IPL रद्द झाल्याने कोणा-कोणाचा कसा-कसा “बाजार” उठू शकतो ते वाचा..

आयपीएल. ललित मोदींच्या सुपिक डोक्यातुन बाहेर आलेली क्रिकेट लीग. तीन-साडेतीन तासांचे सामने, जागतिक क्रिकेटमधले दिग्गज खेळाडू, मसालेदार प्रक्षेपण, छोटी मैदाने व वीस षटकांत केली जाणारी प्रचंड धुलाई, बॉलरने बॉल टाकणे आणि बॅट्समनने तो घुमवणे. हे क्रिकेटप्रेमींना टीव्हीसमोर कित्येक वर्षापासून खिळवून ठेवत आहे.

आयपीएल लोकप्रियता आणि प्रेक्षकसंख्येच्या बाबतीतही कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत.

आता ही झाली प्रेक्षकांसाठीची क्रिकेट लीग. पण बीसीसीआयसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी. प्रचंड पैसा वाहणारी नदी. एक यशस्वी बिजनेस मॉडेल. इथे प्रेक्षक सोडून या स्पर्धेचा भाग असणाऱ्या आणि पैसा गुंतवणाऱ्या प्रत्येकाला पैसा आहे.

पण यंदा कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे निम्म्यावरच IPL रद्द करण्यात आले. आपल्यासाठी ही गोष्ट तासाभराचा ENJOY घालवणारी असली तरी अनेकांसाठी IPL रद्द करण्याचा हा निर्णय बाजार उठवणारा ठरू शकतो.

त्यासाठी आपण पहिला, IPL मध्ये कुठून आणि कसा पैसा येतो ते समजून घेतलं पाहीजे. 

बीसीसीआय आणि आयपीएल संघांसाठी उत्पन्नाचा प्रमुख स्रोत म्हणजे स्पर्धेचे मुख्य आणि इतर प्रायोजक : 

उदाहरणार्थ गतवर्षी ‘ड्रीम11’ हे स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर होतं. सोबतच ‘VI’ अर्थात व्होडाफोन – आयडिया ही को – स्पॉन्सर होतं. याव्यतिरिक्त अन्य कंपन्याही विविध कारणांसाठी प्रायोजक आहेत. ‘ड्रीम 11’ ने हे टायटल स्पॉन्सर २२२ कोटी रुपयांना मिळवले होते.

या पैशाची ६० : ४० अशी वाटणी केली जाते. म्हणजे ६० टक्के पैसा ८ टीममध्ये समान विभागला जातो. तर ४० टक्के पैसा बीसीसीआय ठेवून घेते.

म्हणजे यातील जवळपास १३३.२ कोटी आठ संघांमध्ये (१६.६ कोटी रुपये प्रत्येकी) तर ८८.८ कोटी बीसीसीआयच्या वाट्याला आले होते. यावर्षीचा टायटल स्पॉन्सरशिप पुन्हा VIVO कडे गेली.

आता दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे ब्रॉडकास्टिंगचे हक्क.

स्टार स्पोर्ट्सने २०१७ मध्ये १६,३४७.५ कोटी रुपयांना पाच वर्षासाठी प्रसारणाचे हक्क विकत घेतले आहेत. म्हणजे एका वर्षाला साधारण ३ हजार २६९ कोटी रुपये देते. यातही तसेच म्हणजे ६० : ४० टक्क्यांची विभागणी. (बीसीसीआयला एका वर्षात साधारण १३०७.६ कोटी रुपये राहतात. तर प्रत्येक संघ मालकांना २४५ कोटी रुपये दरवर्षी मिळताच)

स्टार स्पोर्टसला पैसे परत मिळतात ते जाहिराती मधून.

मागील वर्षी जवळपास ४ हजार कोटी रुपयांचा महसूल स्टार स्पोर्टस् वाल्यांनी गोळा केला होता. (त्यांचे वेगवेगळे ४ ते ५ चॅनेल्स आहेत. यातील प्रत्येक चॅनेलवर एकच मॅच दाखवली जाते. पण प्रत्येक चॅनेलवरील जाहिरातीचा दर वेगळा आहे.) यावर्षीचा त्यांचा एका चॅनेलवरील दहा सेकंदाच्या जाहिरातीचा दर आहे १२.५ लाख.

तिसरा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे प्रत्येक आयपीएल संघाचे स्वत:चे प्रायोजक असतात.

त्यांचे खेळाडू सरावासाठी जे किट वापरतात, मॅच दरम्यान ते जे टीशर्टस् वापरत असतात, ज्या टोप्या घालत असतात किंवा बॅटला जे लोगो लावत असतात, त्या कंपन्यांकडून त्यांना पैसे मिळतात. कारण ते ब्रँड सातत्याने टीव्हीवर दिसत असतात.

