पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घ्यायचा ट्रेंड आणणाऱ्या भुवनेश्वर कुमारसोबत राजकारण झालं काय?

भारतात फास्ट बॉलर्सच तयार होत नाहीत, या टीकेला सगळ्यात आधी कुणी उत्तर दिलं असेल कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांनी. त्यांची परंपरा पुढं लय जणांनी चालवली. झहीर खान तर कित्येक वर्ष भारताचा हुकमी एक्का होता. भारताचा हा वाघ जस जसा थकला, तस तसं भारतीयांचं टेन्शन वाढलं होतं की झहीरची गादी कोण चालवणार? दोन्ही बाजूंनी बॉल स्विंग करणारा, अचूक टप्पा पकडणारा आणि समोरच्या टीमला पहिल्याच ओव्हरमध्ये हादरे देणारा बॉलर आपल्याला हवाच होता.

मग संघात एंट्री झाली भुवनेश्वर कुमारची. उत्तरप्रदेशमधल्या मेरठचं हे पोरगं. ना पैलवानाची तब्येत, ना धिप्पाड हाईट. पण बॉल असला गपकन आत घुसायचा की झहीर नायतर इरफान पठाणचीच आठवण व्हावी. कधीकाळी भारताचं ट्रम्प कार्ड असणारा भुवी अजूनही क्रिकेटच्या मैदानात दिसतो… पण सारखा नाही. एवढा भारी प्लेअर अचानक साईडलाईन कसा काय झाला हा प्रश्न अनेकांना सतावतो.   

वनडे क्रिकेटमध्ये भुवनेश्वरचं पदार्पण लईच वाढीव झालं. चेपॉकवर हाय व्होल्टेज भारत-पाकिस्तान मॅच सुरू होती. पाकिस्तानच्या कार्यकर्त्यांनी आपला बाजार उठवला. धोनीच्या शतकानं आपल्याला तारलं. टार्गेट काय लय मोठं नव्हतं, त्यामुळं जिंकण्याची आशा तशी कमीच होती… पण कायतर भारी बघायला मिळालं असतं, तरी चाललं असतं. आपली पहिलीच वनडे मॅच खेळणाऱ्या भुवीनं पहिल्याच बॉलवर मोहम्मद हाफिजला बोल्ड केलं आणि सगळं चेपॉकला हादरलं.चाचपडत खेळणाऱ्या अजझर अलीलाही त्यानंच तंबूचा रस्ता दाखवला. आपण ती मॅच हरलो, पण लयदार ऍक्शन असणारा भुवी चांगलाच लक्षात राहिला.

भारताचा २०१४ चा इंग्लंड दौरा तसा आपल्याला खास गेला होता. त्याचं कारण म्हणजे लॉर्ड्सवरची टेस्ट मॅच. पहिल्याच इनिंगमध्ये भारताचा डाव गडगडला, मुंबईकर अजिंक्य रहाणेनं तो सावरला, पण त्याला समोरच्या बाजूनं कुणीच साथ देईना. तेव्हा त्याच्या मदतीला धावला भुवनेश्वर कुमार. त्याच्या संयमी ३६ रनांमुळं भारताची गाडी रुळावर आली. त्याचा जलवा फक्त बॅटिंगमध्येच दिसला असं नाही, तर बॉलिंगमध्येही दिसला. इंग्लंडचे पहिले चारही फलंदाज भावानं खोलले, पुढं धोकादायक बेन स्टोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉडचाही त्यानंच बाजार उठवला आणि डावात सहा विकेट्स घेतल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये तर भुवीनं शानदार फिफ्टी मारली.

भारताचा बॉलर लॉर्ड्सवर बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीच्या जीवावर इंग्लंडचा बाजार उठवतोय, त्याचा लाल बॉल मस्त हलतोय हे बघणं लय बाप होतं. त्याच्या रूपानं भारताला सुपरस्टार मिळाला…

सगळं काही सुरळीत सुरू होतं, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्समध्ये त्याची जागा पक्की होती. पहिल्या काही ओव्हर्समध्ये भुवी ब्रेक-थ्रू मिळवून देणार याची कॅप्टनला, प्लेअर्सला आणि चाहत्यांनाही गॅरंटी असायची. भुवीनं ही सवयच लावली होती.

पण नंतर दुखापतींनी त्याची पाठ, गुडघे धरायला सुरुवात केली. आता दुखापती कुठल्याच फास्ट बॉलर्सला चुकलेल्या नाहीत. पण भुवीच्या दुखापतींकडे काहीसं दुर्लक्ष झालं हे तितकंच खरं. भुवीला हर्निया झाला होता, तेही अगदी उशिरानं समोर आलं. इंग्लंडमध्ये भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळायला गेला, तेव्हा स्विंगिंग कंडिशन्स असूनही भुवनेश्वरला संधी मिळाली नाही. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्येही भुवी संघाबाहेरच होता. त्याच्यानंतर आलेल्या बॉलर्सला खोऱ्यानं संधी मिळाल्या पण भुवीकडे दुर्लक्षच झालं आणि त्यामागचं कारण कधीच स्पष्ट झालं नाही. 

मध्यंतरी, त्याची टेस्ट संघात निवड न झाल्यावर… त्याच्या मनात टेस्टमधून निवृत्तीचा विचार घोळत असल्याच्या बातम्या आल्या. पुढं भुवीनंच मी टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी तेवढाच उत्सुक असल्याचं सांगितलं. आता वयानुसार त्याचा स्पीड काहीसा कमी झालाय, फिटनेसच्या तक्रारी थोड्या वाढल्यात हे ही तितकंच खरं. पण ऐन भरात असताना भुवीला आणखी संधी मिळाल्या असत्या तर आज चित्र नक्कीच वेगळं असतं.

आता पुन्हा भुवीची ती लयदार ऍक्शन, त्याचा गोंडस चेहरा, स्विंग होऊन गपकन आत शिरणारा बॉल पाहिला की, एकच प्रश्न सतावत राहील… भुवनेश्वर कुमारसोबत राजकारण झालं काय?

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.