे सगळ्याच स्तरातल्या भारतीय लोकांना कुवेतमध्ये डिमांड आहे, एवढं नक्की.

२०१९ च्याच आकडेवारीनुसार १० हजार लोक व्हिसा संपल्यावरही कुवेतमध्येच राहत होते, साहजिकच त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांना देश सोडावा लागला. याच आकडेवारीतल्या काही जणांनी कुवेतच्या सिस्टिममध्ये असलेल्या छोट्याछोट्या चुकांचा फायदा घेत, बोटांची सर्जरी करून देशात परत एंट्री मारली.

मात्र हे चार जण घावले आणि भारतापासून पार कुवेतपर्यंत सगळ्याच सिस्टीमची धोक्याची घंटा वाजली…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.