साधारण प्रत्येक मालकाला दरवर्षी कमीत कमी ७० कोटी मिळतात. जितके जास्त प्रायोजक, तेवढी नावं जास्त आणि तेवढी कमाईही जास्त.

यानंतर येतो तो गेट मनी म्हणजे स्टेडियमवर तिकीट काढून येणाऱ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळणारा पैसा.

प्रत्येक स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ठरलेली असते. आयपीएल संघासाठी होम आणि अवे मॅचेस असतात. प्रत्येक संघ कमीतकमी १६ मॅचेस खेळतो. यातील जवळपास ७० हिस्सा हा होम ग्राऊंडच्या टीम मालकांना जातो. १० टक्के बीसीसीआय, १० टक्के संबंधित राज्याच्या क्रिकेट असोसिएशनला आणि १० टायटल स्पॉनर्सना जातो. या १६ मॅचेस मधून प्रत्येक संघाला साधारण ४० ते ४५ कोटी रुपये तिकिटातून मिळतात.

नंतर ज्या स्टेडियम मॅच आहे तिथे आतमध्ये मोठ- मोठ्या स्क्रिनवर आणि बॅनरवर जाहिराती असतात. ज्या जाहिराती असतात, त्यांचे साधारण प्रत्येक संघाला २० ते ३० कोटी मिळतात.

जेतेपद पटकावल्यानंतर विजेत्या संघाला घसघशीत बक्षीस रकमेने गौरवण्यात येते. ही रक्कमही आयपीएल संघासाठी उत्पन्नाचा हिस्सा आहे. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला या पैशाचा वाटा मिळतो.

असा मिळून सर्वसाधारणपणे प्रत्येक संघाला ४०० ते ४२० कोटी मिळतात.

असे सगळे मिळून प्रत्येक मालकांच्या वाट्याला येतात प्रत्येक मॅचमध्ये ६३ कोटी. प्रत्येक षटकामागे साधारण १.५७ कोटी रुपये. प्रत्येक चेंडूमागे २४ ते २६ लाख रुपये ! तर बीसीसीआयला गेल्या वर्षी आयपीएलमधून साधारण २५०० कोटी रुपये मिळाले.

संघांना कशावर पैसे खर्च करतो?

प्रत्येक आयपीएल संघ मालकाला संघ विकत घेतल्यानंतर ज्या रकमेला संघ विकत घेतला, त्याच्या १०% टक्के रक्कम बीसीसीआयला द्यावी लागते.

आयपीएल संघ मालक लिलावात बोली लावून खेळाडूंना टिममध्ये समाविष्ट करतात.

ही रक्कम म्हणजे त्या खेळाडूंचा पगार असतो. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, लॉजिस्टिक्सची माणसे, टीम ॲडमिन अशी अनेक माणसं कार्यरत असतात. या सगळ्यांचा पगार संघाला द्यावा लागतो.

संघ एका हंगामात सातत्याने प्रवास करते. प्रत्येक संघात किमान २२ खेळाडू असतात. १०-१२ सपोर्ट स्टाफ असतो. याव्यतिरिक्त आणखी किमान १० माणसं असतात. या सगळ्यांची विमानाची तिकीटे, हॉटेलवर राहणे, ट्रॅव्हल, यांवरही कमीत कमी ४० कोटी रुपये खर्च करण्याची अट आहे. कारण यात खेळाडूंचं हित पाहिले जाते. कारण खेळाडूना त्यांच्या दर्जाचे हॉटेल, विमान प्रवास मिळायला हवा, म्हणून ही अट असते.

खेळाडूंना पैसे कसे मिळतात?

लिलावाच्या वेळी प्रत्येक संघाला विशिष्ट रक्कम ठरवून दिलेली असते. तेवढ्या रकमेत ते खेळाडूंची खरेदी करू शकतात. प्रत्येक संघात किती खेळाडू असणार हे ठरलेले असते.

खेळाडू संपूर्ण हंगामात खेळला तर त्याला जेवढी बोली लिलावात लागली होती तेवढी रक्कम मिळते.

खेळाडू त्या संघासाठी खेळताना दुखापतग्रस्त झाला आणि उर्वरित मॅचेस खेळू शकला नाही तरी त्याला ठराविक टक्के मानधन मिळते. दुखापतीच्या उपचारांचा, आवश्यकता असल्यास शस्त्रक्रियेचा खर्च संबंधित संघाकडून केला जातो. खेळाडूंच्या विम्यात तशी तरतूद असते. मात्र खेळाडूने स्वत: हून माघार घेतली तर मानधन मिळत नाही.

यावर्षी मात्र नफा कमी होता, तो देखील गेला. 

यावेळी प्रेक्षक नव्हते. त्यामुळे स्टेडियम मधल्या जाहिराती किंवा तिकिटाचे पैसे जवळ जवळ मिळणार नव्हतेच.  त्यातही जे होते ते देखील रद्द झाल्यामुळे गेले..

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.